|
नांदेड – येथील पाटबंधारे नगरामध्ये ६ एप्रिल २००६ या दिवशी राजकोंडवार यांच्या घरी मोठा स्फोट झाला होता. यात बजरंग दल आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ यांच्याशी संबंधित लक्ष्मण कोंडवार यांचा मुलगा नरेश राजकोंडवार अन् त्याचा साथीदार हिमांशू पानसे यांचा जागीच मृत्यू झाला होता, तर मारुति वाघ, योगेश देशपांडे उपाख्य वडोलकर, गुरुराज टोपटीवार आणि राहुल पांडे हे घायाळ झाले होते. ‘हा स्फोट बाँबचा होता’ असा आरोप करत ‘हिंदु आतंकवाद’ हा शब्दप्रयोग करण्यात आला होता. या प्रकरणात एकूण १२ आरोपींविरुद्ध विविध कलमान्वये खटला प्रविष्ट करण्यात आला होता. या प्रकरणाचा १९ वर्षांनी आता निकाल लागला असून सर्व १२ आरोपींची नांदेड न्यायालयाने ४ जानेवारी या दिवशी निर्दोष मुक्तता केली आहे. जिल्हा आणि सत्र न्यायालयात न्यायाधीश सी.व्ही. मराठे यांच्या खंडपिठाने खटल्यात ४९ साक्षीदार तपासले; मात्र केंद्रीय अन्वेषण विभाग स्फोटाचा ठोस पुरावा न्यायालयात सादर करू शकली नाही. यामुळे ‘न्यायालयाने हा स्फोट फटाक्यांचा होता’, असे मान्य करत सर्व आरोपींना निर्दोष मुक्त केले.
जालना, परभणी आणि मालेगाव प्रकरणातही करण्यात आले होते आरोपी
गुन्ह्याचे अन्वेषण प्रारंभी नांदेड पोलीस, त्यानंतर आतंकवादविरोधी पथक आणि नंतर केंद्रीय अन्वेषण विभाग यांनी केले. यातील काही आरोपींवर जालना, परभणी आणि मालेगाव येथील स्फोट प्रकरणातही आरोपी करण्यात आले होते. या खटल्यात एकूण ४९ साक्षीदार तपासण्यात आले. शेवटी नांदेड न्यायालयाने सर्व आरोपींना निर्दोष मुक्त केले.
स्फोट झालेल्या घराची झडती घेतांना जिवंत बाँब सापडल्याचा दावा करून पोलीस आणि अन्वेषण यंत्रण यांनी याला बाँबस्फोट मानले. झडतीच्या वेळी आरोपींच्या घरातून मुसलमानांचा पोशाख, खोट्या दाढ्या आणि टोप्याही सापडल्या होत्या.
निर्दोष मुक्त करण्यात आलेले हिंदू !
मृत हिमांशू पानसे आणि नरेश राजकोंडवार, तसेच सर्वश्री राहुल पांडे, संजय चौधरी, रामदास मुळंगे, मारुति वाघ, योगेश देशपांडे, गुरुराज तुप्तेवार, मिलिंद एकताटे, मंगेश पांडे, राहुल धावडे आणि डॉ. उमेश देशपांडे