Biden Honours George Soros : भारतद्वेष्टे अमेरिकी अब्जाधीश जॉर्ज सोरोस यांना मिळणार अमेरिकेचा सर्वोच्च नागरी सन्मान !

बायडेन सरकारचा निर्णय

वॉशिंग्टन (अमेरिका) – अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन व्हाईट हाऊसमध्ये १९ जणांना प्रतिष्ठित ‘प्रेसिडेंशियल मेडल ऑफ फ्रीडम’ देऊन सन्मानित करतील. हा अमेरिकेचा सर्वोच्च नागरी सन्मान आहे. यात कट्टर भारतद्वेष्टे अब्जाधीश जॉर्ज सोरोस यांचाही समावेश आहे. त्यांच्याखेरीज अमेरिकेच्या माजी परराष्ट्रमंत्री आणि वर्ष २०१६ मध्ये डॉनल्ड ट्रम्प यांच्या विरुद्ध राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत उभ्या राहिलेल्या हिलरी क्लिंटन, जगप्रसिद्ध फुटबॉलपटू लिओनेल मेस्सी आदी नावांचाही समावेश आहे.

(म्हणे) ‘सोरोस यांनी लोकशाही, मानवाधिकार आणि सामाजिक न्याय बळकट करणार्‍या जगभरातील संस्थांना पाठिंबा दिला !’ – व्हाईट हाऊस

व्हाईट हाऊस यांनी सोरोस यांना पुरस्कार देण्यासंदर्भात स्पष्ट केले की, जॉर्ज सोरोस यांनी लोकशाही, मानवाधिकार, शिक्षण आणि सामाजिक न्याय यांना बळकट करणार्‍या जगभरातील संस्थांना पाठिंबा देण्याचे महत्त्वपूर्ण कार्य केले आहे. त्यामुळे त्यांना हा पुरस्कार देण्यात येत आहे.

कोण आहेत जॉर्ज सोरोस ?

सोरोस हे अमेरिकी अब्जाधीश आणि साम्यवादी विचारवंत आहेत. भारत सरकार अस्थिर करण्यासाठी विरोधकांसमवेत कट रचल्याचा त्यांच्यावर अनेक वेळा आरोप झाला आहे. ९४ वर्षीय सोरोस यांच्यावर जगातील अनेक देशांच्या राजकारण आणि समाजावर प्रभाव टाकण्यासाठी धोरण चालवल्याचा आरोप आहे. ‘ओपन सोसायटी फाउंडेशन’ या संस्थेने वर्ष १९९९ मध्ये प्रथमच भारतात प्रवेश केला. सोरोस यांनी ऑगस्ट २०२३ मध्ये ‘म्युनिक सुरक्षा परिषदे’ला दिलेल्या निवेदनात म्हटले होते की, भारत हा लोकशाही देश आहे; पण पंतप्रधान मोदी लोकशाहीवादी नाहीत. सोरोस यांनी नागरिकत्व सुधारणा कायदा आणि कलम ३७० हटवण्यावरही पंतप्रधान मोदी यांच्यावर निशाणा साधला होता.

‘प्रेसिडेंशियल मेडल ऑफ फ्रीडम’ कुणाला दिले जाते ?

अमेरिकेतील हा प्रतिष्ठित पुरस्कार अमेरिकेची समृद्धी, मूल्ये, जागतिक शांतता किंवा सामाजिक आणि सार्वजनिक क्षेत्रामध्ये महत्त्वपूर्ण योगदान देणार्‍या व्यक्तींना दिला जातो. ‘व्हाईट हाऊस’नुसार हा पुरस्कार जे चांगले लोक आहेत, ज्यांनी आपल्या देशासाठी आणि जगासाठी असामान्य योगदान दिले आहे, त्यांना दिला जातो. (‘अमेरिकेसाठी असामान्य योगदान’ म्हणजे भावी काळात अमेरिकेला सर्वच दृष्ट्या आव्हान ठरू शकणार्‍या देशांवर विविध मार्गांनी षड्यंत्रे आखून ती यशस्वी करण्याचा अटोकाट प्रयत्न करणे होय ! – संपादक)

संपादकीय भूमिका

  • जॉर्ज सोरोस हे भारत, पर्यायाने हिंदुद्वेष्टे आहेत. त्यांनी भारताला अस्थिर करण्यासाठी भारतविरोधी ‘इकोसिस्टम’ला (यंत्रणेला) कार्यान्वित करण्यासाठी सहस्रो कोटी रुपये खर्च केले आहेत. अमेरिकी सरकाने त्यांना सर्वोच्च सन्मान देण्याचा निर्णय घेणे, यातून अमेरिकेचा भारतद्वेष उघड होतो !
  • भारतद्वेष्ट्या अब्जाधिशाला असा पुरस्कार अमेरिका कसा देते, हे विचारण्याचा बाणेदारपणा भारत सरकार दाखवेल का ?