Bulldozer Action On Sambhal MP : संभलचे (उत्तरप्रदेश) येथील खासदार झियाउर रहमान बर्क यांच्या घरावर लवकरच बुलडोझरद्वारे कारवाई !

घर बेकायदेशीर असल्याने कारवाई होणार

संभलचे समाजवादी पक्षाचे खासदार झियाउर रहमान बर्क

संभल (उत्तरप्रदेश) – संभलचे समाजवादी पक्षाचे खासदार झियाउर रहमान बर्क यांच्या घरावर प्रशासन लवकरच बुलडोझर चालवणार आहे. घराचा आराखडा संमत करून न घेताच हे घर बांधण्यात आले आहे. संभल प्रशासनाने याविषयी २ वेळा नोटिसा पाठवल्या आहेत. प्रशासनाने जियाउर रहमान यांना २८ डिसेंबर २०२४ या दिवशी शेवटची नोटीस पाठवली होती. या नोटिसांना खासदार झियाउर रहमान यांनी कोणतेही उत्तर दिलेले नाही. या नोटिसीला ४ जानेवारीपर्यंत उत्तर देण्याची सूचना प्रशासनाने दिली होती; मात्र उत्तर न दिल्यामुळे त्यांच्या घरावर बुलडोझर चालवण्यात येणार आहे. याआधीही घराच्या बाजूला बांधण्यात आलेला बेकायदेशीर जिना पाडण्यात आला होता.

संभल येथील जामा मशीद हिंसाचार प्रकरणात प्रक्षोभक विधाने करणे, वीजचोरी करणे आणि कार अपघातास कारणीभूत ठरणे इत्यादी प्रकरणी झियाउर रहमान यांच्यावर गुन्हे नोंदवण्यात आले आहेत. (प्रक्षोभक विधाने करून सामाजिक सलोखा बिघडवणारे, वीजचोरी करणारे आणि कायद्याचे पालन न करणारे झियाउर रहमान यांच्यासारखे खासदार देशाच्या राजकारणात सक्रीय असणे, ही भारतीय लोकशाहीची शोकांतिका आहे, असे म्हटल्यास चुकीचे ठरणार नाही ! – संपादक) वीजचोरीच्या प्रकरणात प्रशासनाने त्यांच्याकडून १ कोटी रुपयांचा दंड ठोठावला होता.

संपादकीय भूमिका

बेकायदेशीर कृत्ये करणार्‍या खासदारांचा भरणा असलेला समाजवादी पक्ष राज्य करण्याच्या लायकीचा आहे का ? अशा खासदारांवर पक्ष काय कारवाई करणार ?