कोल्हापूर, ११ डिसेंबर (वार्ता.) – कोल्हापूरचे ग्रामदैवत असलेले श्री कपिलेश्वर मंदिर सध्या टपर्या, फळ विक्रेते, भाजी विक्रेते यांच्या अतिक्रमणाच्या विळख्यात अडकले आहे. या मंदिराचे माहात्म्य श्री महालक्ष्मीदेवी मंदिराशी सलग्न असल्यामुळे या मंदिराची स्वच्छता, भोवताली असणारे अतिक्रमण, मंदिराचे माहात्म्य सांगणारे फलक यांकडे महापालिका प्रशासनाचे दुर्लक्ष आहे. तरी कोल्हापूरचे ग्रामदैवत श्री कपिलेश्वर मंदिराच्या भोवतीचे अतिक्रमण तातडीने काढण्यात यावे, या मागणीचे निवेदन भाजप शिवाजी पेठ मंडलाच्या वतीने कोल्हापूर महानगरपालिका उपायुक्त श्रीमती साधना पाटील यांना देण्यात आले. (जी गोष्ट एका पक्षाच्या पदाधिकार्यांना लक्षात येते, ती गोष्ट सर्व यंत्रणा हाताशी असलेल्या महापालिका प्रशासनाच्या का लक्षात येत नाही ? जनतेच्या पैशातून लठ्ठ वेतन घेणारे अधिकारी मग नेमके काम काय करतात ? – संपादक)
या प्रसंगी बोलतांना जिल्हा उपाध्यक्ष हेमंत आराध्ये म्हणाले, ‘‘कोल्हापूरचे ग्रामदैवत श्री कपिलेश्वर मंदिराची जी दुरवस्था झाली आहे, ती अतिशय दयनीय आहे. भक्तांना प्रदक्षिणा घालण्यासाठीचा मार्ग संपूर्णत: अतिक्रमणाच्या विळख्यात आहे. मंदिराच्या शिखरावर झाडे-झुडपे वाढलेली आहेत. मंदिराच्या भोवती असणारी गटारे कधीच स्वच्छ केली जात नाहीत. त्यामुळे महापालिका प्रशासनाने वरील गोष्टींचा गांभीर्याने विचार करून महापालिका प्रशासनाच्या वरील विषयाशी संबंधित विभागांना सूचना देऊन कडक कारवाई करावी.’’
उपायुक्त साधना पाटील यांनी ‘येणार्या २ दिवसांत मंदिर परिसर अतिक्रमणमुक्त करू’, असे आश्वासन दिले. या वेळी जिल्हा सरचिटणीस गायत्री राऊत, युवामोर्चा अध्यक्ष गिरीष साळोखे, विजय आगरवाल, प्राची कुलकर्णी, भोसले, सचिन पोवार, अनिश पोतदार यांसह अन्य उपस्थित होते.
संपादकीय भूमिकाअशी मागणी का करावी लागते ? प्रशासनाला ते लक्षात येत नाही का ? |