Iran–Israel Conflict : इस्रायल इराणचे अणूप्रकल्प नष्ट करील ! – अमेरिका

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डॉनल्ड ट्रम्प, इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू व इराणचे सर्वोच्च नेता अयातुल्ला खोमेनी

वॉशिंग्टन – वर्ष २०२५ चा प्रारंभ इस्रायल आणि हमास यांच्यातील युद्धबंदीने झाला, तर रशिया आणि युक्रेन यांच्यातील युद्ध थांबवण्याचे प्रयत्नही चालू आहेत; पण या देशांमध्ये युद्धाचा भडका कधीही उडू शकतो. अमेरिकन गुप्तचर विभागाच्या अहवालामध्ये ही भीती व्यक्त करण्यात आली आहे. या अहवालामध्ये म्हटले आहे की, इराणच्या अणूप्रकल्पांवर या वर्षी इस्रायलकडून आक्रमण होऊ शकते. मध्यपूर्वेत पुन्हा मोठे युद्ध होऊ शकते. यासह तिसर्‍या महायुद्धाचा धोकाही उद्भवू शकतो. वर्ष २०२४ मध्ये इराण आणि इस्रायल अनेक वेळा समोरासमोर आले; पण दोन्ही बाजूंनी काही आक्रमणानंतर परिस्थिती शांत झाली. आता जर अणू प्रकल्पांवर आक्रमणे झाली, तर परिस्थिती नियंत्रणाबाहेर जाऊ शकते.

इस्रायलचे लक्ष्य इराणची अणूक्षमता नष्ट करणे आहे. इराणमध्ये राजवट पालटण्यासाठी इस्रायल निधी पुरवू शकतो आणि राजकीय युद्धही होऊ शकते, असे या अहवालात म्हटले आहे. याआधीही इस्रायलच्या सुरक्षादलांनी इराणच्या सैन्य तळांवर आक्रमण केले होते. अमेरिकेने लादलेल्या आर्थिक निर्बंधांमुळे इराणही कमकुवत झाला आहे. इस्रायलला इराणच्या अणूस्थळांना पूर्णपणे नष्ट करायचे असेल, तर ते अमेरिकी सैन्याच्या साहाय्याविना करू शकत नाहीत, असा दावा या अहवालात केला आहे.