संपादकीय : संतांचे क्षात्रतेज !

पंडित धीरेंद्रकृष्ण शास्त्री

हिंदूंच्या रक्षणासाठी विविध हिंदुत्वनिष्ठांसह आता स्वतः संतांनीही कंबर कसली असल्याचे दिसून येत आहे. एरव्ही प्रबोधनापर्यंत मर्यादित असलेल्या संतांचे कार्य आता संघर्षापर्यंत येऊन पोचले आहे. त्यांना तसे करायला भाग पाडणार्‍या काही धर्मविरोधी घटना गेल्या काही वर्षांत घडतांना दिसून येत आहेत. बागेश्वर धामचे पंडित धीरेंद्रकृष्ण शास्त्री यांनी हिंदूंना ‘रस्त्यावर उतरा, नाहीतर तुमची सर्व मंदिरे मशिदी होतील’, अशी स्पष्ट चेतावणीच दिली आहे. ‘जर मला १०० कोटी हिंदूंपैकी १ कोटी कट्टर हिंदू मिळाले, तर पुढील सहस्रो वर्षे कुणीही सनातन धर्माकडे बोट दाखवू शकणार नाही’, असे त्यांनी स्पष्ट केले आहे.

बांगलादेशातील हिंदूंवर चालू असलेल्या अमानवीय अत्याचारांच्या विरोधातही पंडित धीरेंद्रकृष्ण शास्त्री यांनी आवाज उठवला आहे. ‘बांगलादेशातील हिंदूंनी संघटित होऊन त्यांच्या संस्कृतीचे रक्षण करणारे चिन्मय प्रभु यांना कारागृहातून बाहेर काढावे’, असे आवाहन त्यांनी केले. पंडित धीरेंद्रकृष्ण शास्त्री यांनी यापूर्वीही हिंदुहिताच्या भूमिका घेतल्या आहेत. आता धर्महितासाठी इतक्या कठोर शब्दांत त्यांनी सांगणे, हेच संतांचे क्षात्रतेज होय. गेल्या काही वर्षांत लव्ह जिहादच्या माध्यमातून हिंदूंचा पद्धतशीरपणे वंशविच्छेद चालू आहे. लँड जिहादच्या माध्यमातून गड-दुर्गांवर अतिक्रमण करून त्याद्वारे ते बळकावण्याचे प्रयत्न चालू आहेत. ‘वक्फ बोर्डा’च्या माध्यमातून हिंदूंच्या भूमी, मंदिरांच्या भूमी हडपण्याचे उद्योग चालू आहेत. याखेरीज दंगली, हिंदुत्वनिष्ठांच्या हत्या, देवतांचा अवमान आदींच्या माध्यमातूनही हिंदु धर्मावर आघात केले जात आहेत. हे आघात रोखण्यासाठी हिंदुत्वनिष्ठ संघटना आपापल्या परीने कार्य करतच आहेत; पण आता त्यांना पंडित धीरेंद्रकृष्ण शास्त्री यांच्यासारख्या संतांचे आशीर्वाद आणि पाठबळ लाभले आहे. केवळ आवश्यकता आहे ती त्यांचे आज्ञापालन करण्याची ! संत म्हणजे ईश्वराचे देहधारी रूप असते. त्यांच्या मार्गदर्शनाने छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्य निर्माण केले. आता वेळ आहे ती आपण सर्वांनी संतांच्या मार्गदर्शनाखाली हिंदु राष्ट्र स्थापन करण्याची !