‘कोची (केरळ) येथील साधिका कु. प्रणिता सुखठणकर या गेल्या काही दिवसांपासून रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमात आहेत. त्यांनी आश्रमातील काही मुलांचे वागणे आणि बोलणे यासंदर्भात निरीक्षण केले. त्या वेळी समाजातील मुले आणि साधक मुले यांच्यातील भेद त्यांच्या लक्षात आला. त्यातील काही सूत्रे येथे दिली आहेत.
१. सात्त्विक वेशभूषा
अ. ‘समाजातील मुले त्यांना आवडणारे कोणतेही कपडे घालतात.
आ. साधक मुले नेहमी सात्त्विक कपडे वापरतात. त्यामुळे ती कोणत्याही ठिकाणी गेली, तरी त्यांच्या सात्त्विक वेशभूषेमुळे उठून दिसतात.
२. वागण्यातील नम्रता
अ. समाजातील तरुण मुले स्वतःला पुष्कळ हुशार समजतात. ‘आपण कुणीतरी वेगळे आहोत’, असे ते त्यांच्या वागण्या-बोलण्यातून दर्शवतात.
आ. साधक मुलांचे बोलणे आणि वागणे यांतून त्यांची नम्रता दिसून येते.
३. विचारांमध्ये स्पष्टता असणे आणि अहं न्यून असणे
अ. समाजातील साधारण १७ वर्षे वयाच्या बर्याच मुलांचे ध्येय निश्चित झालेले नसते. त्यांच्याशी बोलतांना अहं जाणवतो.
आ. रामनाथी (गोवा) आश्रमातील कु. शर्वरी कानस्कर (आध्यात्मिक पातळी ६१ टक्के, वय १७ वर्षे) हिच्याशी बोलतांना ‘ती कथ्थक नृत्य विशारद आहे’, हे मला समजले. (कु. शर्वरी नृत्याच्या माध्यमातून साधना करत आहे.) तिला तिच्या विषयाची सखोल माहिती होती. तिच्या विचारांत स्पष्टता असल्याचे माझ्या लक्षात आले. तिच्या बोलण्यात मला कुठेही अहं जाणवला नाही.
४. स्वावलंबी
अ. समाजातील मुले अनेक गोष्टींसाठी त्यांच्या आई-वडिलांवर अवलंबून असतात.
आ. ‘साधक मुले साधनेच्या संस्कारांमुळे लहान वयातच स्वावलंबी होतात’, हे माझ्या लक्षात आलेे, उदा. डिचोली (गोवा) येथील कु. संपदा शिरोडकर (वय १६ वर्षे ) ही तिच्या घरातील मोठी मुलगी आहे. ती तिच्या लहान बहिणींना सांभाळते. त्याचप्रमाणे ‘घरातील सर्वांसाठी चांगला स्वयंपाक करते’, हेे माझ्या लक्षात आले.
५. मोठ्या व्यक्तींचे ऐकणे आणि आवड-नावड न्यून करणे
अ. समाजातील मुले बर्याच वेळा अनेक गोष्टींसाठी हट्ट करतात आणि घरातील मोठ्या व्यक्तींचे ऐकत नाहीत.
आ. साधक मुले साधनेच्या संस्कारांमुळे मोठ्या व्यक्तींनी सांगितलेले ऐकतात आणि त्यानुसार योग्य कृती करतात, हे खालील उदाहरणांतून लक्षात येते.
१. रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमातील कु. अद्वैत पोत्रेकर (आध्यात्मिक पातळी ५९ टक्के, वय १० वर्षे) एकदा त्याच्या आईसह महाप्रसाद घेत होता. त्याला त्या दिवशी केलेली आमटी आवडली नव्हती. त्यामुळे तो त्याच्या आईला त्याच्या वाटीत असलेली आमटी संपवायला सांगत होता. त्याच्या आईने त्याला ‘साधनेच्या दृष्टीकोनातून योग्य काय करायला पाहिजे’, ते सांगितले. आईने सांगितलेले ऐकून अद्वैतने काहीही न बोलता त्याला न आवडलेली आमटी संपवली.
२. कु. वेदश्री भुकन (आध्यात्मिक पातळी ६४ टक्के, वय ११ वर्षे) हिला एक दिवस महाप्रसादातील गोड पदार्थ नको होता. ‘तिला उलटी होईल’, असे वाटत होते. तो पदार्थ वाया जाऊ नये; म्हणून तिने नामजप करत तो खाल्ला. यातून आवड-नावड संस्कार न्यून करण्यासाठी साधक मुले कसे प्रयत्न करतात, हे माझ्या लक्षात आले.
इ. समाजात मुलेच नाही, तर मोठी माणसेसुद्धा अन्न वाया घालवतात. साधनेमुळे साधकांचा सर्वच गोष्टींकडे पहाण्याचा दृष्टीकोन पालटतो.
६. प्रेमभाव आणि आदर
अ. समाजातील मुले प्रवास करतांना वयस्कर किंवा रुग्ण व्यक्तींना क्वचितच आसंदीवर बसायला जागा देतात. त्या वेळी मुलांना ‘वयस्कर किंवा रुग्ण व्यक्ती असल्यास त्यांना आसंदीवर बसू दे’, असे सांगावे लागते.
आ. साधक मुले प्रवास करतांना वयस्कर किंवा रुग्ण व्यक्तींना स्वतःहून आसंदीवर बसण्यास जागा देतात. ती कितीही दमली असतील, तरी वयस्कर व्यक्तींना आदराने बसायला जागा देतात.
‘परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या कृपेमुळे साधक मुलांमधील गुण माझ्या लक्षात आले’, त्याबद्दल गुरुचरणी कृतज्ञता व्यक्त करते.’
– सुश्री (कु.) प्रणिता सुखठणकर, कोची, केरळ. (१४.१०.२०२४)