पुणे पोलिसांनी कार्यक्रम रहित का केला नाही ? असा नागरिकांचा प्रश्न !
पुणे – कोथरूड येथील ‘काकडे फार्म’ परिसरामध्ये २४ नोव्हेंबर या दिवशी दिलजीत दोसांझ याचा ‘म्युझिक कॉन्सर्ट’ कार्यक्रम आयोजित केला होता. हा कार्यक्रम रहित करावा; म्हणून स्थानिकांनी आंदोलन केले होते, तसेच कोथरूडचे आमदार चंद्रकांत पाटील यांनी पोलीस आयुक्त आणि उत्पादन शुल्क विभागाला सूचना केली होती. तरीही हा कार्यक्रम पार पडला. (आमदारांनी सूचना देऊनही कार्यक्रम होतोच कसा ? याला कुणाचे पाठबळ आहे का , याचा शोध घ्यायला हवा ! याविषयी प्रशासन काही सांगणार का ? – संपादक)
या ‘म्युझिक कॉन्सर्ट’ला ५० सहस्रांहून अधिक प्रेक्षक येण्याची शक्यता होती. तसेच दिलजीत दोसांझ यांच्या आजवरच्या कार्यक्रमांची पार्श्वभूमी लक्षात घेतल्यानंतर स्थानिक नागरिकांनी याला विरोध दर्शवला होता. कार्यक्रम घेऊ नये म्हणून मनसे, राष्ट्रवादी काँग्रेस यांसह विविध राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांनी आणि सामाजिक संघटनांनी विरोध केला होता. या कार्यक्रमाच्या आयोजनामुळे या परिसरांमध्ये मोठ्या प्रमाणात वाहतूककोंडी होऊन नागरिकांना त्याचा त्रास सहन करावा लागल्याच्या तक्रारी नागरिकांकडून केल्या जात आहेत.
ठोस भूमिका घेऊन कार्यक्रम कसा झाला ?
हा कार्यक्रम कोथरूडमध्ये झाल्यास भाजपच्या वतीने मोठा मोर्चा काढण्यात येईल. या मोर्चाचे नेतृत्व मी स्वत: करीन, अशी भूमिका आमदार चंद्रकांत पाटील यांनी घेतली होती. अशी भूमिका घेऊनही पोलीस प्रशासनाने हा कार्यक्रम रहित का केला नाही ? अशी विचारणा स्थानिक नागरिकांकडून होत आहे.