American Hindus Stand In Solidarity : कॅनडा आणि बांगलादेश येथे हिंदूंवर होणार्‍या आक्रमणांच्या विरोधात अमेरिकेतील हिंदूंनी काढला मोर्चा !

कॅलिफोर्निया (अमेरिका) – येथील सिलिकॉन व्हॅली भागात अमेरिकेतील भारतीय वंशांच्या नागरिकांनी कॅनडा आणि बांगलादेश येथे हिंदूंवर होणार्‍या अत्याचारांच्या विरोधात मोर्चा काढून निषेध केला. यानंतर येथे सभाही घेण्यात आली. या वेळी मानवी हक्कांच्या उल्लंघनाचा निषेध करण्यासाठी आणि हिंदू अल्पसंख्यांक लोकसंख्येच्या संरक्षणासाठी कॅनडा आणि बांगलादेश देशांच्या सरकारांना उत्तरदायी धरण्याचे आवाहन अमेरिकी नेत्यांना करण्यात आले.

१. कॅनडाच्या ब्रॅम्प्टन येथील हिंदु सभा मंदिरात भाविकांवर झालेल्या आक्रमणाची योग्य चौकशी न झाल्याबद्दल सभेत सहभागी झालेल्या लोकांनी निराशा व्यक्त केली. ‘खलिस्तानी आतंकवाद बंद करा’, ‘कॅनडातील हिंदूंचे रक्षण करा’, ‘इस्लामी आतंकवाद थांबवा’, ‘बांगलादेशी हिंदूंचे रक्षण करा’ अशा घोषणा या वेळी देण्यात आल्या.

२. हिंदूंनी म्हटले की, खलिस्तानी समर्थकांनी मंदिर परिसरात घुसून पुरुष, महिला आणि मुले यांना मारहाण करतांनाचे व्हिडिओ आम्ही पाहिले आहेत. दिवाळी साजरी करण्यासाठी गेलेल्या हिंदूंचा पाठलाग करण्यात आला. ही परिस्थिती भयावह आहे. आम्ही पाहिले की, पोलीस आधीच खलिस्तान समर्थकांशी संगनमत करून हिंदु भाविकांना मारहाण करत होते.  कॅनडातील हिंदूंच्या मूलभूत मानवी हक्कांचे रक्षण करण्यासाठी ट्रुडो सरकारवरील आमचा विश्‍वास उडाला आहे.

३. ‘अमेरिकन फॉर हिंदू’ संघटनेचे डॉ. रमेश जप्रा यांनी कॅनडातील हिंदूंवर खलिस्तानी आणि बांगलादेशातील कट्टरवादी गट यांच्याकडून होत असलेल्या आक्रमणांंवर टीका केली. ते म्हणाले की, आपण ‘एक जग, एक कुटुंब, एक भविष्य’ आहोत.

४. ‘कोलिशन ऑफ हिंदू इन नॉर्थ अमेरिका’ संघटनेच्या पुष्पिता प्रसाद यांनी कॅनडामधील त्यांच्या पथकाला ‘सिख फॉर जस्टिस’ने लक्ष्य केल्याबद्दल चिंता व्यक्त केली.

संपादकीय भूमिका

जगात कुठेही हिंदूंवर अन्याय झाला, तर अमेरिकेतील हिंदू त्या विरोधात आवाज उठवतात. जगभरातील सोडाच, भारतात अन्याय होत असलेल्या स्वतःच्या धर्मबांधवांसाठी काहीही न करणारे भारतातील जन्महिंदू यातून बोध घेतील का ?