भाग्यनगर (तेलंगाणा) येथे ‘लोकमंथन’ कार्यक्रमाचे उद़्घाटन
भाग्यनगर – भारताची बळकट संकल्पनात्मक एकता इंद्रधनुष्याप्रमाणे विविध रंगांनी नटलेली आहे, मग आपण वनवासी असोत, ग्रामवासी असोत किंवा नगरवासी असोत, आपण सर्व भारतवासी आहोत. आपली सांस्कृतिक मूल्ये आपली कला, साहित्य, हस्तकला आणि राष्ट्रीय जीवनाचे विविध पैलू यांच्याद्वारे प्रतिबिंबित होतात, असे उद़्गार भारताच्या राष्ट्रपती श्रीमती द्रौपदी मुर्मू यांनी येथे काढले. त्या येथे ‘लोकमंथन’च्या भव्य उद़्घाटनप्रसंगी बोलत होत्या. राष्ट्रपतींनी त्यांच्या भाषणात लोकमंथनचे कौतुक केले आणि आठवण करून दिली की, अनेक वर्षांपूर्वी त्या रांची येथे आयोजित ‘लोकमंथन’ला उपस्थित होत्या. भारतीय संस्कृती आणि मूल्ये यांच्या जोपासनेसाठी ‘लोकमंथन’ परिषदेचे आयोजन केले जाते. ही परिषद शहरात ३ दिवस चालणार आहे.
भारतियांची राष्ट्रीय चेतना जागृत होत आहे ! – मुर्मू
राष्ट्रपती मुर्मू पुढे म्हणाल्या की, वसाहतवादी राजवटीने केवळ आपल्या सांस्कृतिक परंपरांना विकृत केले नाही, तर त्यांनी आपली सामाजिक रचना उद़्ध्वस्त केली. त्यांनी आपल्या सामाजिक, आर्थिक, सांस्कृतिक आणि शैक्षणिक प्रणालींवर आघात केले; मात्र आता आपली राष्ट्रीय चेतना जागृत होत आहे आणि आपण हळूहळू वसाहतवादी मानसिकतेपासून मुक्त होत आहोत.
याप्रसंगी राष्ट्रपती श्रीमती द्रौपदी मुर्मू यांनी प्रज्ञा प्रवाहने संकलित केलेल्या ‘लोक अवलोकान’ या पुस्तकाचे मंचावर प्रकाशन केले. या वेळी तेलंगाणाचे राज्यपाल श्री. जिष्णु देव वर्मा, कोळसा व खाण मंत्री श्री जी. किशन रेड्डी, तेलंगाणाच्या महिला आणि बाल कल्याण मंत्री श्रीमती सितक्का, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक प.पू. डॉ. मोहनजी भागवत, प्रज्ञा प्रवाहचे अखिल भारतीय संयोजक श्री. जे. नंदकुमार आणि पद्मश्री डॉ. टी. हनुमान चौधरी, प्रज्ञा भारतीचे अध्यक्ष इत्यादी उद़्घाटन सोहळ्याला मंचावर उपस्थित होते. सनातन संस्थेच्या वतीने धर्मप्रचारक श्री. अभय वर्तक हे या कार्यक्रमाला उपस्थित होते.