सामूहिक ‘आमरण उपोषणा’च्या सिद्धतेला लागा ! – मनोज जरांगे यांचे मराठा समाजाला आवाहन

सरकार स्थापन झाले की, उपोषणाचा दिनांक घोषित करणार !

जालना – विधानसभा निवडणूक संपल्यानंतर मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी २१ नोव्हेंबर या दिवशी पुन्हा एकदा मराठा समाजाला आरक्षणासाठी मैदानात उतरण्याचे आवाहन केले आहे. ‘विधानसभा निवडणूक पार पडली आहे. आता हे सूत्र आमच्यासाठी संपले आहे. मराठा समाजाने आता आपल्या सामूहिक ‘आमरण उपोषणा’च्या सिद्धतेला लागावे’, असे आवाहन त्यांनी केले.

एका वृत्तवाहिनीशी बोलतांना मनोज जरांगे म्हणाले की, निवडणुकीत कोणता पक्ष विजयी होईल, हे मी सांगू शकत नाही. शेवटी या राज्यात मराठा समाजाच्या मतांविना कोणताही उमेदवार निवडून येऊ शकत नाही, हे अंतिम सत्य आहे. त्यामुळे आता येथून पुढचे दायित्व मराठ्यांचे आहे. मराठ्यांनी आता आपल्या डोक्यातून राजकारणाचा विषय काढला आहे. पुढे होईल ते होईल. मतदान संपल्यानंतर आता पुन्हा एकदा आमच्या आरक्षणाची लढाई चालू झाली आहे.