श्री. श्रीकांत बेलसरे हे मूळचे पुणे येथील असून सध्या ते कुडाळ येथे वास्तव्यास आहेत. ते ‘मेकॅनिकल’ अभियंता असून एका विद्यालयात प्राध्यापक आहेत. वर्षातून एकदा ते श्री गजानन महाराज यांची पोथी भावपूर्ण रितीने वाचतात. पत्नी सौ. कविता बेलसरे आणि सासरे श्री. दत्तात्रेय कुलकर्णी अन् सासू सौ. सुलभा कुलकर्णी यांना जाणवलेली त्यांची गुणवैशिष्ट्ये पुढे दिली आहेत.
१. शांत आणि मितभाषी
‘श्री. श्रीकांत हे शांत आणि मितभाषी आहेत. ते मोजकेच; पण मुद्देसूदपणे बोलतात. त्यांच्या बोलण्यामुळे अनेकजण प्रभावित होतात.
२. समजूतदार स्वभाव
यजमान समोरच्या व्यक्तीला समजून घेतात. प्रत्येकाच्या वयानुसार ते त्या व्यक्तीशी समजूतदारपणे वागतात. विवाह झाल्यावर त्यांनी मला पूर्णपणे समजून घेतले. त्यांच्या या स्वभावामुळे विवाहानंतर अनेक कठीण प्रसंगांना मला सामोरे जाता आले.
३. परिपूर्ण कृती करणे
अ. यजमानांना प्रत्येक कृती नीटनेटकेपणाने करायची सवय आहे. लहान लहान वस्तूही ते काळजीपूर्वक हाताळतात.
आ. आपत्काळाच्या सिद्धतेसाठी घेतलेले धान्य, वस्तू आदींची त्यांनी परिपूर्णतेने निगा राखली. धान्य वाळवतांना ते उन्हात ठेवण्यासाठी जागा नसल्याने त्यांनी सदनिकेत हॅलोजन लावून सर्व धान्य वाळवले आणि ते व्यवस्थित ‘पॅक’ करून ठेवले. त्यामुळे ते धान्य २ – ३ वर्षे टिकले आहे.
४. पत्नीला साधनेत पूर्ण सहकार्य करणेआणि त्यासाठी स्वतः सर्व प्रकारचा त्याग करणे
अ. विवाह ठरण्यापूर्वी मी त्यांना सांगितले होते, ‘मी सनातन संस्थेच्या माध्यमातून साधना करते.’ ते ऐकून त्यांनी विवाहास संमती दिली. विवाहानंतर त्यांनी साधनेला कधीच विरोध केला नाही. उलट माझी साधना व्हावी, यासाठी जे जे शक्य होईल, ते करण्याची त्यांची तळमळ असते. सेवेसाठी मला ‘सर्व अत्याधुनिक सुविधा मिळाव्यात’, असा त्यांचा प्रयत्न असतो. मला सेवेसाठी कधीही आश्रमात पाठवण्याची त्यांच्या मनाची सिद्धता असते.
५. परिस्थिती स्वीकारणे
अ. विवाहानंतर लगेच २ मासांत त्यांना हृदयविकाराचा त्रास झाला आणि त्यांची ‘अँजिओप्लास्टी’(टीप) करण्यात आली. हा मोठा प्रसंग त्यांनी स्वीकारला.
(टीप : ‘अँजिओप्लास्टी’ म्हणजे ‘हृदयाच्या रक्तवाहिन्यांमधील अडथळा दूर करण्यासाठी केले जाणारे एक शस्त्रकर्म’)
आ. मला होणारे आध्यात्मिक त्रासही त्यांनी स्वीकारले आहेत. माझ्या स्वभावदोषांमुळे पूर्वी आमच्यात अनेक वादाचे प्रसंग घडायचे. त्यामुळे त्यांना त्रासही व्हायचा; पण तो सहन करून त्यांनी मला आनंद देण्याचा प्रयत्न केला.
६. इतरांना साहाय्य करणे
अ. यजमानांना ज्येष्ठ नागरिकांविषयी आदर आहे आणि तो त्यांच्या कृतीतूनही जाणवतो. ते माझे आई आणि बाबा यांना वेळोवेळी साहाय्य करतात. ‘त्यांना सर्व सुविधा देता याव्यात’, यासाठी त्यांचा प्रयत्न असतो.
आ. प्रथमच कुणी साधक भेटले, तरी त्यांना यजमान आपलेसे वाटतात. साधकांना ‘कोणते साहाय्य करता येईल’, यासाठी यजमानांचा प्रयत्न असतो.
इ. ‘भेटलेल्या प्रत्येक व्यक्तीला ते निरपेक्षपणे साहाय्य करतात. महविद्यालयातही त्यांनी अनेक विद्यार्थ्यांना साहाय्य केले आहे, तसेच त्यांना योग्य वळण लावून योग्य दिशाही दाखवली आहे.
७. अपेक्षा न्यून असणे
‘पती म्हणून मी त्यांचे काही करावे’, अशी अपेक्षा न ठेवता यजमानच मला कामांत साहाय्य करतात. बाहेरील कोणत्याही व्यक्तीकडून त्यांच्या अपेक्षा न्यून असतात. त्यांना निरपेक्षपणे कार्य करायला आवडते.
८. पत्नीची काळजी घेणे
अ. मी कोरोना महामारीच्या काळात आजारी असतांना मला काढा करून देण्यापासून, चिकित्सालयात नेणे इत्यादी सर्व प्रकारे त्यांनी माझी काळजी घेतली.
आ. मी पुणे येथे नोकरीला असतांना घरात सर्व प्रकारे साहाय्य करून ते स्वतःही नोकरीला जात. पुण्यासारख्या शहरात नोकरी करण्याचा माझ्या मनावर ताण होता. नोकरीचे ठिकाण लांब असल्याने त्यांनी मला ‘कॅब’ने (टॅक्सीने) जाण्यास सांगितले. मी क्वचितच बसने कार्यालयात गेले. त्यांनी माझी एवढी काळजी घेतल्याने मी नोकरी करू शकले.
९. निसर्गाविषयी प्रेम
यजमानांना निसर्गाविषयी निरंतर प्रेम आहे. आम्ही रहात असलेल्या सदनिकेत फारसे ऊन येत नसूनही गच्चीतील बेलाची आणि इतर झाडे चांगली वाढतात. आम्ही परगावी जातांना ते पाण्याची सोय (ठिबकसिंचन) करून जातात. त्यामुळे गावाला जाऊन आल्यावरही झाडे टवटवीत असतात.
१०. भाव
संत आणि साधक यांच्याविषयी यजमानांच्या मनात आदरभाव आहे. आश्रमात जायचे असल्यास ते मला खाऊ, तसेच संतांना फळे नेण्याची आठवण करून देतात.
११. सच्चिदानंद परब्रह्म गुरुदेव आणि संत यांनी यजमानांविषयी काढलेले कौतुकोद्गार !
अ. एकदा सच्चिदानंद परब्रह्म गुरुदेवांची भेट झाली. त्या वेळी मी त्यांना यजमानांविषयी सांगितले. तेव्हा गुरुदेव सर्वांना म्हणाले, ‘‘बघा, या किती भाग्यवान आहेत.’’ नंतर ते मला म्हणाले, ‘‘तुम्ही त्यांच्याविषयी प्रतिदिन कृतज्ञता व्यक्त करा.’’
आ. मिरज (जि. सांगली) येथील सनातनच्या आश्रमात वास्तव्यास असणारे पू. जयराम जोशीआबा मला म्हणाले, ‘‘देवाने तुला सर्वकाही दिले आहे. तुझे पती हे देवमाणूस आहेत !’’
‘सच्चिदानंद परब्रह्म गुरुदेव, आपल्या कृपेमुळेच मला साधनेत साथ देणारे जीवनातील खरे साथीदार मिळाले’, याबद्दल आपल्या चरणी कोटीशः कृतज्ञता ! ‘आम्हा दोघांची अध्यात्मात प्रगती होऊन आम्हाला सत्-चित्-आनंद प्राप्त होवो’, हीच आपल्या चरणी प्रार्थना !’
– सौ. कविता श्रीकांत बेलसरे (श्री. श्रीकांत बेलसरे यांची पत्नी), कुडाळ (३०.१०.२०२४)
अनेक गुणांचा समुच्चय असणारे श्री. श्रीकांत बेलसरे !
‘सौ. कवितासाठी अनेक वर्षे प्रयत्न करूनही तिचा विवाह जमत नव्हता. तिला प्रामुख्याने ‘साधक पती’ हवा होता. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या कृपेने साधकत्वाचे अनेक गुण असणारे श्री. श्रीकांत बेलसरे यांच्यासारखे जावई आम्हाला लाभले, यासाठी गुरुचरणी कृतज्ञ आहे !
१. मुलीला (सौ. कविता बेलसरे यांना) गुणदोषांसहित स्वीकारणे
आग्रही आणि हट्टी असणार्या आमच्या मुलीस (सौ. कवितास) श्रीकांत यांनी मनापासून स्वीकारले आहे.
२. नियोजनकौशल्य
आम्हाला त्यांच्या समवेत इंदूर, गोकर्ण इत्यादी ठिकाणी जाण्यास मिळाले. आमच्या वयाचा विचार करून त्यांनी प्रत्येक ठिकाणी योग्य नियोजन केले.
३. निरपेक्षता
श्रीकांत प्रत्येक कृती निरपेक्षतेने करतात. लोकेषणा, तसेच प्रसिद्धी यांपासून ते अलिप्त असतात.
४. मृदू बोलणे
श्रीकांत प्रत्येक कृती, बोलणे आणि हालचाल शांतपणे करतात. त्यांना रागाने किंवा कुणाला दुखावेल, असे बोलतांना आम्ही पाहिलेले नाही. कोणी प्रतिक्रियात्मक बोलल्यास ते म्हणतात, ‘‘मला आणि समोरच्याला बोलण्याची बुद्धी देणारा भगवंतच आहे. यामुळे माझे प्रारब्ध किंवा देवाणघेवाण न्यून होत आहे.’’
५. परेच्छेने वागणे
विवाहानंतर त्यांनी बर्याच गोष्टी कविताच्या मनानुसार परेच्छेने केल्या. बालपणापासून पुण्यात वास्तव्य करूनही सध्या ते आनंदाने कुडाळ येथे रहात आहेत.
६. शिकण्याची वृत्ती
स्वयंपाकघरातील सर्व गोष्टींचे त्यांना ज्ञान आहे. ते प्रत्येक कृती अभ्यास करून करतात.
७. इतरांचा विचार आणि सेवाभावी वृत्ती
आम्ही कुडाळ येथे रहायला गेल्यावर ते बसल्या जागेवरच आम्हाला चहा-न्याहरी आणून देतात. आमच्या सांगली येथील घरात त्यांनी अनेक सोयी करून दिल्या आहेत.
८. शिकवण्याचे कौशल्य
मी भ्रमणभाषच्या संदर्भातील कोणतीही अडचण त्यांना विचारली, तर ते उत्तमपणे समजावून सांगतात. शिकवण्याचे कौशल्य त्यांच्यात पुष्कळ आहे.
हे सर्व लिहितांना आनंद वाटत होता. ‘असे जावई भेटणे’, हे आमचे पूर्वसुकृत आहे. ‘त्यांची उत्तरोत्तर आध्यात्मिक प्रगती होवो’, ही श्री गुरुचरणी प्रार्थना !’
– श्री. दत्तात्रेय कुलकर्णी (आध्यात्मिक पातळी ६७ टक्के, वय ८० वर्षे) आणि सौ. सुलभा कुलकर्णी (आध्यात्मिक पातळी ६५ टक्के, वय ७५ वर्षे), सांगली (३०.१०.२०२४)
|