मुंबई – १५ नोव्हेंबर या दिवशी ‘दक्षिण काशी’ म्हणून ओळखल्या जाणार्या मुंबईतील वाळकेश्वर येथील बाणगंगेची कार्तिक पौर्णिमेला २५ सहस्रांहून अधिक भाविकांनी एकत्रित महाआरती केली. या वेळी भाविकांनी बाणगंगेमध्ये आणि बाणगंगेच्या काठावर सहस्रावधी दीप अर्पण करून आशीर्वाद घेतला. वाराणसी येथील श्री काशी मठ संस्थानचे मठाधिपती प.पू. श्रीमद् साम्यमिंद्र तीर्थस्वामी यांची वंदनीय उपस्थिती या सोहळ्याला लाभली. गौड सारस्वत ब्राह्मण टेंपल ट्रस्ट आणि मुंबई महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
या वेळी ढोल-ताशे, टाळ, झांज, शंखनाद, डमरू आदी पारंपरिक वाद्यांच्या गजरात बाणगंगेची धूप-दीप महाआरती करण्यात आली. भाविकांनी ‘हर हर महादेव’चा जयघोष करत बाणगंगेचे दर्शन घेतले. ‘शिवतांडव’ स्तोत्रावर नृत्य करून या वेळी भगवान शिवाला वंदन करण्यात आले. या वेळी ‘ऊर्जा फाऊंडेशन’चे अध्यक्ष डॉ. विजय जंगम (स्वामी) यांच्या संस्कृत पाठशाळेतील ११ जंगम स्वामी शास्त्रीगण यांनी तब्बल ५ मिनिटांचा शंखनाद केला. या वेळी बाणगंगेच्या काठावर सहस्रावधी दिव्यांची आरास करण्यात आली होती. या कार्यक्रमात गौड सारस्वत ब्राह्मण टेंपल ट्रस्टचे अध्यक्ष श्री. प्रवीण कानविंदे, सरचिटणीस श्री. शशांक गुलगुले, मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. ऋत्विक औरंगाबादकर, ‘ऊर्जा फाऊंडेशन’चे अध्यक्ष डॉ. विजय जंगम (स्वामी) उपस्थित होते.
‘बाणगंगा कॉरिडॉर’साठी शासनाला सर्वतोपरी सहकार्य करू ! – ऋत्विक औरंगाबादकर, मुख्य कार्यकारी अधिकारी, गौड सारस्वत ब्राह्मण टेंपल ट्रस्ट
बाणगंगा हे तीर्थक्षेत्र समस्त हिंदूंसाठी श्रद्धेचे स्थान आहे. ११ व्या शतकात शीलाहार राजाने या मंदिराचा जीर्णाेद्धार केला होता. १७ व्या शतकात पोर्तुगिजांनी हे मंदिर पाडले. येथे प्रभु रामचंद्रांनी वाळूपासून शिवपिंड सिद्ध केली; म्हणून येथील शिवपिंड ‘वाळुकेश्वर’ नावाने प्रसिद्ध झाली. राज्यसंरक्षित स्मारक म्हणून या स्थानाला ‘अ’ दर्जा प्राप्त आहे. त्यामुळे या ठिकाणी रस्ता, वाहनतळ या सुविधा निर्माण करण्यासाठी सरकारने लक्ष द्यावे. बाणगंगा हे पर्यटनक्षेत्र नसून तीर्थक्षेत्र आहे. वाराणसीप्रमाणे येथे बाणगंगा कॉरिडॉर (सुसज्ज महामार्ग) निर्माण होणे आवश्यक आहे. यासाठी ‘गौड सारस्वत ब्राह्मण टेंपल ट्रस्ट’कडून शासनाला सर्वतोपरी सहकार्य केले जाईल.