(‘गोवा इन्क्विझिशन’ म्हणजे गोव्यातील धर्मच्छळ)
डिचोली, १७ नोव्हेंबर – हिंदु राष्ट्र समन्वय समितीच्या वतीने बोर्डे, डिचोली येथील श्री रवळनाथ सभागृहात नुकतेच एका विशेष कार्यक्रमाचे आयोजन करून ‘गोवा इन्क्विझिशन’चा इतिहास उलगडण्यात आला. या कार्यक्रमाद्वारे ‘गोवा इन्क्विझिशन’च्या माध्यमातून गोमंतकियांवर करण्यात आलेल्या अत्याचाराच्या स्मृतींना उजाळा देण्यात आला. या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी या नात्याने शिवप्रेमी तथा इतिहासतज्ञ श्री. सचिन मदगे आणि प्रमुख पाहुणे या नात्याने श्री. मुकुंद कवठणकर यांची उपस्थिती होती.
कार्यक्रमाचा प्रारंभ मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून झाला. या वेळी श्री. मुकुंद कवठणकर यांनी ‘गोवा इन्क्विझिशन’चा विषय कार्यक्रमात घेण्यामागील कारण स्पष्ट केले. ते म्हणाले, ‘‘ऐतिहासिक पुरावे, दस्तऐवज (कागदपत्रे) आणि त्या काळातील परिस्थिती यांचा अभ्यास केल्यास त्या काळी हिंदूंवर झालेल्या अन्यायाची माहिती मिळू शकते. छत्रपती संभाजी महाराज यांनी खर्या अर्थाने पोर्तुगिजांच्या विरोधातील लढाई जिंकली होती; मात्र चुकीचा इतिहास मांडून ‘जुने गोवे येथील फ्रान्सिस झेवियरच्या शवाला केलेली प्रार्थना फलद्रूप ठरली’, असे सांगितले जाते. या कालावधीत छत्रपती संभाजी महाराज यांनी केलेल्या पराक्रमामुळे आपण ‘शंभू प्रताप दिन’ साजरा केला पाहिजे.’’
कार्यक्रमाच्या प्रारंभी श्री. गोविंद चोडणकर यांनी उपस्थितांचे स्वागत करून प्रस्तावना मांडली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. राहुल वझे यांनी केले.
कार्यक्रमात संमत झालेले ठराव
१. गोव्यात इन्क्विझिशन लादल्याबद्दल ख्रिस्त्यांचे सर्वाेच्च धर्मगुरु पोप यांनी गोमंतकियांची क्षमा मागितली पाहिजे.
२. ‘गोवा इन्क्विझिशन’चा अभ्यास शालेय अभासक्रमात समाविष्ट करावा.
३. जुने गोवे येथील ऐतिहासिक ‘हात कातरो खांबा’ला राष्ट्रीय स्मारक म्हणून घोषित करून त्याचे जतन, संरक्षण आणि संवर्धन करावे.
४. पोर्तुगिजांनी उद्ध्वस्त केलेल्या मंदिरांची पुनर्बांधणी करावी.