कीर्तनाचा प्रसार होण्यासाठी आधुनिक सामाजिक माध्यमांचा वापर होणे आवश्यक !

‘गोमंतक संत मंडळ संचालित फोंडा कीर्तन विद्यालयाच्या वतीने आयोजित ३४ व्या निवासी कीर्तन प्रशिक्षण शिबिरातील परिसंवादातील सूर

डावीकडून सौ. दीपा मिरींगकर, श्री. सत्यविजय नाईक, प्राचार्य (डॉ.) मनोज कामत, प्रा. क्षितिज पाटुकले, श्री. सागर जावडेकर आणि श्री. राजेंद्र देसाई

फोंडा, १० नोव्हेंबर (वार्ता.) – आजच्या आधुनिक काळातही कीर्तनाच्या माध्यमातून समाजाचे प्रबोधन प्रभावीपणे होत असते. कीर्तनकारांनी आजच्या प्रश्नांना सुसंगत ठरतील अशाच दृष्टीकोनातून वेद, पुराण किंवा संतांचे विचार मांडल्यास ते अधिक सयुक्तिक ठरणार आहे, तसेच कीर्तनाचा प्रसार नवीन पिढीपर्यंत होण्यासाठी आधुनिक सामाजिक माध्यमांचाही वापर होणे आवश्यक आहे, असा सूर म्हार्दाेळ येथे चालू असलेल्या कीर्तन प्रशिक्षण शिबिरातील परिसंवादातून व्यक्त झाला.

गोमंतक संत मंडळ संचालित फोंडा कीर्तन विद्यालयाच्या वतीने ३४ वे निवासी कीर्तन प्रशिक्षण शिबिर म्हार्दाेळ येथील श्री महालसा संस्थानच्या सभागृहात आयोजित करण्यात आले आहे. या शिबिरामध्ये ९ नोव्हेंबर या दिवशी ‘कीर्तनातून समाज प्रबोधन’ या विषयावर परिसंवाद झाला. या परिसंवादामध्ये अध्यक्षस्थान पुणे येथील ‘कीर्तन विश्व’ या ‘यू ट्यूब’ वाहिनीचे अध्यक्ष प्रा. क्षितिज पाटुकले यांनी भूषवले. या कार्यक्रमात दैनिक ‘तरुण भारत’चे निवासी संपादक श्री. सागर जावडेकर, धेंपे कॉलेज ऑफ कॉमर्सचे प्राचार्य डॉ. मनोज कामत, हिंदु जनजागृती समितीचे दक्षिण गोवा समन्वयक श्री. सत्यविजय नाईक, ‘कृतार्थ म्हार्दाेळ’चे श्री. राजेंद्र देसाई आणि लेखिका सौ. दीपा मिरींगकर यांनी सहभाग घेतला. या परिसंवादात वक्त्यांनी पुढील सूत्रे मांडली.

कीर्तनामुळे भक्तीचा प्रसार होण्याबरोबरच संस्कृतीचे रक्षणही झाले ! – डॉ. मनोज कामत

या वेळी डॉ. मनोज कामत म्हणाले, ‘‘बेने इस्रायली या ज्यू संप्रदायातील लोक नारदीय कीर्तन परंपरेच्या शैलीतून धर्मप्रचार करतात. महाराष्ट्रासह देशातील अन्य भागांतील संतांनी कीर्तनातून तत्कालीन समाजाला प्रापंचिक ज्ञान, नैतिक व्यवहार आदींचे शिक्षण दिले. समाजाच्या प्रश्नांना वाचा फोडली. संत ज्ञानदेवांपासून संत कबिरापर्यंत सर्वांनी कीर्तनाच्या माध्यमातून केवळ धर्मप्रसारच नव्हे, तर संस्कृतीचे रक्षणही केले.’’

धर्मरक्षण आणि राष्ट्र उभारणीचे कार्य कीर्तनाच्या माध्यमातून झाले ! – सौ. दीपा मिरींगकर

सौ. दीपा मिरींगकर म्हणाल्या, ‘‘एकनाथ महाराजापासून समर्थ रामदासस्वामीपर्यंतच्या सर्व संतांनी अगदी सोप्या पद्धतीने समाजप्रबोधनाचे कार्य केले. समर्थ रामदासस्वामी यांनी त्याकाळी उभारलेली शक्ती आणि भक्ती यांची उपासना केंद्रे हिंदवी स्वराज्याच्या स्थापनेसाठी पूरक ठरली. धर्मरक्षण आणि राष्ट्र उभारणीचे कार्य कीर्तनाच्या माध्यमातून झाले.’’

कीर्तनाच्या माध्यमातून शौर्याचे जागरण आवश्यक ! – सत्यविजय नाईक

भगवंताचे आणि थोर संत पुरुष यांचे गुणदान करणारा आणि शौर्याचे जागरण करणारा प्राचीन कलाप्रकार म्हणजे कीर्तन ! आज हिंदु समाजाला खर्‍या अर्थाने शौर्याचे जागरण करण्याची आवश्यकता आहे. आज हिंदु धर्मावर सातत्याने विविध आघात होत असल्याने शौर्याचे जागरण केले पाहिजे. वर्ष १८७८ मध्ये इंग्रजांनी ब्रिटीश शस्त्रास्त्र कायदा केला आणि भारतियांच्या हातातून शस्त्रे काढून घेतली. त्यानंतर स्वातंत्र्यानंतरच्या कालखंडामध्ये तत्कालीन नेत्यांनी ‘अहिंसा परमो धर्म: ।’ (अर्थ : अहिंसा हा श्रेष्ठ धर्म आहे.) हा अर्धवट श्लोक शिकवून हिंदूंच्या मनातून शस्त्र काढून घेतले आणि याच्या परिणामस्वरूप आज हिंदु समाज शौर्यहीन झाला. हिदूंना त्यांच्या सिंहत्वाची जाणीव करून देण्यासाठी कीर्तनाच्या माध्यमातून शौर्याचे आणि पराक्रमाचे जागरण केले पाहिजे. आपल्या सर्व देवतांच्या हातात शस्त्रे आहेत, तसेच आपला प्रत्येक सण हा देवतांनी असुरावर विजय मिळवल्याने साजरा करण्यात येणारा विजयोत्सव आहे. आज या सणांमध्ये प्रत्यक्षात विकृती पसरल्यामुळे शौर्याच्या ऐवजी मनोरंजन आणि मौजमजा या दृष्टीकोनातून पाहिले जाते. त्यामुळे धर्म, संस्कृती आणि राष्ट्र यांच्या रक्षणासाठी खर्‍या अर्थाने शौर्याचे जागरण आवश्यक आहे आणि ते कीर्तनाच्या माध्यमातून करायला हवे. कीर्तनाचा प्रसार करण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा म्हणजेच सामाजिक माध्यमांचा वापर मोठ्या प्रमाणात करायला हवा. या माध्यमातून जागृती होऊ शकते.

कीर्तन ही समाजप्रबोधनाची चळवळ ! – सागर जावडेकर, संपादक, तरुण भारत

दैनिक ‘तरुण भारत’चे संपादक श्री. सागर जावडेकर म्हणाले, ‘‘चारित्र्यवान, कृतीशील आणि सामर्थ्यवान समाजाच्या निर्मितीसाठी नवीन पिढीतील कीर्तनकारांनी पुढाकार घेतला पाहिजे. समाजात परिवर्तन घडवून आणणारी कीर्तन ही एक प्रभावी चळवळ आहे.

कीर्तनातून सामाजिक प्रश्न मांडतांना तंत्रज्ञानाचा उपयोग करणेही महत्त्वाचे ! – प्रा. क्षितिज पाटुकले

अध्यक्षीय विवेचनात प्रा. क्षितिज पाटुकले म्हणाले, ‘‘कीर्तनातून आजच्या समाजाचे प्रश्न मांडतांना तंज्ञज्ञानाचा उपयोग करणे तेवढेच महत्त्वाचे आहे. जगभरातील लोकांपर्यंत आपले विचार पोचवण्यासाठी कीर्तनकारांनी नवीन प्रसारमाध्यमांचा योग्य वापर करावा.’’

महान व्यक्तींचे कार्यही समाजापुढे मांडणे आवश्यक ! – राजेंद्र देसाई

श्री. राजेंद्र देसाई म्हणाले, ‘‘आजच्या काळातील समाजाला चांगली दिशा देणारे उद्योगपती रतन टाटा, सिंधुताई सकपाळ आदींचे कार्य कीर्तनाच्या माध्यमातून समाजापुढे मांडणे आवश्यक आहे.’’

शिबिराचे मार्गदर्शक तथा कीर्तनकार सुहासबुवा वझे यांनी परिसंवादाचे प्रयोजन प्रास्ताविक भाषणात सांगितले.