Malegaon blasts case : जिवंत राहिले, तर न्यायालयात उपस्थित राहीन ! – साध्वी प्रज्ञा सिंह, माजी खासदार

माजी खासदार साध्वी प्रज्ञा सिंह यांची न्यायालयाच्या वॉरंटवर प्रतिक्रिया !

माजी खासदार साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर

भोपाळ (मध्यप्रदेश) – मुंबईच्या राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेच्या (एन्.आय.ए.च्या) न्यायालयाने वर्ष २००८ च्या मालेगाव स्फोटाच्या प्रकरणात माजी खासदार साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर यांच्या विरोधात जामीनपात्र वॉरंट जारी केले आहे. ‘हे वॉरंट १३ नोव्हेंबरपर्यंत परत केले जाऊ शकते. यासाठी प्रज्ञा सिंह यांना न्यायालयात यावे लागेल आणि ते रहित करावे लागेल’, असे म्हटले आहे.

यावर साध्वी प्रज्ञा सिंह यांनी स्वतःचे एक छायाचित्र शेअर करत ‘एक्स’वर पोस्ट करत म्हटले, ‘काँग्रेसने केलेला छळ केवळ आतंकवादविरोधी पथकाच्या कोठडीपर्यंतच नाही, तर माझ्या आयुष्यभरासाठीच्या त्रासाचे कारण बनला आहे. मेंदूला सूज, डोळ्यांनी कमी दिसणे, कमी ऐकू येणे, बोलण्यात असंतुलन, ‘स्टेरॉईड्स’ आणि ‘न्यूरो’ यांच्या औषधांमुळे संपूर्ण शरीरावर सूज या त्रासांवर एका रुग्णालयात उपचार चालू आहेत. जिवंत राहिले, तर नक्कीच न्यायालयात जाईन.’

मालेगाव स्फोटाच्या प्रकरणात प्रज्ञा सिंह ठाकूर यांना या वर्षी मार्चमध्येही न्यायालयाने अटक वॉरंट जारी केले होते. वैद्यकीय कारणास्तव त्या गेल्या काही महिन्यांपासून न्यायालयात उपस्थित झालेल्या नाहीत.