मुंबई – राज्याच्या ३७ विधानसभा मतदारसंघांतील ४० बंडखोरांवर कारवाई करण्यात आली आहे. पक्षाचा आदेश डावलून शिस्तभंग केल्याप्रकरणी ४० नेत्यांची भाजपमधून हकालपट्टी करण्यात आली आहे. बंडखोरी करणार्यांमध्ये नंदमेर्याचे तुषार भारतीय, नालासोपारा येथे हरिश भगत, मागठाणे येथे गोपाल जव्हेरी, सावंतवाडीचे विशाल परब, श्रीगोंदा येथील सुवर्णा पाचपुते, अक्कलकोटचे सुनील बंडगर, अमरावती येथे जगदीश गुप्ता, साकोली येथे सोमदत्त करंजकर यांच्यासह एकूण ४० जणांवर पक्षाकडून कारवाई करण्यात आली आहे.
विधानसभा निवडणुकीत महायुतीच्या तीनही पक्षांमध्ये सर्वाधिक बंडखोरी दिसून आली आहे. त्यात भाजपमध्ये बंडखोरांची संख्या अधिक आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी बंडखोरांवर कारवाई करण्याचे संकेत दिले होते. त्यानुसार कारवाई करण्यात आली. ४ नोव्हेंबर या दिवशी उमेदवारी अर्ज मागे घेण्याची शेवटची मुदत असतांनाही अनेक बंडखोर त्यांच्या भूमिकेवर ठाम होते.