‘श्री गुरूंच्या कृपेने मला देवद (पनवेल) येथील सनातन संस्थेच्या आश्रमातील संत पू. शिवाजी वटकर (सनातनचे १०२ वे (समष्टी) संत, वय ७८ वर्षे) यांचा अनमोल सत्संग मिळत आहे. पू. वटकरकाकांची मला जाणवलेली गुणवैशिष्ट्ये मी शब्दांत मांडण्याचा प्रयत्न करते.
१. सर्वांप्रती समभाव असणे आणि सतत साधकांच्या हिताचा विचार करणे
अनुमाने १० वर्षांपूर्वी कल्याण (ठाणे) येथे मी माझ्या नातेवाइकांसमवेत ‘हिंदु धर्मजागृती सभे’च्या सेवेला गेले होते. तिथे हिंदु जनजागृती समितीचे आणि त्या सभेचे त्या वेळेचे समन्वयक श्री. शिवाजी वटकर यांच्याशी माझी ओळख झाली. ते सेवेत व्यस्त असूनही पहिल्या भेटीतच त्यांनी माझी आपुलकीने विचारपूस केली. त्यांना त्यांच्या सहसाधकांना हाताळतांना पाहिल्यावर मला पू. काकांमधील ‘सर्वांप्रती समभाव असणे आणि सतत साधकांच्या हिताचा विचार करणे’, हे त्यांच्यातील गुण जवळून अनुभवता आले.
२. श्री तुळजाभवानीमातेच्या कृपेनेच साधिकेचे पू. वटकरकाकांशी आध्यात्मिक नाते जोडले जाणे
पू. काकांचा माझ्याशी पहिला भ्रमणभाषवरील संपर्क श्री तुळजाभवानीदेवीच्या मंदिरात देवीचे दर्शन घेत असतांना झाला. त्या वेळी पू. काकांचे संतपद घोषित झाले नव्हते, तरीही देवीचे दर्शन घेणे आणि पू. काकांशी बोलणे यात मला समान आनंद मिळाला. तेव्हा ‘श्री तुळजाभवानीमातेच्या कृपेनेच माझे पू. काकांशी आध्यात्मिक नाते जोडले गेले’, असे मला जाणवले.
३. आध्यात्मिक स्तरावरील पितृवत नाते निर्माण होणे
पू. काकांचे आणि माझे तसे मायेतील कोणतेच नाते नाही. पू. काका अनुभव, वय आणि पद या सर्वांतच मोठे आहेत, तरीही पू. काका मागील १० वर्षांपासून मला एक साधिका या नात्याने आठवणीने अधूनमधून स्वतःहून भ्रमणभाषवरून संपर्क करतात. ते मी आणि माझे कुटुंबीय यांची आवर्जून विचारपूस करून माझी सेवा अन् साधना यांच्या प्रयत्नांविषयी स्वतःहून जाणून घेतात. मी रहात असलेल्या सोलापूर शहरात पू. काकांचे एक जवळचे साधकमित्र रहातात. पू. काकांनी मला त्यांची ओळख करून दिली आणि ‘कोणत्याही प्रकारचे साहाय्य लागत असेल, तर कधीही मला सांगू शकता’, असे सांगून आश्वस्त केले. पू. काकांच्या या प्रेमभावामुळे त्यांच्याविषयी मला आपसुकच ‘मी जणू त्यांची मुलगी आहे आणि ते माझे बाबा आहेत’, असे एक आध्यात्मिक स्तरावरील पिता-पुत्रीचे नाते आमच्यात निर्माण झाले.
४. पू. वटकरकाकांनी केलेल्या आध्यात्मिक स्तरावरील मार्गदर्शनाचा साधना आणि व्यवहार यांमध्ये लाभ होणे अन् त्यांच्याप्रती श्रद्धा वाढणे
मी आणि माझी लहान बहीण कु. किरण गोव्यातील सनातनच्या रामनाथी येथील आश्रमात पूर्णवेळ साधना करत आहोत. पूर्वी काही कौटुंबिक प्रसंगांत आम्हा दोघींचे किंवा कुटुंबियांचे मतभेद होऊन आमच्या मनाचा संघर्ष होत असे. याविषयी आम्ही पू. काकांना सांगितल्यावर ते आम्हाला मार्गदर्शन करतांना म्हणायचे, ‘‘दोघांमध्ये मतभेद होत असतांना, जो कमीपणा आणि माघार घेईल, तो साधनेत पुढे जाईल. आपण स्वेच्छेपेक्षा परेच्छेला महत्त्व दिल्याने आपली साधना होईल.’’ या त्यांच्या शिकवणीचा मला आणि माझ्या बहिणीला साधना आणि व्यवहार यांत पुष्कळ लाभ झाला. जेव्हा आमच्या कुटुंबियांत एकमत होत नसे, तेव्हा पू. काकांचे ते बोल आम्हाला आठवायचे आणि आम्ही दोघी किंवा आमच्या पैकी एक जण माघार घ्यायचो. त्या वेळी आम्ही पू. काकांच्या वाक्यातील किमया (जादू) अनुभवायचो. त्यामुळे आम्हा दोघींची पू. काका यांच्यावरील श्रद्धा दृढ झाली.
५. पू. काकांनी पित्याप्रमाणे आधार देणे आणि त्यांच्या मार्गदर्शनामुळे दोघी बहिणींमध्ये मायेच्या नात्याऐवजी आध्यात्मिक मैत्रीचे नाते बनणे
मी कु. किरणची मोठी बहीण आहे. ‘माझे बहिणीविषयी दायित्व कसे असायला हवे ?’, याविषयी पू. काका नेहमीच मला सहज समजेल आणि मन अन् बुद्धी यांच्या स्तरावर ग्रहण होईल, असे समजावून सांगतात. पू. वटकरकाका, म्हणजे एखाद्या मुलीचे बाबा जसे पदोपदी तिच्या पाठीशी उभे असतात, अगदी तसेच माझ्या समवेत असतात. पू. काकांच्या आध्यात्मिक स्तरावरील मार्गदर्शनामुळे मी आणि माझी बहीण केवळ नात्यातील बहिणी न रहाता चांगल्या आध्यात्मिक मैत्रिणी बनलो आहोत. यासाठी मी पू. काकांच्या चरणी आजन्म कृतज्ञ राहीन.
६. पू. वटकरकाकांनी साधिकेच्या कुटुंबियांना साधनेसाठी प्रेरणादायी सूत्रे सांगणे आणि त्यामुळे साधिकेच्या आईची सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्यावरील श्रद्धा दृढ होणे
मी सोलापूर येथे आईसमवेत असतांना पू. वटकरकाकांचा भ्रमणभाषवरून संपर्क व्हायचा. तेव्हा ते माझ्या आईशीही बोलायचे. ते आईची विचारपूस करून साधना करण्याविषयी सांगायचे. ‘मला आणि माझ्या बहिणीला पूर्णवेळ साधनेसाठी रामनाथी आश्रमात जाऊ दिले’, हा आईचा मोठा त्याग आहे आणि ईश्वर आईला नक्कीच त्यागाचे फळ देणार आहे’, अशी साधनेसाठी प्रेरणादायी सूत्रे पू. काका आम्हाला सांगायचे. त्यामुळे आईची सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्यावरील श्रद्धा दृढ होत गेली.
७. ‘गुरूंना काय अपेक्षित आहे ? आणि साधकाने काय करायला हवे ?’, हे तिळमात्र कर्तेपणा न घेता ‘साधक साधनेत पुढे जावेत’, या तळमळीने त्यांना प्रोत्साहन देणे
पू. वटकरकाकांना संपर्क केल्यावर माझ्या मनातील अडचणी आणि विचार त्यांना न सांगता त्यांच्या लक्षात येतात. ‘साधकाच्या जीवनातील प्रत्येक टप्प्यावर आलेल्या अडचणीला परम पूज्य डॉक्टर कसे साहाय्य करतात ?’, हे पू. काकांनी प.पू. डॉक्टरांच्या समवेत राहून प्रत्यक्ष अनुभवले आहे. त्यामुळे ‘गुरूंना काय अपेक्षित आहे ? आणि साधकाने काय करायला हवे ?’, हे पू. काकांच्या लगेच लक्षात येते. तेव्हा पू. काका स्वतःकडे तिळमात्र कर्तेपणा न घेता साधकाला कौशल्याने, वात्सल्याने, तळमळीने, आत्मियतेने आणि ‘साधक साधनेत पुढे जायला पाहिजे’, या एकाच विचाराने साधकांशी बोलतात. पू. काकांमधील वात्सल्यभावाचा अनुभव मला नेहमीच अनुभवता येतो.
८. उच्च कोटीचे साधकत्त्व आणि शिष्यत्व असूनही सनातनच्या तिन्ही गुरूंप्रती अपार श्रद्धा अन् भाव असणे
आतापर्यंत पू. वटकरकाकांनी सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्यावर ‘कविता रचणे, प.पू. गुरुदेवांकडून शिकायला मिळालेली सूत्रे आणि आलेल्या अनुभूती यांवर लेख लिहिणे’ अशा अनेक सेवा केल्या आहेत. त्यांनी प.पू. गुरुदेवांच्या प्रत्यक्ष सहवासातील प्रत्येक क्षणमोती कृतज्ञताभावाने आणि एका सामान्य साधकाप्रमाणे निरागस शब्दांत लिहून दिले आहेत. यावरून पू. वटकरकाकांमधील उच्च कोटीचे साधकत्त्व आणि शिष्यत्व लक्षात येते. ‘सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले, श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ आणि श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ या सनातनच्या तिन्ही गुरूंवर अपार श्रद्धा ठेवायला हवी’, असे ते मला नेहमी सांगतात. पू. काका स्वत: संत असून, तसेच वय आणि अनुभव यांनी मोठे असूनही ‘मी परम पूज्य डॉक्टरांचा साधक आहे’, असाच भाव ठेवतात. ‘गुरूंची भक्ती कशी करावी ?, याचे सुंदर उदाहरण म्हणजे पू. वटकरकाका !’, असे मला वाटते.
पू. काका म्हणजे ओघवत्या वाणीने ‘परम पूज्य गुरुदेवच आपला एकमेव आधार आहेत’, हे साधकांच्या मनावर बिंबवून साधकांची श्रद्धा वाढवणारे एक संतरत्न आहेत. संत तुकाराम महाराज यांच्यासारखे उदार संत पू. वटकरकाका यांच्या चरणी माझा शिरसाष्टांग नमस्कार ! ‘सच्चिदानंद परब्रह्म गुरुदेवांमुळे पू. वटकरकाका संत म्हणून मला लाभले’, हे माझे भाग्यच आहे. त्याविषयी मी गुरुदेवांच्या चरणी कोटीशः कृतज्ञता व्यक्त करते.’
कु. गीता व्हटकर, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१५.१०.२०२४)
• येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |