Pawan Kalyan Greets Hindus Abroad : आंध्रप्रदेशाचे उपमुख्यमंत्री पवन कल्याण यांनी पाकिस्तान, बांगलादेश आणि अफगाणिस्तान येथील हिंदूंना दिल्या दिवाळीच्या शुभेच्छा !

आंध्रप्रदेशाचे उपमुख्यमंत्री पवन कल्याण

अमरावती (आंध्रप्रदेश) – पाकिस्तान, बांगलादेश आणि अफगाणिस्तान देशांमध्ये रहाणार्‍या हिंदूंना दिवाळीच्या माझ्याकडून हार्दिक शुभेच्छा. बांगलादेशमध्ये रहाणार्‍या हिंदूंना या सणानिमित्त विशेष अभिनंदन ! भगवान श्रीराम तुम्हाला या परिस्थितीत शक्ती आणि धैर्य देवो. आम्ही सर्व तुमच्या सुरक्षिततेची इच्छा करतो, अशा शब्दांत आंध्रप्रदेशाचे उपमुख्यमंत्री पवन कल्याण यांनी पाकिस्तान, बांगलादेश आणि अफगाणिस्तान येथे रहाणार्‍या हिंदूंना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या.

पवन कल्याण यांनी जागतिक समुदाय आणि जागतिक नेते पाकिस्तान अन् बांगलादेश यांमध्ये हिंदूंच्या संरक्षण आणि मूलभूत हक्कांसाठी त्यांच्याशी संपर्क साधतील, अशी अपेक्षाही व्यक्त केली. त्यांनी पुढे म्हटले की, आज दिवाळीच्या दिवशी आपण सर्वांनी बांगलादेश आणि पाकिस्तान यांमध्ये छळ होत असलेल्या हिंदूंच्या सुरक्षेसाठी प्रार्थना केली पाहिजे. त्यांच्या भूमीत धर्माची पुनर्स्थापना करूया.

उपमुख्यमंत्र्यांनी एका हिंदु मुलाच्या गाण्यावर पोस्ट करत लिहिले की, पाकिस्तानमधील एका हिंदु मुलाचे हे गाणे फाळणीच्या तीव्र वेदना आणि भारताच्या आत्म्याशी पुन्हा जोडण्याची तळमळ दर्शवते. पाकिस्तानमधील हा हिंदु मुलगा ‘अलबेलो इंडिया’ म्हणत असून ते सिंधी गाणे आहे. त्याचा अर्थ असा आहे – ‘माझा हिंदू शेजारी अलबेलो भारताला मार्गस्थ होत आहे. तो या शुक्रवारी रेल्वेमध्ये चढेल आणि परत कधीच पाकिस्तानला परतणार नाही.’

संपादकीय भूमिका

भारतातून केवळ एकाच हिंदु नेत्याने या हिंदूंसाठी शुभेच्छा दिल्या, हे अन्य हिंदु नेत्यांना लज्जास्पदच होय ! या देशांतील हिंदूंना शुभेच्छा देण्यासह त्यांच्या रक्षणासाठीही हिंदु नेत्यांनी प्रयत्न करणे आवश्यक झाले आहे !