विरोध असूनही हणजूण कोमुनिदादची ३ मोठ्या कार्यक्रमांना मान्यता

(कोमुनिदाद ही गावकर्‍यांची पोर्तुगीजकालीन संस्था)

पणजी, २८ ऑक्टोबर (वार्ता.) – स्थानिकांचा विरोध असूनही हणजूण कोमुनिदादच्या २७ ऑक्टोबर या दिवशी झालेल्या सर्वसाधारण सभेत कोमुनिदाद भूमीत ३ मोठ्या ‘इव्हेंट’चे (कार्यकमांचे) आयोजन करण्यास मान्यता देण्यात आली. याविषयी अधिक माहिती देतांना हणजूण कोमुनिदादचे अध्यक्ष डॉमिंगोस परेरा म्हणाले, ‘‘कोमुनिदादच्या  सर्वसाधारण सभेने ‘इंडिया बाईक वीक’ (भारत दुचाकी सप्ताह), ‘टी.व्ही.एस्. मोटोसोल आणि एक्स्पो’ आणि ‘म्युझिक कन्सर्ट’ (संगीताचा कार्यक्रम) यांना मान्यता दिली आहे. हे ‘इव्हेंट’ चालू वर्षी डिसेंबर मासात किंवा पुढील वर्षी जानेवारी मासात होणार आहेत. सभेने ‘बॉलीवूड नाईट’ या कार्यक्रमाला मान्यता दिलेली नाही. त्यांच्या आयोजकांनी ‘इव्हेंट’ कुठे होणार आहे, याविषयी स्पष्ट माहिती दिलेली नसल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे.’’ विशेष म्हणजे कोमुनिदादची सभा चालू असतांना सभा चालू असलेल्या सभागृहाच्या बाहेर स्थानिकांनी हणजूण-वागातोर येथील कोमुनिदादची भूमी ‘सनबर्न’सारख्या कुठल्याही संगीत रजनी कार्यक्रमाला न देण्याची मागणी करण्यासाठी निदर्शने केली.