Bomb Threat : विमानांनंतर आता उपाहारगृहांना बाँबस्फोटाच्या धमक्या

  • आंध्रप्रदेशातील १३, उत्तरप्रदेशातील ९, तर गुजरातमधील १० उपाहारगृहांना धमकी

  • सर्व धमक्या खोट्या निघाल्या

तिरुपती (आंध्रप्रदेश) – येथील २ उपाहारगृहांत बाँबस्फोट करण्याची धमकी देणारा ई-मेल २७ ऑक्टोबरला मिळाला. यानंतर तात्काळ दोन्ही उपाहारगृहे रिकामी करण्यात आली. बाँबशोधक आणि श्‍वान पथक यांनी तपासणी केल्यानंतर ही धमकी खोटी असल्याचे समोर आले.

तिरुपतीचे पोलीस अधीक्षक एल्. सुब्बारायुडू म्हणाले की, सायबर गुन्हे शाखा या प्रकरणाचे अन्वेषण करत आहे. गेल्या ३ दिवसांत तिरुपतीमधील ७ उपाहारगृहांना बाँबस्फोटांच्या खोट्या धमक्या मिळाल्या आहेत.

लक्ष्मणपुरीमधील ९ उपाहारगृहांनाही बाँबची खोटी धमकी

२८ ऑक्टोबरलाच उत्तरप्रदेशाची राजधानी लक्ष्मणपुरी येथील ९ उपाहारगृहांनाही बाँबस्फोटाची धमकी मिळाली. सकाळी १० वाजता उपाहारगृहांना धमकीचा ई-मेल प्राप्त झाला. त्यात लिहिले होते की, तुमच्या उपाहारगृहाच्या मैदानात काळ्या पिशवीत बाँब आहे. ५ सहस्र ५०० सहस्र डॉलर (५० लाख रुपये) पाठवा, नाहीतर उपाहारगृह बाँबने उडवून देईन. सगळीकडे रक्त पसरेल. बाँब निकामी करण्याचा कोणताही प्रयत्न यशस्वी होणार नाही. पडताळणी केल्यानंतर धमक्या खोट्या असल्याचे निष्पन्न झाले. लक्ष्मणपुरीमधील फॉर्च्युन उपाहारगृहाला सलग ३ दिवस बाँबची धमकी मिळाली.

गुजरातमधील १० उपाहारगृहांनाही धमक्या !

राजकोट येथील १२ उपाहारगृहांना २६ ऑक्टोबरला धमकीचे ईमेल पाठवण्यात आले होते. इम्पीरियल पॅलेस, सयाजी हॉटेल, सीझन्स हॉटेल, हॉटेल ग्रँड रीजन्सी यांसारख्या पंचतारांकित उपाहारगृहांचाही यात समावेश होता. अन्वेषणानंतर या सर्व धमक्या खोट्या ठरल्या.

संपादकीय भूमिका

अशा प्रकारे देशामध्ये भय आणि अस्थिरता निर्माण करण्यामागे जिहादी आतंकवादी अथवा खलिस्तानवादी हेच असणार ! अशांना वठणीवर आणण्यासाठी सुरक्षायंत्रणा सक्षम आहेत, हे धमक्या देणार्‍यांनी लक्षात ठेवावे !