Bangladesh Hindu March : चितगाव (बांगलादेश) येथे सहस्रो हिंदूंनी काढला प्रचंड मोठा मोर्चा !

बांगलादेश सरकारकडे केल्या ८ मागण्या

मोर्चामध्ये प्रचंड संख्येने उपस्थित हिंदू

चितगाव (बांगलादेश) – ‘सनातन जागरण मंच’ या संघटनेने २६ ऑक्टोबरला येथे अल्पसंख्यांकांचे संरक्षण आणि हक्क मागण्यासाठी एक विशाल मोर्चा काढला. येथील ऐतिहासिक लालदिघी मैदानावर सभाही झाली. अल्पसंख्य हिंदूंनी ८ प्रमुख मागण्यांविषयी आवाज उठवला. ‘जोपर्यंत बांगलादेश सरकार या मागण्या पूर्ण करत नाही, तोपर्यंत आंदोलन चालूच रहाणार’, असा पवित्रा हिंदूंनी घेतला.

मोर्चामध्ये प्रचंड संख्येने उपस्थित हिंदू

हिंदूंनी केलेल्या मागण्या –

१. अल्पसंख्याकांवरील गुन्ह्यांत सहभागी असलेल्यांवर खटला चालवण्यासाठी न्यायाधिकरणाची स्थापना करावी.

२. पीडितांना भरपाई देऊन त्यांचे पुनर्वसन करावे.

३. अल्पसंख्यांक संरक्षण कायदा लागू करावा.

४. अल्पसंख्यांक व्यवहार मंत्रालयाची स्थापना करावी.

५. शैक्षणिक संस्था आणि वसतीगृहे यांमध्ये अल्पसंख्यांकांसाठी प्रार्थनास्थळे अन् प्रार्थना कक्ष बांधण्यात यावेत.

६. हिंदू, बौद्ध आणि ख्रिस्ती वेलफेअर ट्रस्टला प्राधान्य दिले पाहिजे.

७. मालमत्ता हस्तांतरण कायदा लागू करावा.

८. पाली आणि संस्कृत शिक्षण मंडळाचे आधुनिकीकरण अन् श्री दुर्गापूजेच्या काळात ५ दिवस सुट्टी द्यावी.

दुर्गापूजेला २ दिवस सुट्टी !

बांगलादेशाचे अंतरिम सरकारमधील पर्यावरणमंत्री सय्यद रिजवाना हसन यांनी हिंदु समाजाच्या मागण्यांना प्रतिसाद देत प्रथमच श्री दुर्गापूजेसाठी २ दिवसांची सुट्टी घोषित केली. बांगलादेशात शेख हसीना ५ ऑगस्ट या दिवशी पदावरून पायउतार झाल्यानंतरचे हिंदूंचे हे सर्वांत मोठे आंदोलन आहे. अल्पसंख्यांकांच्या अधिकारांच्या संरक्षणाचे आश्‍वासन अंतरिम सरकारने दिले असले, तरी या काळात अल्पसंख्यांकांची लूटमार करणे, शारीरिक इजा करणे, तसेच अल्पसंख्यांनांच्या मालमत्तेची तोडफोड करणे, अशा घटनाही वाढल्या आहेत.

संपादकीय भूमिका

बांगलादेशातील हिंदूंना लक्षात आले आहे की, स्वतःच्या संरक्षणासाठी स्वतःच संघटित होऊन प्रयत्न करणे आवश्यक आहे. त्यांच्या सुरक्षेसाठी भारतातून किंवा अन्य देशांतून कुणीही साहाय्य करणार नाही, हे त्यांच्या लक्षात आले आहे. बांगलादेशातील हिंदूंकडून जगभरातील हिंदूंनी शिकणे आवश्यक झाले आहे !