खालापूर नायब तहसीलदारांकडे निवेदनाद्वारे मागणी
खालापूर (जिल्हा रायगड) – तिरुपती येथील प्रसादाच्या लाडूंमध्ये प्राण्यांच्या चरबीयुक्त तेलाचा वापर झाल्याचे समोर आल्यावर या घटनेची सखोल चौकशी करावी आणि दोषींवर कठोर कारवाई व्हावी, यासाठी नायब तहसीलदार खालापूर (जिल्हा रायगड) श्री. मिलिंद तिर्हेकर यांना निवेदन देण्यात आले. या वेळी महाराष्ट्र मंदिर महासंघाचे कार्यकर्ते आणि हिंदुत्वनिष्ठ उपस्थित होते. तहसीलदारांच्या माध्यमातून निवेदनाची प्रत पंतप्रधान नरेंद्र मोदी, तसेच आंध्रप्रदेश राज्याचे मुख्यमंत्री यांना देण्यात आली.
निवेदनात केलेल्या मागण्या
१. प्रत्येक मंदिरामध्ये देण्यात येणारा प्रसाद सात्त्विक, शुद्ध, पवित्र तर असावाच; मात्र तो बनवण्यापासून वितरण व्यवस्थेतील प्रत्येक जणही धर्मपरायण हिंदु असावा.
२. देशभरातील सर्वच मंदिरांमध्ये अशा प्रकारे धर्मभ्रष्टता वा हिंदु धर्मविरोधी कृती तर होत नाहीत ना, याची पडताळणी करण्यात यावी.
३. मंदिर व्यवस्थापनातील पारदर्शकता वाढवून धार्मिक श्रद्धास्थानांचे संरक्षण करावे. तेथे अन्य धर्मीय व्यक्तींना विश्वस्त वा पदाधिकारी म्हणून नेमण्यात येऊ नये.
४. केवळ या प्रसादाच्या लाडूंच्या प्रकरणाचीच नव्हे, तर जगनमोहन रेड्डी सरकार आणि त्यांचे वडील सॅम्युअल राजशेखर रेड्डी यांच्या सरकारच्या कार्यकाळात श्री तिरुपति बालाजी मंदिराशी निगडीत घेतलेल्या सर्वच निर्णयांची सखोल चौकशी करण्यात यावी. हिंदु धर्मविरोधी निर्णय तात्काळ रहित करण्यात यावेत.
५. या गंभीर विषयाची तातडीने योग्य नोंद घेऊन तात्काळ पावले उचलावीत. धार्मिक श्रद्धांचा सन्मान राखणे, हे सरकारचे प्राथमिक दायित्व आहे. आपल्याकडून झालेल्या कार्यवाहीविषयी आम्हाला अवगत करावे.