अयोग्य नेतृत्वामुळे क्रांतीकारी संघटना आणि क्रांतीकारक यांची झालेली हानी !


स्वातंत्र्यपूर्व काळात स्वातंत्र्यप्राप्तीसाठी अनेक लहान-मोठ्या क्रांतीकारी संघटना लढल्या. त्यांच्या कथित नेत्यांच्या संवेदनाहीनतेमुळे विविध कारागृहांमध्ये खितपत पडलेले क्रांतीवीर आणि त्यांचे नातेवाईक यांना प्रचंड कष्ट भोगावे लागले, तसेच त्या संघटनांचीही मोठी हानी झाली. यातून राष्ट्र आणि धर्म यांच्या रक्षणासाठी कार्य करणार्‍या संघटनांनी बोध घेऊन त्यांच्या कार्याची ते हानी टाळू शकतात. हे सांगणारा हा लेख वाचकांसाठी देत आहोत.
(पूर्वार्ध)

१. स्वातंत्र्य मिळाल्यावर स्वातंत्र्यप्राप्तीसाठी लढणार्‍या अनेक क्रांतीकारकांकडे सरकारचे दुर्लक्ष

स्वातंत्र्यपूर्व काळात देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी अनेक लहान-मोठ्या संघटना कार्यरत होत्या. काही संघटनांमध्ये आपसांत सामंजस्य होते आणि त्या संघटनांचे लोक एकमेकांना साहाय्य करत होते; परंतु काही संघटनांमध्ये सामंजस्याऐवजी वैर होते. त्यामुळे त्यांनी एकमेकांना दगाफटका केल्याची उदाहरणे नसली, तरी आवश्यकता असतांना एकमेकांना सहकार्य केल्याचे एकही उदाहरण आढळत नाही. स्वातंत्र्यानंतर तत्कालीन नेहरू सरकारने त्यातील काही मोठ्या संघटनांची नोंद घेतली; परंतु अनेक लहान लहान संघटना या शेवटपर्यंत ‘संघटना’ होत्या, हेही कुणाला कळले नाही. त्यामुळे तत्कालीन सरकारने त्यांची नोंद घेतली नाही. त्यामुळे कित्येक क्रांतीकारक कारागृहांमध्ये सडत होते.

दीव-दमण किंवा गोवा ही पोर्तुगीज प्रभावाखालील राज्ये बरीच उशिरा स्वतंत्र झाली. उदाहरणार्थ मूळचे सांगलीचे असलेले मोहन आपटे, जे पुढे मोहन रानडे या नावाने प्रसिद्ध झाले, त्यांनी गोवा मुक्तीसंग्रामात सशस्त्र उठाव केला होता. समोरासमोरच्या लढाईत पोर्तुगीज सैनिकाची गोळी लागल्यामुळे ते पकडले गेले. त्यानंतर त्यांना पोर्तुगालच्या कारागृहात ठेवण्यात आले होते. वर्ष १९६१ मध्ये गोवा राज्य स्वतंत्र झाले; पण मोहन रानडे यांचा मात्र सत्ताधार्‍यांना विसर पडला. त्यामुळे गोवा स्वतंत्र होऊनही ४ वर्षे रानडे हे पोर्तुगालच्या कारागृहात खितपत पडले होते. ही क्रांतीकारकांची पुष्कळ मोठी शोकांतिका आहे. यातून लहान लहान उद्दिष्टांपासून अगदी विश्वव्यापी उद्दिष्टे उराशी बाळगून कार्य करणार्‍या सर्व संघटनांपर्यंत सर्वांनी बोध घेणे आवश्यक आहे. या लहान लहान क्रांतीकारी संघटनांचे क्रांतीकारक आणि त्यांचे कुटुंबीय यांना स्वतंत्र भारताच्या सत्तेत बसलेले चोर विसरलेच; पण या संघटनेतील नेत्यांना त्यांचे झालेले ‘विस्मरण’ हे अधिक दुर्दैवी आणि वेदनादायी होते.

२. प्लेगची साथ चालू असतांना संघटना प्रमुखांचे कारागृहातील क्रांतीकारकांकडे दुर्लक्ष

श्री. विक्रम भावे

साधारण वर्ष १८९६ मध्ये देशात प्लेगची साथ होती. त्या काळात भारतातील लहान लहान क्रांतीकारी संघटनांचे अनेक क्रांतीकारक इंग्रजाच्या कारागृहांमध्ये अडकून पडले होते. गावेच्या गावे ओस पडली होती. लोक जंगलात जाऊन रहात होते. अशा वेळी कोणते नातेवाईक जगले आणि कोणते मेले ?, हे कारागृहात खितपत पडलेल्या क्रांतीकारकांना कळत नव्हते. दुसरीकडे त्यांच्या नातेवाईकांचीही तीच अवस्था होती, त्यांच्या कुटुंबाचा क्रांतीकारी सदस्य कारागृहात मेला कि जिवंत आहे ?, हे कळण्याचा त्यांना मार्ग नव्हता. त्यामुळे कारागृहातील क्रांतीकारक आणि त्यांचे नातेवाईक यांच्या पाठीशी उभे रहाणे, हे त्या संघटनांच्या प्रमुख नेत्यांचे दायित्व होते. दुर्दैवाने त्या कथित प्रमुखांनी त्यांचे कर्तव्य अजिबात पार पाडले नाही, तसेच त्या कथित नेत्यांना त्यांच्या या अपराधाची खंत वाटली नाही.

यासंदर्भात कारागृहातील क्रांतीकारक आणि त्यांचे नातेवाईक यांनी सौम्य शब्दांमध्ये किंवा प्रसंगी कठोर शब्द वापरून त्या क्रांतीकारी संघटनेच्या कथित नेत्यांना त्यांच्या कर्तव्याची जाणीव करून देण्याचा प्रयत्न केला; परंतु सर्व व्यर्थ ठरले. हाच अनुभव वर्ष १९१८-१९ च्या काळात जगभरात आलेल्या ‘इन्फ्लुएन्झा’च्या साथीच्या वेळीही आला. तेव्हाही क्रांतीकारक आणि त्यांचे नातेवाईक यांनी दुर्लक्षिले जाणे, असुरक्षितता आणि असाहाय्यपणा यांचा अनुभव घेतला.

३. क्रांतीकारक आणि त्यांचे कुटुंबीय यांची आर्थिक अन् सामाजिक कुचंबणा

कारागृहात खितपत पडलेले अनेक क्रांतीकारक आणि त्यांचे कुटुंबीय यांची परिस्थिती फारच बिकट होती. आधीच इंग्रजांनी देशाची लूट चालवली होती. त्यातच १०-१२ वर्षांच्या अंतराने २ रोगांच्या साथींनी धडका दिला. त्यामुळे भारत आणि देशवासीय यांची आर्थिक घडी विस्कटून गेली होती. बेकारी, निरक्षरता, रोगराई आणि सर्वत्र संशयाचे धुके होते. अशा परिस्थितीत कारागृहांमध्ये खितपत पडलेल्या क्रांतीकारकांच्या कुटुंबियांना, तर दुर्दैवाची दशा पहावी लागत होती. क्रांतीकारक कारागृहातून सुटले, तर त्यांना कुटुंबासाठी काहीतरी करणे शक्य होते; परंतु संघटनेच्या कथित नेत्यांनी घाबरून जाऊन क्रांतीकारकांच्या सुटकेसाठी काहीही प्रयत्न केले नाहीत. त्यामुळे क्रांतीकारकांना वर्षानुवर्षे कारागृहांत सडावे लागले. त्यामुळे त्यांच्या कुटुंबियांना अनेक अडचणींचा सामना करावा लागला. समाजात वावरतांना समाजाच्या घृणित दृष्टीक्षेपांमुळे त्यांची मानसिक कुचंबणा होत होती. त्यातच काही क्रांतीकारकांचे आई-वडील किंवा कुटुंबातील सदस्य रोगाच्या साथीत मृत झाले. ती परिस्थिती फारच वेदनादायक होती. क्रांतीकारक कारागृहांत खितपत पडलेले असल्यामुळे आर्थिक अडचण होती आणि समाजाने जवळजवळ बहिष्कार घातला होता. अशा परिस्थितीत त्यांना आधाराची आवश्यकता होती; परंतु संघटनेच्या कथित नेत्यांनी बराच काळ त्यांना संपर्कही  केला नाही. त्यामुळे साहजिकच क्रांतीकारक आणि त्यांचे कुटुंबीय हवालदिल झाले होते.

४. संघटना प्रमुखांच्या असंवेदनशीलतेमुळे क्रांतीकारकांवर शिक्षा भोगण्याची वेळ

वास्तविक क्रांतीकारकांचा कारावासात गेलेला काळ हा वाया गेला होता. शेवटी क्रांतीकारकांच्या कुटंबियांनीच त्यांच्या माणसांना सोडवण्यासाठी त्यांच्या स्तरावर प्रयत्न चालू केले. त्यासाठी काही क्रांतीकारकांच्या कुटुंबियांना त्यांची वडिलोपार्जित भूमी विकावी लागली, तर काही क्रांतीकारकांच्या घरातील स्त्रियांना त्यांचे दागिने विकावे लागले. असा खटाटोप करून त्यांनी त्यांच्या माणसांना सोडवण्याचे प्रयत्न आरंभ केले. संघटनेच्या कथित नेत्यांसाठी ही सर्वांत लाजिरवाणी गोष्ट होती; मात्र त्या नेत्यांच्या वर्तनात तसे कुठेही दिसून येत नव्हते. ते त्यांच्या नेतेपदाची झूल मिरवण्यात आणि त्याची ऊब घेण्यात मग्न होते.

स्वातंत्र्यपूर्व काळात सर्वसामान्य माणसांना न्यायाधिशांपर्यंत पोचणे शक्य नसे. एखादा भारतीय मनुष्य त्यांच्यापर्यंत पोचलाच, तर क्रांतीकारकांचा खटला सुनावणीला येणेही दुरापास्त होते. या क्रांतीकारकांपैकी काही जणांवर केवळ सरकारी टपाल लुटण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप होता. त्यामुळे खटल्यातील कलमे फार गंभीर नव्हती. कदाचित् त्यामुळेच एका भारतीय न्यायाधिशासमोर तो खटला आला. त्या क्रांतीकारी संघटनेच्या कथित नेत्याचे आणि त्या भारतीय न्यायाधिशाचे गुरु एकच होते. त्यामुळे त्या खटल्यातील आरोपींसाठी ही जमेची बाजू होती. कदाचित् न्यायाधिशाला ते ठाऊक नसावे; पण त्या संघटनेचे कथित नेते आणि खटल्यातील आरोपी क्रांतीकारक यांना ते ठाऊक होते. त्यामुळे क्रांतीकारकांनी त्या कथित नेत्याला अनेक निरोप पाठवून त्याच्या गुरूंना प्रार्थना करण्याची विनंती केली की, त्यांनी त्यांच्या न्यायाधीश शिष्याला योग्य ती ‘आज्ञा’ करावी. दुर्दैवाने क्रांतीकारकांच्या त्या कथित नेत्याने तसे केले नाही. कारागृहातील क्रांतीकारकांकडून फारच दबाव आल्यावर तो कथित नेता गुरूंना भेटण्यासाठी आणि तशी प्रार्थना करण्यास सिद्ध झाला; पण तोपर्यंत विलंब झाला होता. त्या भारतीय न्यायाधिशाचे स्थानांतर झाले होते. त्या ठिकाणी आलेल्या इंग्रज न्यायाधिशाने त्या खटल्यातील सर्व क्रांतीकारकांना ३ वर्षांच्या सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली. त्या कथित नेत्याच्या गुरूंना ही गोष्ट समजल्यावर ते त्या कथित नेत्याला म्हणाले, ‘‘माझ्याकडे आधीच का नाही आलास ? मी आधीच माझ्या न्यायाधीश शिष्याला त्या क्रांतीकारकांना सोडून देण्याची आज्ञा केली असती आणि त्याने माझ्या आज्ञेचे पालनही केले असते. तुझ्या असंवेदनशीलतेमुळे त्या भारतमातेच्या सुपुत्रांना आता आयुष्यभर ३ वर्षांच्या शिक्षेचा कलंक कपाळी मिरवावा लागणार आहे.’’ दुर्दैवाने तसेच झाले. शिक्षा केवळ ३ वर्षांची झाली होती; परंतु त्यानंतर कधी कुठे गुन्ह्याची नोंद झाली की, इंग्रज पोलीस प्रथम त्या क्रांतीकारकांवर संशय घेत आणि त्यांना २-२ दिवस किंवा कधी कधी खरे गुन्हेगार सापडेपर्यंत डांबून ठेवत असत.

५. क्रांतीकारकांच्या विविध संघटनांमधील असामंजस्य

देशाला स्वातंत्र्य मिळवण्यासाठी लहान मोठ्या क्रांतीकारी संघटना लढत होत्या. त्यांचे ध्येय एकच होते; परंतु वैचारिक परिपक्वता नसल्याने काही संघटनांमध्ये ईर्षा होती. त्यामुळे  ‘आमची संघटना असतांना अन्य संघटनांची आवश्यकताच

काय ? त्यामुळे अन्य छोट्या छोट्या संघटनांनी आमच्यात विलीन व्हावे किंवा आमची शाखा म्हणून काम करावे’, असे काही मोठ्या क्रांतीकारी संघटनांना वाटत असे. काही संघटना त्यासाठी सिद्ध होत आणि तसे करतही होत्या; पण ज्या संघटना तसे करण्यास नकार देत, त्यांच्याविषयी सामाजात अपसमज निर्माण करणे, त्या क्रांतीकारी संघटनेच्या सदस्यांवर छुप्या पद्धतीने खोटेनाटे आरोप करणे, अशा गोष्टी जाणीवपूर्वक केल्या जात असत. या चुकीच्या कृतीमुळे क्रांतीकार्याची हानी होत आहे, हे कुणीही लक्षात घेत नसे.

एकदा सरकारी तिजोरी लुटण्याच्या आरोपाखाली एका लहान क्रांतीकारी संघटनेच्या १० क्रांतीकारकांना अटक झाली. खटला चालला आणि ३-४ जणांना शिक्षा सुनावण्यात येऊन अन्य निर्दोष सुटले. तेव्हा एका मोठ्या क्रांतीकारी संघटनेच्या लोकांनी त्या शिक्षा झालेल्या क्रांतीकारकांच्या कुटुंबियांना भेटून सांगितले, ‘‘त्या लहान संघटनेत असल्यामुळेच तुमची माणसे अडकली. आमच्या समवेत ती माणसे असती, तर असे झाले नसते. अजूनही विचार करा. तुमची माणसे सुटून आल्यावर त्यांना आमच्या संघटनेत सहभागी व्हायला सांगा किंवा क्रांतीकार्यापासून लांब रहायला सांगा. नाही तर पुन:पुन्हा असेच होत रहाणार.’’

(क्रमशः पुढच्या रविवारी)

– श्री. विक्रम विनय भावे, हिंदु विधीज्ञ परिषद, मुंबई.

लेखाचा पुढील भाग पाहण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा : https://sanatanprabhat.org/marathi/836435.html