कल्पवासियांचे प्रकार आणि कल्पवासाची अनन्य साधारण माहिती !

गृहस्थ आश्रमात राहून कल्पवास घेणारे, संन्यासी आणि नागा साधू, असे ३ कल्पवासी समजले जातात.

गृहस्थी कल्पवासी

गृहस्थी कल्पवासी कुंभकाळात कुंभक्षेत्रात येऊन १ मास वास करतात. यामध्ये अनेक कल्पवासी सर्व कुटुंबासह येतात. यामध्ये वडिलोपार्जित परंपरेने अनेक जण कल्पवास करतात. मुलगी लग्न करून सासरी गेल्यावरही कल्पवासाकरता १ मासासाठी कुंभक्षेत्रात येऊ शकते.

असा असतो गृहस्थी कल्पवासींचा दिनक्रम !

गृहस्थी कल्पवासी पहाटे तीर्थक्षेत्रात प्रात:, माध्यान्ह आणि सायंकाळी स्नान करतात. त्यानंतर तीर्थक्षेत्री असलेल्या ठिकाणी येऊन पूजा करतात. त्यानंतर पुरोहितांना धान्य, फळे, दक्षिणा आदी दान देऊन मगच ते आहार करतात. हे दुपारचे एक वेळचे भोजन करतात. रात्रीच्या वेळी फलाहार किंवा दूध प्राशन करतात. दिवसभर नामजप, पूजापाठ, कीर्तन-भजन श्रवण अशी त्यांची साधना असते. तरुण कल्पवासी सूर्याेदयापूर्वी स्नान करतात. वयोमानामुळे किंवा प्रकृतीच्या कारणामुळे ज्यांना पहाटे स्नान करता येत नाही, ते सूर्याेदयानंतर स्नान करतात. असे काही कल्पवासी ३ ऐवजी २ वेळा गंगास्नान करतात. एकदा कल्पवासाचा संकल्प घेतल्यानंतर कल्पवासी अन्य कुणाकडे पाणीही पित नाहीत.

– आचार्य रवि तिवारी

आचार्य रवि तिवारी

संन्यासी कल्पवासी

हे कुटुंबाचा त्याग करून संन्यास घेतात. गंगेच्या काठावर किंवा तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी राहून ते ध्यानधारणा आदी साधना करतात. संन्यासी विविध तीर्थक्षेत्री भ्रमण करून साधना करतात. हे स्वत: कुटीत अन्न शिजवतात किंवा बाहेर ते प्रसाद घेतात. प्रसाद घेण्यासाठी ते कायम स्वत:चे पात्र वापरतात. योग्य दात्याकडून पात्रात जे मिळेल तो प्रसाद म्हणून ते स्वीकारतात. जो प्रसाद प्राप्त होईल, तेवढेच ते ग्रहण करतात. संन्यासी कल्पवासी एकभुक्त (दिवसातून एकदाच भोजन करणारे) असतात.

नागा साधू

नागा साधू केवळ कुंभ, महाकुंभ किंवा महापर्व कुंभाच्या वेळीच तीर्थक्षेत्री येतात. अन्य वेळी ते एकांतात साधना करतात. अंगाला भस्म, जटा वाढलेल्या, हातात त्रिशूळ, तलवार, परशू आदी शस्त्रास्त्रे त्यांच्याकडे असतात. कुंभक्षेत्रात आल्यावरही ते स्वत:च्या कुटी करून निवास करतात. कुटीमध्ये हवनकुंड सिद्ध करून त्यात अग्नी प्रज्वलित करून ते साधना करतात.

हे साधू नग्न असतात. कुंभक्षेत्री आलेले भाविक त्यांच्या येथे गेल्यास काही नागा साधू त्यांच्या समस्या जाणून घेऊन त्यावर उपाय सांगतात, तर काही नागा साधू क्रोधीत होतात. कुंभमेळा संपल्यावर नागा साधू पुन्हा एकांतात साधना करण्यासाठी निघून जातात.

पूर्णाहुतीनंतरच कल्पवास होतो पूर्ण !

ज्याप्रमाणे यज्ञात पूर्णाहुती दिल्यानंतरच यज्ञ पूर्ण होतो आणि त्यानंतरच यज्ञाचे फळ प्राप्त होते, त्याप्रमाणे कल्पवासही पूर्णाहुतीनंतरच पूर्ण होतो. पूर्णाहुती म्हणजे कल्पवास पूर्ण झाल्यावर पुरोहितांचे पूजन करून त्यांना दक्षिणा देणे होय. कल्पवास पूर्ण झाल्यावर म्हणजे ३ वर्षे, ६ वर्षे, १२ वर्षे किंवा त्याहून अधिक (काही आयुष्यभर कल्पवास करतात), जेवढा कल्पवास असेल, त्यानंतर ही पूर्णाहुती दिली जाते. पूर्णाहुतीमध्ये पुरोहितांना गृहस्थाश्रमात लागणार्‍या वस्तू अर्पण केल्या जातात. यामध्ये दुचाकी, चारचाकी किंवा अन्य कोणत्याही वस्तूंचा समावेश असतो.

पुरोहितांना पूर्णाहुती दिल्यानंतर कल्पवास या व्रताचे फळ प्राप्त होते. काही कल्पवासी पूर्णाहुती दिल्यानंतरही कल्पवास करतात. वयोमानामुळे किंवा अन्य कोणत्या अडचणींमुळे पुढील वेळी कल्पवास करणे शक्य वाटत नसेल, तर अशा वेळी कल्पवासी पूर्णाहुती देऊन कल्पवास पूर्ण करतात; मात्र पूर्णाहुती दिल्यानंतरही पुढील कुंभकाळात शारीरिकदृष्ट्या येण्याची क्षमता असेल किंवा कोणती अडचण नसेल, तर अशा वेळी गृहस्थी कल्पवासी कल्पवास करतात.

कल्पवासात महिला धान्य पेरणी का करतात ?

कल्पवासाच्या पहिल्या दिवशी महिला त्यांच्या निवासाच्या बाहेर तुलसी वृंदावन सिद्ध करून त्यामध्ये शाळिग्रामची स्थापना करतात. त्यांचे नियमितपणे पूजन केले जाते. त्याच्या बाजूला कल्पवासी त्यांच्याकडे उपलब्ध असलेले काही धान्य पेरतात. धान्य लावणे आणि उगवणे, हे भरभराटीचे प्रतीक मानले जाते. पेरलेल्या धान्याला कल्पवासी नियमित पाणी घालतात. कल्पवास पूर्ण झाल्यावर उगवलेल्या धान्याची रोपे कल्पवासी तीर्थक्षेत्रातील नदीत विसर्जित केली जातात. त्यातील थोडी रोपे कल्पवासी घरी नेऊन सुरक्षित ठेवतात. यामुळे ‘कुटुंबात समृद्धी नांदते’, या श्रद्धेने हा विधी केला जातो.

– आचार्य रवि तिवारी, पुरोहित, प्रयागराज, उत्तरप्रदेश. (१३.१.२०२५)