स्वातंत्र्यपूर्व काळात स्वातंत्र्यप्राप्तीसाठी अनेक लहान-मोठ्या क्रांतीकारी संघटना लढल्या. त्यांच्या कथित नेत्यांच्या संवेदनाहीनतेमुळे विविध कारागृहांमध्ये खितपत पडलेले क्रांतीवीर आणि त्यांचे नातेवाईक यांना प्रचंड कष्ट भोगावे लागले, तसेच त्या संघटनांचीही मोठी हानी झाली. यातून राष्ट्र आणि धर्म यांच्या रक्षणासाठी कार्य करणार्या संघटना बोध घेऊन त्यांच्या कार्याची हानी टाळू शकतात. हे सांगणारा हा लेख वाचकांसाठी देत आहोत.
१५ सप्टेंबर या दिवशी प्रसिद्ध झालेल्या लेखात आपण ‘स्वातंत्र्य मिळाल्यावर स्वातंत्र्यप्राप्तीसाठी लढणार्या अनेक क्रांतीकारकांकडे सरकारचे दुर्लक्ष, संघटना प्रमुखांच्या असंवेदनशीलतेमुळे क्रांतीकारकांवर शिक्षा भोगण्याची वेळ’, ही सूत्रे वाचली. आज या लेखाचा अंतिम भाग येथे देत आहोत.
(उत्तरार्ध)
लेखाचा पूर्वार्ध पाहण्यासाठी पुढील लिंक वर क्लिक करा : https://sanatanprabhat.org/marathi/834166.html
७. क्रांतीकारकांमधील सामान्य ज्ञानाचा अभाव आणि सद्गुण विकृती
७ अ. क्रांतीकार्यासाठी मिळवलेल्या ३० सहस्र रुपयांची चोरी : क्रांतीकार्य करण्यासाठी धनाची आवश्यकता असे. त्यासाठी क्रांतीकारकांना सरकारी तिजोरी लुटणे किंवा इंग्रजांचे तळवे चाटणार्या सावकारांना लुटणे या गोष्टी कराव्या लागत असत. हे काम तेवढे सोपे नव्हते. त्यात अनेकदा अपयशही येत असे. त्यामुळे मिळालेले धन सुरक्षित ठिकाणी ठेवून काटकसरीने वापरावे लागायचे. एकदा एका क्रांतीकारी संघटनेच्या सदस्यांनी सरकारची तिजोरी आणि सावकार यांना लुटले. त्यानंतर त्यातून मिळालेले ३० सहस्र रुपये एका साधूंच्या मठात ठेवले. काही कारणांनी त्या क्रांतीकारी संघटनेच्या कथित नेत्यांना वाटू लागले की, त्या मठात ते धन सुरक्षित नाही. त्यामुळे त्या नेत्यांनी त्यांच्या संघटनेतील लोकांना काही कळू न देता त्या मठाला लागून असलेल्या वस्तीतील एका बंद घरात ते धन हालवले. ‘बंद घरात धन ठेवल्यामुळे कुणाला संशय येणार नाही’, असा विचार त्यांनी केला होता; परंतु एके दिवशी त्या बंद घरातून ते धन चोरीला गेल्याचे निदर्शनास आले. मुळातच क्रांतीकारकांनी ते धन लुटून आणले होते. त्यामुळे त्याविषयी तक्रार करणे किंवा कुठेही वाच्यता करणे शक्यच नव्हते. असे असूनही काही प्रश्न अनुत्तरीतच राहिले.
१. मठात धन सुरक्षित नाही, असे वाटण्याचे नेमके कारण काय ?
२. ते धन मठातून दुसरीकडे हालवायचे होते, तर मग बंद घर का निवडले ?
३. संघटनेच्या लोकांनीच प्रत्येकी १-२ सहस्र रुपये आपापल्या घरी का ठेवले नाहीत ?
४. ते धन मठातून काढून एका बंद घरात ठेवले आहे, हे संघटनेतील अगदी मोजक्या व्यक्तींना ठाऊक होते, तर मग ३०-३५ घरांच्या वस्तीतील अन्य घरे सोडून चोर त्या बंद घरातच कसे गेले ?
५. ते धन त्या बंद घरात हालवल्याविषयी ज्यांना ज्यांना ठाऊक होते, ते कुणाकुणाकडे त्याविषयी बोलले होते ?
६. ज्यांना त्याविषयी ठाऊक होते, त्यांच्यापैकीच कुणी चोरी घडवून आणली नाही ना ? असे अनेक प्रश्न शेवटपर्यंत अनुत्तरीत राहिले आणि इतकी मोठी रक्कम चोरीला गेल्याने पुढे बराच काळ क्रांतीकार्य ठप्प झाले.
७ आ. क्रांतीकार्यासाठी पैसे घेऊन जाणारा मनुष्य पोलिसांनी पकडणे : एकदा एका मोठ्या क्रांतीकारी संघटनेच्या संदर्भातही असेच घडले. त्या संघटनेची छुपी कार्यालये संपूर्ण देशभर होती; परंतु संघटनेचे मुख्य कार्यालय कानपूर येथे होते. मुख्य कार्यालयातून देशभरातील अन्य कार्यालयांना क्रांतीकार्यासाठी आवश्यक साहित्य, शस्त्रे, धन इत्यादी पुरवले जात असे. एकदा त्या संघटनेच्या देहली येथील छुप्या कार्यालयाच्या माध्यमातून इंग्रजांच्या विरोधात मोठी मोहीम उघडण्याचे ठरले. त्यासाठी आवश्यक असणारे ५ सहस्र रुपये मुख्य कार्यालयातून पाठवण्यात येणार होते. सगळी रक्कम तेव्हा नाण्यांच्या रूपात होती. ५ सहस्र रुपयांची नाणी, म्हणजे लपू न शकणारा ऐवज होता. इतकी रक्कम पाठवण्यासाठी मुख्य कार्यालयातील लोकांनी बुद्धीचा वापर करणे आवश्यक होते. यात्रेकरूंच्या जथ्यात माणसे घुसवून त्यांच्याकरवी थोडी थोडी रक्कम पोचवता आली असती. त्यातील काही रक्कम रेल्वेने, काही बैलगाडीने, काही पायी यात्रा करणार्या यात्रेकरूंच्या माध्यमातून अशीही ती रक्कम पोचवता आली असती; मात्र मुख्य कार्यालयातील कथित नेत्यांनी ती सगळीच्या सगळी रक्कम एकाच माणसाच्या हाती देऊन त्याला रेल्वेने पाठवले. काटकसर करण्याच्या नावाखाली अल्प खर्चात सगळी रक्कम एकरकमी पोचवण्याचा त्यांचा उद्देश होता. इंग्रजी पोलिसांनी त्याच रेल्वेची पडताळणी करायचे ठरवले होते. त्या कामी त्यांनी पोलीसदलातील भारतीय पोलिसांचीच नेमणूक केली होती. भारतीय पोलिसांनी त्या व्यक्तीला ५ सहस्र रुपयांसह पकडले; मात्र पोलीस भारतीयच असल्याने त्या व्यक्तीने त्यांच्या हातापाया पडून सोडून देण्याची विनंती केली. त्या पोलिसांनी त्याला सोडले; पण त्यासाठी त्या ५ सहस्र रुपयांपैकी २ सहस्र रुपये पोलिसांनी हडपले. त्यामुळे त्या व्यक्तीला उरलेले ३ सहस्र रुपये घेऊन मुख्य कार्यालयात परत यावे लागले. या चुकीमुळे एक मोठी मोहीम बारगळली, तसेच क्रांतीकारक मोठ्या रकमांची ने-आण करतात, हे पोलिसांच्या लक्षात आले. त्यामुळे क्रांतीकारी संघटनेला त्यांचे मुख्य कार्यालय अन्य जिल्ह्यात स्थानांतरित करावे लागले. मुख्य कार्यालयासाठी नवीन ठिकाण शोधून तेथे कार्यालय चालू होईपर्यंत सगळेच कार्य ठप्प झाले.
७ इ. कार्यप्रमुखांच्या झापडबंद दृष्टीकोनामुळे संघटनेची हानी ! : वरील प्रसंग ज्या क्रांतीकारी संघटनेच्या संदर्भात घडला, त्या संघटनेतील काही कथित कार्यप्रमुखांच्या तर्हा अगदी वेगळ्याच होत्या. संघटनेच्या विविध कार्यांसाठी उत्तरदायी माणसे नेमण्यात आली होती. कारवाईचा प्रमुख, इंग्रजी सैन्यात अफवा पसरवून त्यांचा बुद्धीभेद करण्याच्या कारवाईचा प्रमुख, मध्यवर्गीय लोकांच्या मनातील इंग्रजाचे भय नाहीसे करून त्यांना प्रेमाने क्रांतीकारकांच्या पाठीशी उभे करण्याच्या कारवाईचा प्रमुख, कारागृहात गेलेल्या क्रांतीकारकांच्या कुटुंबियांच्या संपर्कात राहून त्यांना आवश्यक ते साहाय्य करण्याच्या कामाचा प्रमुख, इंग्रजांच्या विरोधात थेट न बोलता स्वातंत्र्याचे समर्थन करणारी सार्वजनिक भाषणे ठिकठिकाणी देण्याच्या कामाचा प्रमुख, असे वििवध उत्तरदायित्व वाटण्यात आले होते. या सर्वांमध्ये पुरेशी परिपक्वता नसल्यामुळे कालांतराने त्या प्रमुखांमध्ये एक झापडबंद दृष्टीकोन निर्माण झाला. देशाला स्वातंत्र्य मिळवणे, हे उदात्त ध्येय बाजूला पडले. ‘कामकाजाच्या सोयीसाठी मी एका विशिष्ट कार्याचा प्रमुख असलो, तरी प्रत्येक काम माझेच आहे’, हा विचारच संपला.
७ ई. योग्य नेतृत्वाअभावी संघटनेचे क्रांतीकार्य ठप्प ! : रेल्वेने ५ सहस्र रुपये पाठवत असतांना ते पोलिसांनी पकडणे, त्यातील २ सहस्र रुपये पोलिसांनी हडपणे, मुख्य कार्यालय कायमचे बंद करावे लागणे, दुसरे ठिकाण मिळेपर्यंत क्रांतीकार्य पूर्णपणे ठप्प होणे इत्यादी घडामोडी घडत होत्या. कारागृहातील क्रांतीकारकांच्या कुटुंबियांच्या संपर्कात राहून त्यांना साहाय्य करण्यासाठी नेमलेला प्रमुख स्वत:च कारागृहात गेल्यावर ते कामच बंद पडले. अशा स्थितीत भाषणे देण्याच्या कामाचा प्रमुख भाषणेच देत फिरत होता. क्रांतीकार्याची झालेली हानी भरून येण्यासाठी आताच्या घडीला काय करणे आवश्यक आहे, याचा विचार नेतृत्वाने केलाच नव्हता. कारागृहात खितपत पडलेले क्रांतीकारक आणि त्यांचे कुटुंबीय यांच्याशी त्या भाषणप्रमुखाला काहीही देणे-घेणे नव्हते. अशा प्रकारे प्रत्येक कार्याचा प्रमुख आपापली कामे झापडे लावून करत राहिला. पुढे पुढे तर त्या संघटनेतील विविध कार्याच्या प्रमुखांमध्ये स्पर्धा चालू झाली. आपापले पद टिकवण्यासाठी कुरघोडी चालू झाल्या. परिणामी संघभावना अल्प झाली, संघटनेचा गाभाच नाहीसा झाला, पुढे संघटना विस्कटली आणि हळूहळू बंद पडली.
८. संघटनेच्या प्रमुखांनी वेळोवेळी आत्मपरीक्षण करणे आवश्यक !
मोठे ध्येय उराशी बाळगून चालणार्या संघटनेतील प्रत्येक नेता आणि कार्यकर्ते यांना या प्रसंगांतून बरेच काही शिकण्यासारखे आहे. ‘काळ जातो तसतशी कार्यात शिथिलता येत आहे का ?, माझी ध्येयासक्ती पदाच्या आसक्तीत परिवर्तित होत आहे का ?, माझ्या सहकार्यांविषयी माझ्या मनात असुया निर्माण झाली आहे का ?, त्यांच्याविषयी मी संकुचितपणे विचार करतो आहे का ?, मला इतरांचे चांगले गुण दिसणे बंद झाले आहे का ?, मला इतरांचे कौतुक करता येते का ?, ‘माणसासाठी नियम किंवा नियमांसाठी माणूस’, यासंदर्भात माझ्या मनात अजूनही संभ्रम आहे का ?, आपल्याहून अधिक सक्षम व्यक्ती आपल्या समोर असल्यास मोठ्या मनाने त्या व्यक्तीच्या हातात सूत्रे देण्याचा मनाचा मोठेपणा आपल्यात आहे का ?’, असे काही प्रश्न संघटनेतील प्रत्येक नेता आणि कार्यकर्ते यांनी स्वत:ला ठराविक काळानंतर पुन:पुन्हा विचारत राहिले पाहिजे. असे झाल्यास व्यक्ती म्हणून आपला विकास होईल आणि उराशी बाळगलेले ध्येय आपण गाठू शकू. अन्यथा हंगामी वनस्पतीप्रमाणे थोड्याच कालावधीत स्वतःचे अस्तित्व संपून जाईल आणि आपली नोंद इतिहासात होण्याऐवजी भूतकाळात होईल.’ (समाप्त)
– श्री. विक्रम विनय भावे, हिंदु विधीज्ञ परिषद, मुंबई.