विधी आणि न्‍याय विभागाच्‍या विशेष वैद्यकीय कक्षाद्वारे ८ महिन्‍यांत १२ कोटी ७३ लाख रुपयांचे रुग्‍णांसाठी अर्थसाहाय्‍य !

मुंबई : धर्मादाय रुग्‍णालयांमध्‍ये गरीब रुग्‍णांसाठी ५० टक्‍के दरात, तर निर्धन रुग्‍णांवर विनामूल्‍य उपचार केले जातात. यासाठी धर्मादाय रुग्‍णालयांमध्‍ये प्रत्‍येकी १० टक्‍के राखीव खाटा असतात. या योजनेचा लाभ अधिकाधिक गरजूंना मिळावा, यासाठी उपमुख्‍यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्‍या मार्गदर्शनाखाली विधी आणि न्‍याय विभागाच्‍या अंतर्गत मंत्रालयात विशेष वैद्यकीय कक्षाची स्‍थापना करण्‍यात आली आहे. या कक्षाद्वारे मागील ८ महिन्‍यांमध्‍ये १२ कोटी ७३ लक्ष रुपयांचे आर्थिक साहाय्‍य करून ऑगस्‍ट २०२४ पर्यंत ३२३ रुग्‍णांवर उपचार करण्‍यात आले आहेत.

उपमुख्‍यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्‍या मार्गदर्शनाखाली विधी आणि न्‍याय विभागाच्‍या अंतर्गत मंत्रालयात विशेष वैद्यकीय कक्षाची स्‍थापना

कक्षप्रमुख रामेश्‍वर नाईक यांच्‍या मार्गदर्शनाखाली हा विशेष वैद्यकीय कक्ष चालू आहे. या विशेष कक्षाची स्‍थापना झाल्‍यापासून रुग्‍णांना देण्‍यात येत असलेल्‍या आर्थिक साहाय्‍यामध्‍ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. या कक्षाद्वारे मागील ८ महिन्‍यांमध्‍ये हृदयरोग, कर्करोग, यकृत प्रत्‍यारोपण, मूत्रपिंड प्रत्‍यारोपण, बोनमॅरो ट्रान्‍सप्‍लांट, फुफ्‍फुसाचे आजार, अस्‍थिरोग अवयव पुनर्स्‍थापना शस्‍त्रक्रिया यांसारख्‍या गंभीर आजारांवरील  शस्‍त्रक्रियांचा समावेश आहे. त्‍यामुळे या योजनेचा लाभ अधिकाधिक गरीब नागरिकांनी घ्‍यावा, असे आवाहन उपमुख्‍यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे. शासनाच्‍या योजनेच्‍या अंतर्गत धर्मादाय रुग्‍णालयांकडून केल्‍या जाणार्‍या उपचारांचा लाभ सर्वसामान्‍यांना योग्‍य प्रमाणात होत नसल्‍यामुळे देवेंद्र फडणवीस यांच्‍या नेतृत्‍वाखाली या कक्षाची स्‍थापना करण्‍यात आली आहे. धर्मादाय रुग्‍णालयांकडून राबवली जाणारी ही योजना प्रभावीपणे राबवली जावी आणि यामध्‍ये पारदर्शकता यावी, यांसाठी या विशेष वैद्यकीय कक्षाद्वारे काम चालू आहे. राज्‍यातील एकूण ४६८ धर्मादाय रुग्‍णालयांतील या योजनेच्‍या अंतर्गत आर्थिक दुर्बल आणि निर्धन रुग्‍णांसाठी १२ सहस्र खाटा राखीव आहेत. या खाटांचे समन्‍वय या कक्षाद्वारे केले जात आहेत. याविषयी कक्षप्रमुख रामेश्‍वर नाईक यांनी या योजनेची कार्यवाही प्रभावीपणे व्‍हावी, यासाठी नुकत्‍याच मुंबई, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, कोल्‍हापूर येथे रुग्‍णालयांच्‍या विभागीय कार्यशाळा घेण्‍यात आल्‍याची माहिती दिली. ‘राज्‍यातील धर्मादाय रुग्‍णालयाकडून ही योजना योग्‍य प्रकारे राबवली जात आहे ना ?’, याची पहाणी करण्‍यासाठी विशेष वैद्यकीय पथकाचे चौकशी पथक कार्यरत करण्‍यात आले आहे. या योजनेचा समन्‍वय प्रभावीपणे व्‍हावा, यासाठी ‘ऑनलाईन प्रणाली’ विकसित करण्‍याचे काम विशेष साहाय्‍य कक्षाद्वारे चालू आहे.

योजनेचा लाभ अधिकाधिक घ्‍यावा ! – रामेश्‍वर नाईक, कक्षप्रमुख, राज्‍यस्‍तरीय विशेष वैद्यकीय कक्ष, मंत्रालय

ऑनलाईन प्रणाली लवकरच कार्यरत होईल. या योजनेद्वारे उपचारांसाठी निधीची मर्यादा नाही. त्‍यामुळे कॅन्‍सर, लिव्‍हर ट्रान्‍सप्‍लांट, हृदय प्रत्‍यारोपण अशा महागड्या शस्‍त्रकियाही या योजनेतून विनामूल्‍य आणि सवलतीच्‍या दरात करण्‍यात येतील. उपचारांसाठी राज्‍यस्‍तरीय विशेष वैद्यकीय साहाय्‍य कक्षाच्‍या ‘[email protected]’ या ‘ई मेल’ पत्त्यावर कागदपत्रांसह ऑनलाईन अर्ज करण्‍याची सुविधा उपलब्‍ध आहे. यासाठी रुग्‍णांचा अर्ज, लोकप्रतिनीधींचे पत्र, आधारकार्ड किंवा रेशनकार्ड, उत्‍पन्‍नाचा दाखला, डॉक्‍टरांचे ‘प्रिस्‍क्रिप्‍शन’ (औषधांची चिठ्ठी) आदी कागदपत्रे लागणार आहेत. ही कागदपत्रे ऑनलाईन अपलोड करता येणार आहेत. त्‍यामुळे या योजनेचा लाभ निर्धन आणि दुर्बल रुग्‍णांनी अधिकाधिक घ्‍यावा.