राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडून कावड यात्रेतील गंगाजल करवीर निवासिनी श्री महालक्ष्मीदेवीच्या चरणी अर्पण !

श्री महालक्ष्मीदेवीच्या चरणी गंगाजल अर्पण करण्यासाठी उपस्थित स्वयंसेवक

कोल्हापूर, ९ सप्टेंबर (वार्ता.) – उत्तराखंडमधील हरिद्वार येथून कोट्यवधी भाविक कावड यात्रेनिमित्त गंगामातेचे पाणी त्यांच्या ग्रामदैवतांना घेऊन जातात. कोल्हापूरमधील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक मंगेश शेणवी, इंद्रजित सुतार, उत्तम माळवेकर, सूर्यकांत सुतार, सागर जाधव, आकाश सातपुते, शेखर शेणवी यांनी कोल्हापूर ते हरिद्वार असा प्रवास करून ९ ऑगस्ट या दिवशी हे पवित्र गंगाजल करवीर निवासिनी श्री महालक्ष्मीदेवीच्या चरणी अर्पण करण्यासाठी आणले. श्रावण संपल्यावर नुकतेच हे गंगाजल करवीर निवासिनी श्री महालक्ष्मीदेवीच्या चरणी अर्पण करण्यात आले.

हे पवित्र गंगाजल काही दिवस कसबा बावडा भागात दर्शनासाठी ठेवले होते. अनेक भाविकांनी या गंगाजल दर्शनाचा लाभ घेतला. या वेळी स्वयंसेवकांनी गंगादर्शनाविषयी माहिती सांगून गंगा नदीचे माहात्म्य लोकांना सांगितले आणि ही कावड यात्रा प्रत्येक वर्षी मोठ्या प्रमाणात चालू व्हावी, तसेच तरुण पिढीने या पवित्र कार्यात सहभाग घ्यावा, यासाठी मार्गदर्शन केले.