नवी मुंबई महापालिकेच्या लेखी आश्वासनानंतर कामगारांचे आंदोलन तात्पुरते स्थगित !

‘वर्षा’ बंगल्यावर नेणार होते मोर्चा !

नवी मुंबई, ५ सप्टेंबर (वार्ता.) – नवी मुंबई महानगरपालिकेच्या कामगारांना ‘समान काम – समान वेतन’ मिळावे, यासाठी वाशी ते मुख्यमंत्र्यांच्या ‘वर्षा’ बंगल्यावर समाज समता कामगार संघाच्या नेतृत्वाखाली धडक मोर्चा काढण्यात येणार होता; मात्र मोर्चासाठी सहस्रोंच्या संख्येने एकत्र जमलेल्या कामगारांना पाहून महापालिका प्रशासनाने या संदर्भात लेखी आश्वासन दिल्याने मोर्चा तात्पुरता स्थगित करण्यात आला आहे, अशी माहिती संघटनेचे अध्यक्ष मंगेश लाड यांनी दिली. ‘१५ दिवसांत निर्णय न झाल्यास २० सप्टेंबरला वर्षा बंगल्यावर धडकणार’, अशी चेतावणी लाड यांनी दिली आहे.

नवी मुंबई महानगरपालिकेने स्वीकारलेल्या ‘समान काम – समान वेतन’ धोरणाप्रमाणे वर्ष २००७ मध्ये नियुक्त कायम कर्मचार्‍यास मिळणारे वेतन तथाकथित कंत्राटी कामगारांना मिळावे, यासाठी समाज समता कामगार संघाच्या नेतृत्वाखाली नवी मुंबई महानगरपालिकेतील कंत्राटी कामगार मागील ३ वर्षांपासून लढा देत आहेत.

२५ जुलै २०२३ या दिवशी नवी मुंबई महानगरपालिकेने कंत्राटी कामगारांना ‘समान काम – समान वेतन’ धोरणाप्रमाणे वेतन देणे याविषयी मान्यता मिळण्यासाठी प्रधान सचिव नगर विकास यांच्याकडे प्रस्ताव पाठवला होता. त्यावर त्वरित निर्णय घ्यावा, यासाठी समाज समता कामगार संघाकडून वारंवार पाठपुरावा करण्यात येत होता.

नोव्हेंबर २०२३ मध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अधिनियमातील प्रावधान आणि प्रचलित नियमाप्रमाणे कारवाई करावी, असे निर्देश नवी मुंबई महानगरपालिका आयुक्तांना दिले होते. यावर कार्यवाही होत नसल्याने संघटनेच्या वतीने ९ दिवस आझाद मैदान येथे उपोषण केले होते. या उपोषणास ६ महिन्यांचा कालावधी उलटूनही प्रधान सचिवांनी नवी मुंबई महानगरपालिका आयुक्तांना त्याविषयी काही कळवले नाही.

या निषेधार्थ नवी मुंबईतील सर्व कंत्राटी कामगार मुख्यमंत्री शिंदे यांना भेटण्यासाठी त्यांना विनंती करण्यासाठी वाशी ते वर्षा बंगला इथपर्यंत पायी जाणार होते; मात्र वाशी पोलिसांनी वाशी रेल्वेस्थानक येथे मोर्चा अडवला. त्यामुळे हे आंदोलन २० सप्टेंबरपर्यंत स्थगित करण्यात आले.