बांगलादेशातील स्थिती, ही भारतातील हिंदूंसाठी धोक्याची घंटा ! – निवृत्त कमांडर (डॉ.) भूषण दिवाण

निवृत्त कमांडर (डॉ.) भूषण दिवाण

मुंबई – लोकशाही असलेल्या बांगलादेशात आज हिंदूंची झालेली दयनीय स्थिती, ही भारतातील हिंदूंसाठी धोक्याची घंटा आहे, असे प्रतिपादन निवृत्त कमांडर (डॉ.) भूषण दिवाण यांनी येथे केले. विश्‍व हिंदु परिषदेच्या स्थापनेला ६० वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने जोगेश्‍वरी येथे १ सप्टेंबर या दिवशी आयोजित एका कार्यक्रमात ते बोलत होते.

ते पुढे म्हणाले की, बांगलादेशात हिंदूंना वेचून मारले जात आहे. हिंदूंंवर अन्याय करतांना ते ब्राह्मण, वैश्य, शुद्र, जाट, मराठा असे न बघता ‘ते केवळ हिंदु आहेत’, हे पाहून अन्याय केला जात आहे. अशीच परिस्थिती येत्या काही वर्षार्ंत भारतातही येऊ शकते. यासाठी आपण हिंदूंंनी ब्राह्मण, वैश्य, क्षत्रिय, जाट, मराठा असे जाती-जातींमध्ये न अडकता एक हिंदु म्हणून संघटित रहाणे आवश्यक आहे. हिंदु कुणावरही आक्रमण करत नाही. ‘वसुधैव कुटुंम्बकम्’ अशी हिंदूंची उदार भावना आहे; मात्र याचा अपलाभ घेत कुणी आपल्याला संपवण्यासाठी येत असेल, तर त्याला सामोरे जाण्यासाठी आपल्याला सिद्ध रहायला हवे. हिंदू हे श्री भवानीमातेची लेकरे आहेत. हिंदु कुणाला छेडत नाही; पण छेडले तर सोडत नाही.