कोल्हापूर – भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी २ सप्टेंबर या दिवशी श्री महालक्ष्मीदेवीला कुंकूमार्चन अभिषेक करून विधी पूजा केली, तसेच एकारती, पंचारती आणि कर्पूरआरती करून देवीचे दर्शन घेतले. या वेळी त्यांच्यासमवेत त्यांची कन्या इतिश्री मुर्मू आणि भाऊ तारिणीसेन टुडू यांनीही देवीचे दर्शन घेतले. या प्रसंगी राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन्, जिल्हाधिकारी तथा पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष अमोल येडगे, सचिव शिवराज नाईकवाडे यांसह अन्य उपस्थित होते.
दर्शनानंतर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्याकडून मंदिराविषयी माहिती जाणून घेतली, तसेच मंदिरातील दगडी झुंबर आणि शिल्पकलेची पहाणी केली. देवीच्या किरणोत्सवाची माहिती जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी त्यांना दिली. श्री महालक्ष्मी मंदिराच्या इतिहासात प्रथमच भारताच्या राष्ट्रपती यांनी श्री महालक्ष्मी मंदिराला भेट देऊन देवीचे दर्शन घेतल्याची माहिती शिवराज नाईकवाडे यांनी दिली.