सनातनचे ४६ वे (समष्टी) संत पू. (कै.) भगवंत कुमार मेनराय (वय ८५ वर्षे) यांचा देहत्याग आणि अंत्यसंस्कार यांविषयी साधकाला आलेल्या अनुभूती

‘४.६.२०२४ या दिवशी सनातनचे ४६ वे (समष्टी) संत पू. (कै.) भगवंत कुमार मेनराय (वय ८५ वर्षे) यांनी देहत्याग केला. मला ही वार्ता कळल्यावर मी सूक्ष्मातून त्यांच्या पार्थिवाचे दर्शन घेतले. तेव्हा मला आलेल्या अनुभूती येथे दिल्या आहेत.

पू. (कै.) भगवंत कुमार मेनराय

१. पू. (कै.) भगवंत कुमार मेनराय यांनी साक्षीभावाच्या स्थितीत प्राण सोडल्याने त्यांच्या पार्थिवाभोवती सर्व बाजूंना आनंद आणि शांती जाणवणे

पू. भगवंत कुमार मेनराय यांनी देहत्याग केल्यानंतर त्यांच्या पार्थिवाच्या चारही बाजूंना मला आनंद आणि शांती यांची स्पंदने जाणवत होती. हे फार वैशिष्ट्यपूर्ण होते. पू. मेनराय यांनी प्राचीन ऋषिमुनींप्रमाणे साक्षीभावाच्या स्थितीत आज्ञाचक्रातून प्राण सोडल्याने त्यांच्याभोवती आनंद आणि शांती यांची स्पंदने आकाशतत्त्वाच्या स्तरावर कार्यरत झाली होती.

२. पू. (कै.) भगवंत कुमार मेनराय शेवटपर्यंत देवाच्या अनुसंधानात असल्याने त्यांची सर्व कुंडलिनीचक्रे जागृत असणे आणि त्यामुळे त्यांचे पार्थिव सूक्ष्मातून पुष्कळ तेजस्वी दिसून त्यातून पांढरा प्रकाश बाहेर पडतांना दिसणे

पू. मेनराय हे शेवटच्या श्वासापर्यंत नामजपाद्वारे देवाच्या अनुसंधानात असल्याने त्यांची सातही कुंडलिनीचक्रे पूर्ण शुद्ध आणि जागृत झाली होती. त्यांच्या सप्तचक्रांतून ब्रह्मांडातील चैतन्य पांढर्‍या प्रकाशाच्या स्वरूपात बाहेर पडत होते. त्यामुळे मला पू. मेनराय यांचे पार्थिव सूक्ष्मातून पुष्कळ तेजस्वी दिसत होते आणि त्यांच्या सप्तचक्रांतून सूक्ष्म प्रकाश बाहेर पडतांना दिसत होता.

३. पू. (कै.) भगवंत कुमार मेनराय नामजपाशी एकरूप झाल्यामुळे त्यांच्या पार्थिवाचे दर्शन घेतांना सहजतेने ‘निर्विचार’ हा नामजप चालू होणे

श्री. निषाद देशमुख

पू. मेनराय यांच्या पार्थिवाचे सूक्ष्मातून दर्शन घेतांना माझा सहजतेने ‘निर्विचार’ हा निर्गुणाशी संबंधित नामजप होत होता. पू. मेनराय हे नामसंकीर्तनयोगी असून जीवनाच्या शेवटच्या कालावधीत त्यांनी केलेल्या अखंड नामजप साधनेमुळे ते उन्मनी अवस्थेत, म्हणजे निवृत्ती अवस्थेत असायचे. त्यामुळे त्यांच्यात निर्गुण तत्त्व वाढले होते. ‘या निर्गुण तत्त्वामुळेच ‘निर्विचार’ हा नामजप चालू होण्याची अनुभूती येत आहे’, असे मला जाणवले.

४. पू. (कै.) भगवंत कुमार मेनराय यांनी शिवाची भक्ती केली असल्याने त्यांची तपोलोकातील शिवलोकाकडे वाटचाल होणे

पू. मेनराय व्यष्टी स्तरावर भगवान शिवाचे भक्त होते. फलस्वरूप त्यांच्यात शिवतत्त्व अधिक प्रमाणात होते. यामुळे मृत्यूनंतर त्यांच्या लिंगदेहाची तपोलोकात असलेल्या शिवलोकाकडे वाटचाल झाली.

५. पू. (कै.) भगवंत कुमार मेनराय यांचे अंत्यसंस्कार विधी होतांना सूक्ष्मातून आलेल्या अनुभूती

अ. एरव्ही अंत्यसंस्काराच्या ठिकाणी शक्ती कार्यरत असल्याने उष्णता जाणवते; पण पू. मेनराय यांच्या अंत्यसंस्कार स्थळी सूक्ष्मातून गेल्यावर तिथे चैतन्यामुळे गारवा जाणवत होता.

आ. पू. मेनराय यांच्या अंत्यसंस्काराच्या ठिकाणी चैतन्याची पिवळसर छटा कार्यरत होती.

इ. पू. मेनराय यांचे अंत्यसंस्कार होतांना मला सूक्ष्मातून एक दैवी नाद ऐकू येत होता.

ई. पू. मेनराय यांचे अंत्यसंस्कार चालू असतांना ‘तिथे सूक्ष्मातून पंचमुखी शिव(टीप) उपस्थित आहे’, असे मला दिसले.

(टीप – लिंग पुराणात भगवान शिवाच्या पंचमुखी रूपाचे वर्णन असून त्याला ‘पंचानन शिव (पाच मुख असलेले रूप)’, असे म्हटले आहे. या मुखांची नावे ‘ईशान, तत्पुरुष, अघोरा, वामदेव आणि सद्ज्योता’, अशी आहेत. भगवान शिवाचे हे पाच मुख पंचतत्त्व, पंचज्ञानेंद्रिय आणि पंचकर्मेंद्रिय यांच्याशी संबंधित आहेत.

भगवान शिवाच्या ५ मुखांची कार्ये

१. ईशान : सृष्टीशक्तीशी संबंधित शक्ती (सृजनशक्ती)

२. तत्पुरुष : थोरीधन शक्तीशी (अदृश्य होण्याच्या शक्तीशी) संबंधित

३. अघोरा : संहारशक्ती

४. वामदेव : स्थितीशक्ती (सृष्टीच्या पोषणाची शक्ती)

५. सद्ज्योता : अनुग्रहशक्ती (आशीर्वाद शक्ती)

– श्री. निषाद देशमुख (सूक्ष्मातून मिळालेले ज्ञान, आध्यात्मिक पातळी ६३ टक्के), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.

  • सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे सूक्ष्म. साधनेत प्रगती केलेल्या काही व्यक्तींना या सूक्ष्म संवेदना जाणवतात. या सूक्ष्माच्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.
  • सूक्ष्मातील दिसणे, ऐकू येणे इत्यादी (पंच सूक्ष्मज्ञानेंद्रियांनी ज्ञानप्राप्ती होणे) : काही साधकांची अंतर्दृष्टी जागृत होते, म्हणजे त्यांना डोळ्यांना न दिसणारे दिसते, तर काही जणांना सूक्ष्मातील नाद किंवा शब्द ऐकू येतात.
  • या लेखात प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या भाव तेथे देव या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक