व्यक्तीमधील ‘पूर्वग्रह असणे’ या स्वभावदोषाविषयी झालेले चिंतन

‘या कलियुगात बहुतांश व्यक्तीत ‘पूर्वग्रह असणे’, हा स्वभावदोष अल्प-अधिक प्रमाणात असतो. व्यक्तीमधील ‘पूर्वग्रह असणे’ हा स्वभावदोष तिला केवळ साधनेतच नव्हे, तर ती कार्यरत असलेल्या प्रत्येक क्षेत्रात घातक ठरतो. या लेखात आपण ‘पूर्वग्रह असणे’ या स्वभावदोषाचे स्वरूप, पूर्वग्रह निर्माण होण्याची कारणे, त्याचे परिणाम आणि त्यावर मात कशी करू शकतो’, यांविषयी जाणून घेऊ.

१. व्याख्या

‘पूर्वी घडलेल्या काही प्रसंगांमुळे एखाद्या व्यक्तीविषयी किंवा काही व्यक्तींविषयी स्वतःच निष्कर्ष काढून त्या व्यक्तींविषयी नकारात्मक विचार स्वतःच्या मनात रुजवणे’, अशी पूर्वग्रहाची व्याख्या करता येईल.

पू. अशोक पात्रीकर

२. व्यक्तीत ‘पूर्वग्रह’ या स्वभावदोषाची निर्मिती कशी होते ? 

२ अ. एखादी व्यक्ती प्रतिसाद देत नसल्यास तिच्याविषयी पूर्वग्रह निर्माण होणे आणि तिच्याशी बोलणे टाळणे : एखादी व्यक्ती आपण ‘सांगितलेल्या गोष्टी, भ्रमणभाषवर पाठवलेले संदेश, ‘पोस्ट’ किंवा प्रत्यक्ष बोलणे’, यांना प्रतिसाद देत नाही. तेव्हा आपण ‘ही व्यक्ती कधीच प्रतिसाद देत नाही आणि यानंतरही देणारच नाही. ती अशीच आहे’, असा निष्कर्ष काढतो. आपण त्या व्यक्तीशी किंवा अशा काही व्यक्तींशी प्रतिक्रियात्मक बोलतो किंवा अन्य व्यक्तींना त्यांच्या विरोधात सांगतो आणि उपाय म्हणून त्यांच्याशी बोलत नाही अथवा त्यांच्याशी बोलणे टाळतो. त्या व्यक्तीच्या संदर्भात आपल्या लक्षात येणारे प्रसंग प्रतिदिन घडत असतात आणि आपल्या मनातील त्या व्यक्तीच्या संदर्भातील पूर्वग्रहात वाढ होते. त्या व्यक्तीला मात्र याची फारशी जाणीव नसते.

२ आ. एखाद्या व्यक्तीविषयी सतत प्रतिक्रिया येत असल्यास पूर्वग्रह निर्माण होतो.

२ इ. आपले ज्या व्यक्तीशी जिव्हाळ्याचे संबंध आहेत, अशी व्यक्ती अन्य व्यक्तीविषयी सतत वाईट बोलत असल्यासही आपल्या मनातील अन्य व्यक्तीच्या संदर्भातील पूर्वग्रहाचे विचार वाढतात.

२ ई. ‘पूर्वग्रह बाळगणे’ हा स्वभावदोष उफाळून आणणारे अन्य स्वभावदोष आणि अहंचे पैलू : ‘तीव्र अपेक्षा करणे; ‘समोरच्या व्यक्तीने माझ्या मनासारखेच वागावे’, असे वाटणे, बहिर्मुखता, ऐकण्याची वृत्ती नसणे, परिस्थिती न स्वीकारणे, सेवेत आवड-नावड असणे, कर्तेपणा असणे, प्रतिमा जपणे, अतीचिकित्सकपणा, सतत शिकवण्याच्या भूमिकेत रहाणे, निष्कर्ष काढणे, तुलना करणे’, असे काही स्वभावदोष आणि अहंचे पैलू ‘पूर्वग्रह’ निर्माण व्हायला कारणीभूत आहेत.

३. पूर्वग्रह कुणाविषयी निर्माण होतो ?

कुटुंबातील काही सदस्य, विशेषतः पती-पत्नी, सासू-सून, नणंद-वहिनी, काही नातेवाईक, जी व्यक्ती सतत संपर्कात असते तिच्याविषयी, उत्तरदायी साधक, काही सहसाधक, शेजारी, कार्यालयातील सहकारी, पदाधिकारी किंवा कुणाहीविषयी पूर्वग्रह निर्माण होऊ शकतो.

४. ‘पूर्वग्रह’ या स्वभावदोषामुळे होणारी हानी

अ. स्वभाव चिडचिडा होतो.

आ. मनावर पूर्वग्रहाचा संस्कार होतो. अनेक व्यक्तींविषयी पूर्वग्रह निर्माण होतो.

इ. साधनेचा अमूल्य वेळ वाया जातो.

ई. साधनेची हानी होते.

उ. कुटुंबातील व्यक्तींविषयी पूर्वग्रह असेल, तर घरातील स्पंदने दूषित होतात.

ऊ. कोणत्याच गोष्टीतून आनंद घेता येत नाही.

ए. मनावर सतत ताण असतो.

ऐ. ‘बिंब-प्रतिबिंब’ या न्यायाप्रमाणे ज्या व्यक्तीविषयी पूर्वग्रह निर्माण झाला आहे, त्याच्याही मनात तसाच पूर्वग्रहाचा संस्कार निर्माण होतो.

५. ‘पूर्वग्रह बाळगणे’, या स्वभावदोषावर मात करण्याचे काही उपाय

५ अ. ‘पूर्वग्रह बाळगणे’ हा स्वभावदोष उफाळून आणणारे अन्य स्वभावदोष आणि अहंचे पैलू यांवर मात करण्यासाठी करायचे प्रयत्न

१. निरपेक्षपणे कृती करावी.

२. माझे जसे काहीतरी मत आहे, तसेच त्या व्यक्तीचेही काहीतरी मत असते, ते जाणून त्या व्यक्तीवर आपले मत लादू नये.

३. प्रत्येक कृती अंतर्मुख होऊन करावी.

४. ऐकण्याची वृत्ती वाढवावी.

५. ‘प्रत्येक परिस्थितीचा निर्माता ईश्वर आहे’, याची जाणीव ठेवून परिस्थिती स्वीकारावी.

६. साधनेत कोणताही साधक सहसाधक म्हणून लाभला, तरी त्याच्याशी जुळवून घ्यावे. कोणतीही सेवा मिळाली, तरीही ‘ती गुरुसेवाच आहे’, हा भाव ठेवावा.

७. स्वतःकडे श्रेय घेण्याची वृत्ती टाळावी. ‘सेवा गुरूंनी दिली आहे आणि तेच करून घेणार आहेत’, असा भाव ठेवावा. त्यासाठी कृतज्ञताभाव वाढवावा.

८. प्रतिमा न जपता जे आहे, ते मोकळेपणाने सांगावे.

९. अतीचिकित्सक न रहाता आवश्यक तेवढे जाणून घ्यावे.

१०. आपले गुरुदेव (सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले) जसे प्रत्येक प्रसंगातून शिकवत असतात, तसे सतत शिकण्याच्या भूमिकेत रहावे.

११. कोणत्याही प्रसंगात मनाने निष्कर्ष न काढता निश्चिती करून घ्यावी.

१२. ‘व्यक्ती तितक्या प्रकृती’, ही गुरुदेवांनी दिलेली शिकवण लक्षात ठेवून प्रत्येकाशी जुळवून घ्यावे.

५ आ. अन्य उपाय 

१. ज्या व्यक्तीविषयी पूर्वग्रह आहे, त्या व्यक्तीशी प्रत्यक्ष बोलून ज्या कारणांमुळे पूर्वग्रह निर्माण झाला, तो प्रसंग मोकळेपणाने सांगून सत्यस्थिती जाणून घ्यावी.

२. ज्या व्यक्तीविषयी पूर्वग्रह आहे, त्या व्यक्तीला ‘त्याच्यामध्ये असलेल्या स्वभावदोषांसह मला स्वीकारायचे आहे; कारण माझ्यात स्वभावदोष असूनही गुरूंनी मला स्वीकारले आहे’, अशी स्वयंसूचना देऊ शकतो.

३. आपल्याला साधकाविषयी पूर्वग्रह असेल, तर आपण प्रत्येक साधकामध्ये गुरुरूप पहायचा संस्कार मनावर करू शकतो. आपल्याला अन्य कुणाविषयी पूर्वग्रह असेल, तर ‘तोही भगवंताचे रूप आहे’, असा भाव स्वतःत निर्माण करू शकतो.

४. आपल्यात पूर्वग्रहाची तीव्रता अधिक असल्यास त्या व्यक्तीची आपण स्वतःचे कान धरून प्रत्यक्ष क्षमा मागावी. आपली तशी सिद्धता नसल्यास काही दिवस कान धरून मानस क्षमा मागावी आणि काही दिवसांनंतर प्रत्यक्ष क्षमा मागावी.

५. पूर्वग्रह असलेल्या व्यक्तीतील गुणांची सूची बनवून आपण ते गुण आत्मसात् करायचा प्रयत्न करावा.

६. पूर्वग्रह असलेल्या व्यक्तीने चांगली कृती केली असल्यास तिचे कौतुक करावे.

७. ‘ज्या स्वभावदोषांमुळे पूर्वग्रह निर्माण होतो, त्या प्रत्येक स्वभावदोषाचे निरीक्षण करून प्रसंगानुसार स्वयंसूचना देणे’, हा सर्वांत प्रभावी उपाय आहे.

८. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे ‘स्वतःमध्ये प्रेमभाव निर्माण करावा.’ त्यामुळे कालांतराने आपल्याला प्रीतीच्या टप्प्याला जाता येते.

‘गुरुमाऊलीने सुचवलेली ही सूत्रे कृतज्ञताभावाने त्यांच्या चरणी समर्पित करतो.’

– (पू.) अशोक पात्रीकर (वय ७४ वर्षे), अमरावती (१५.१२.२०२४)