देश-विदेशांना आध्यात्मिक अनुभूती देणारी साधना परंपरा : कल्पवास !

‘कल्पवास’ ही कुंभक्षेत्री केली जाणारी एक वैशिष्ट्यपूर्ण साधना आहे. ज्याप्रमाणे  एखादे व्रत केले जाते, त्याप्रमाणे ‘कल्पवास’ हे एक प्रकारे व्रतच आहे. महाराष्ट्रामध्ये ज्याप्रमाणे बहुतांश वारकरी कुटुंबांमध्ये वारीचा परंपरागत वारसा पुढील पिढीकडे संक्रमित होतो. ‘कल्पवास’ हाही काहीसा त्याच प्रकारचा साधनामार्ग आहे. विशेषकरून उत्तरप्रदेश, बिहार या राज्यातूंन तीर्थक्षेत्री येणार्‍या कल्पवासियांची संख्या अधिक असते. प्रयागराज येथे महाकुंभपर्वच्या पार्श्वभूमीवर सध्या लक्षावधी कल्पवासी आले आहेत. या लेखाद्वारे कल्पवासियांची साधना आणि त्यांचा दिनक्रम समजून घेऊया !

१. काय आहे कल्पवास ?

प्रयागराज येथे गंगा, यमुना आणि सरस्वती या संगमतिरी किंवा उज्जैन, नाशिक किंवा हरिद्वार या कुंभक्षेत्राच्या ठिकाणी ‘कल्पवास’ करण्यासाठी भाविक येतात. ‘कल्प’ म्हणजे १२ वर्षांचा कालावधी आणि ‘वास’ म्हणजे रहाणे होय.

श्री. प्रीतम नाचणकर

कल्पवास म्हणजे १२ वर्षे कुंभक्षेत्री वास करून साधना करणे होय. कल्पवास १२ वर्षांचा समजला जात असला, तरी अनेक कल्पवासी ३ वर्षे, ६ वर्षे असाही कल्पवास करतात. काही जण आयुष्यभरही कल्पवास करतात. कल्पवासाचा सर्वांत कमी कालावधी एक रात्र आहे. आणि यापेक्षा कोणतीही मोठी संख्या कल्पवासाची असू शकते. कुंभकाळात कल्पवासी कुंभक्षेत्रात साधना करण्यासाठी येतात. प्रयागराजमध्ये माघ मासात कल्पवास असतो. सूर्याने मकर राशीत प्रवेश केल्यावर पौष पौर्णिमेपासून कल्पवासाला प्रारंभ होतो.

२. कल्पवासात या नियमांचे पालन करावे लागते !

सत्यवचन, अहिंसा, इंद्रियांवर नियंत्रण, सर्वांप्रती दया, ब्रह्मचर्य, व्यसनांचा त्याग, ब्राह्म मुहूर्तावर उठणे, नियमित पवित्र नदीमध्ये स्नान, त्रिकाल संध्या, पिंडदान, दान, नामजप, सत्संग, तीर्थक्षेत्राच्या बाहेर न जाणे, कुणाची निंदा न करणे, संतांची सेवा, कीर्तन श्रवण, एक वेळ भोजन, भूमीवर झोपणे, अग्नीचा शेक न घेणे, पूजा आदी नियमांचे कल्पवासींना पालन करावे लागते. केवळ संतच नव्हे, तर गृहस्थही कल्पवास करू शकतात, असा उल्लेख पद्मपुराणात आहे.

३. पुरोहित आणि कल्पवासी यांचे जिव्हाळ्याचे नाते

तीर्थक्षेत्रात येणार्‍या कल्पवासियांसाठी शासनाकडून रहाण्यासाठी तंबू, पाणी, वीज, प्रसाधनगृहे आदींची व्यवस्था केली जाते. तीर्थक्षेत्री असलेले पुरोहित कल्पवासींकरता शासनाकडून कुंभमेळ्यापुरती भूमी अधिग्रहीत करून घेतात. भूमी अधिग्रहण, वीज, पाणी, शौचालय व्यवस्था यांसाठी पुरोहित शासनाला पैसे देतात. ही सर्व व्यवस्था पुरोहित कल्पवासींना करून देतात आणि कल्पवासी त्याचे पैसे पुरोहितांना देतात. पुरोहितांकडे येणारे कल्पवासी ठरलेले असतात. वर्षानुवर्षे हे कल्पवासी त्याच पुरोहितांकडे येतात. त्यामुळे पुरोहित आणि कल्पवासी यांच्यामध्ये जिव्हाळ्याचे नाते निर्माण होते. पुरोहीतही प्रतिवर्षी होणार्‍या माघी कुंभमेळ्याला कल्पवासींची प्रतीक्षा करत असतात. विविध राज्यांतून एकत्र येऊन कल्पवास करणारे हे साधक खरोखरच एक वैशिष्ट्य आहे. उत्तर भारतात पुरोहितांना ‘पंड्या’ या नावाने ओळखले जाते.

  ४. कल्पवासींची श्रद्धा वंदनीय !

‘कल्पवास’ हे व्रत कल्पवासी मोठ्या श्रद्धेने करतात. ‘कल्पवासाकरता गंगामातेनेच आपणाला बोलावले आहे’, असा त्यांचा भाव असतो. प्रयागराज, हरिद्वार, उज्जैन आदी कडाक्याची थंडी असलेल्या तीर्थक्षेत्री अनवाणी पायाने जाऊन नदीमध्ये स्नान करणे, या नियमाचे युवकांसमवेत वृद्धही मोठ्या भक्तीभावाने पालन करतात, यातून त्यांची श्रद्धा लक्षात येते.

५. शेकडो विदेशी आणि उच्चपदस्थ व्रतस्थपणे कल्पवास करतात !

प्रतिवर्षी भारतात तीर्थक्षेत्री कल्पवास करण्यासाठी शेकडो विदेशी येतात. विविध देशांमधील नागरिकांनी कल्पवास समजून घेऊन प्रतिवर्षी कल्पवास करणे, हे त्यांना आलेल्या आध्यात्मिक प्रचीतीमुळेच शक्य आहे. प्रयागराज येथे चालू असलेल्या महाकुंभ पर्वातही शेकडो विदेशी कल्पवासाकरता आले आहेत. यासह भारतामधीलही अधिवक्ता, डॉक्टर, भारतीय प्रशासकीय सेवेतील अधिकारी, अभियंता आदीही उच्चशिक्षित आणि उच्चपदस्थही प्रयागराज येथे कल्पवासाकरता आले आहेत. अशा प्रकारे विदेशी आणि भारतातील उच्चपदस्थ तीर्थक्षेत्री येऊन व्रतस्थपणे कल्पवास करतात. अशा प्रकारे गरीब असो वा श्रीमंत, स्वत:मधील आर्थिक, शैक्षणिक आणि विद्याभूषण यांचा कोणत्याही प्रकारचा भेद न करता कल्पवास करतात.

६. जीवन समृद्ध करणारा कल्पवास

कल्पवासामुळे भाविकांना आध्यात्मिक लाभ तर होतोच; परंतु त्यांच्या जीवनशैलीमध्येही साधकत्व निर्माण होते. त्यामुळे प्रतिकूल परिस्थितीत चिकाटीने साधना करणे, परिस्थिती स्वीकारणे, त्यात समाधानाने रहाणे, भगवंताशी अनुसंधान राखणे आणि सर्वांत महत्त्वाचे, म्हणजे भगवंताप्रती निर्माण होणारी श्रद्धा अन् भाव कल्पवासियांचे जीवन समृद्ध करतो. केवळ भारतियांनाच नव्हे, तर विदेशी लोकांनाही आध्यात्मिक आनंद प्रदान करणारी भारताची ही प्राचीन साधना परंपरा निश्चितच वैशिष्ट्यपूर्ण आहे.

– श्री. प्रीतम नाचणकर, विशेष प्रतिनिधी, प्रयागराज, उत्तरप्रदेश. (१५.१.२०२५)