मुंबई, ३० ऑगस्ट (वार्ता.) – राजकोट दुर्गावर छत्रपती शिवाजी महाराज यांचा नवीन पुतळा उभारण्यासाठी राज्य सरकारने सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अपर मुख्य सचिव मनीषा पाटणकर-म्हैसकर यांच्या अध्यक्षतेखाली ९ जणांची समिती स्थापन केली आहे. या समितीमध्ये भारतीय नौदलाचे प्रतिनिधी कमोडोर एम्. दोराईबाबू, ‘जे.जे. स्कूल ऑफ आर्किटेक्चर’चे संचालक राजीव मिश्रा, सरखेल कान्होजी आंग्रे यांचे वंशज श्री. रघुजी आंग्रे यांचा समावेश आहे. इतिहासकार जयसिंगराव पवार यांना या समितीमध्ये विशेष निमंत्रित म्हणून घेण्यात आले आहे. नवीन पुतळ्याविषयीची संकल्पना, कामाचे स्वरूप, कार्यपद्धती यांचा अभ्यास ही समिती सरकारला सादर करेल. याविषयीचा अहवाल लवकरात लवकर सादर करण्याचे निर्देश सरकारने समितीला दिले आहेत.