Eight Fisherman Arrested : सागरी सीमा ओलांडल्‍यावरून श्रीलंकेच्‍या नौदलाकडून ८ भारतीय मासेमारांना अटक

चेन्‍नई (तमिळनाडू) – श्रीलंकेच्‍या सागरी सीमेत मासेमारी करणार्‍या ८ भारतीय मासेमारांना श्रीलंकेच्‍या नौदलाने अटक केली आहे. धनुषकोडी आणि थलाईमन्‍नार येथे  मासेमारी करत असतांना श्रीलंकेच्‍या नौदलाच्‍या गस्‍ती नौकांनी त्‍यांना घेरले. त्‍यांनी मासेमारांची नौका अडवली आणि नौकेवरील ८ मासेमारांना अटक केली.

१. आंतरराष्‍ट्रीय सागरी सीमा ओलांडल्‍याचे कारण सांगत श्रीलंकेच्‍या नौदलाने ७२ दिवसांत १६३ भारतीय मासेमारांना आतापर्यंत अटक केली आहे. दोन्‍ही देशांमधील राजनैतिक चर्चेनंतर अटक केलेल्‍या सर्व मासेमारांना टप्‍प्‍याटप्‍प्‍यांमध्‍ये सोडण्‍यात येत आहे.

२. मासेमारांना अटक केल्‍यामुळे तमिळनाडूतील रामनाथपूरम्, नागापट्टिनम् आणि पुदुकोट्टई येथील मासेमारी उद्योगाला मोठा धक्‍का बसला आहे. या प्रकरणात श्रीलंका आणि भारत यांच्‍यातील राजनैतिक चर्चेद्वारे कायमस्‍वरूपी तोडगा काढण्‍याची मागणी मासेमार करत आहेत.

संपादकीय भूमिका

भारतीय सागरी सीमा कुठपर्यंत आहे, हे मासेमारांना समजण्‍यासाठी भारत सरकार प्रयत्न का करत नाही ? भारत आणखी किती वर्षे भारतीय मासेमारांना अशा प्रकारे अटक होऊ देणार आहे ?