दिवसभरातील घडामोडींवर एक दृष्टीक्षेप : बदलापूर येथील नराधमाचे हातपाय कापून चौरंगा करावा !; भाजपला संपवणे हाच मविआचा कार्यक्रम ! – मुनगंटीवार, वनमंत्री…

बदलापूर येथील नराधमाचे हातपाय कापून चौरंगा करावा  !

राज ठाकरे यांची चेतावणी

यवतमाळ – राज्यामध्ये कायद्याचा वचक राहिलेला नाही. त्यामुळे बदलापूरसारख्या घटना घडत आहेत. यामध्ये पोलिसांचा अजिबात दोष नाही; कारण त्यांच्यावर राज्यकर्त्यांचा दबाव असतो. त्यांना दबाव सहन करावा लागतो; मात्र अशा नराधमांना छत्रपती शिवाजी महाराजांसारख्या महाशक्तीची आवश्यकता आहे. महाराजांनी राझांचा पाटील याचे हात पाय कापून जसा चौरंग केला होता, तसेच याविषयी केले पाहिजे, असे मत मनसेचे प्रमुख राज ठाकरे यांनी यवतमाळ येथील सभेत व्यक्त केले.

राज ठाकरे सध्या विदर्भाच्या दौर्‍यावर आहेत. २३ ऑगस्ट या दिवशी यवतमाळ येथे आयोजित केलेल्या सभेत ते बोलत होते. ‘पोलिसांच्या मागे चौकशी लावली जाते आणि निलंबनाची कारवाई केली जाते; मात्र जे लोक सत्तेत बसले आहेत, त्यांची कधीही चौकशी होत नाही’, असा आरोप त्यांनी या वेळी केला.

ते पुढे म्हणाले की, एकदा राज ठाकरे याच्या हातात राज्याची सत्ता देऊन पहा. राज्य कसे हाताळले जाते, हे मी तुम्हाला दाखवून देईन. कायद्याची भीती काय असते ? हे तुम्हाला दाखवून देईन. परत महिलांकडे कोणीही वक्र दृष्टीने पहाणार नाही.


भाजपला संपवणे हाच मविआचा कार्यक्रम ! – मुनगंटीवार, वनमंत्री

नागपूर – बदलापूरची घटना वेदना देणारी आहे. यातील आरोपीला कठोर शिक्षा देण्यासाठी सर्वांनी एक सुरात विचार केला पाहिजे. भाजपला संपवणे हाच महाविकास आघाडीतील तीनही घटक पक्षांचा एककलमी कार्यक्रम आहे. याच भाजप द्वेषातून उद्धव ठाकरे काँग्रेसचे उपरणे घालून त्यांच्या व्यासपिठावर गेले आहेत, असा आरोप भाजपचे ज्येष्ठ नेते आणि वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी २२ ऑगस्ट या दिवशी माध्यमांशी बोलतांना केला.


अत्याचार करून मुलीची हत्या करणार्‍याला फाशी द्या

शिये गाव (जिल्हा कोल्हापूर) बंद ठेवत ग्रामस्थांची मागणी

कोल्हापूर – बिहारमधून कामासाठी आलेल्या कुटुंबातील १० वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून तिची हत्या करणारा आरोपी दिनेशकुमार केशनाथ साह याला फाशी द्यावी, या मागणीसाठी शिये ग्रामस्थांनी २३ ऑगस्टला बंद पुकारला  होता. आरोपी साह हा मुलीचा मामा असून त्याला पोलिसांनी २२ ऑगस्टला रात्री उशिरा अटक केली.


लाडका डोंगर योजना राबवण्याची मागणी !

पुणे – हिंगणे भागातील तळजाई टेकडीच्या मागील भागाचे सपाटीकरण चालू आहे. त्यामुळे आगामी काळात मोठी दुर्घटना घडू शकते. ते टाळण्यासाठी पुणे महापालिका आणि वनविभागाने तातडीने पावले उचलावीत. लाडकी बहीण योजनेप्रमाणे ‘लाडका डोंगर योजना’ राबवावी आणि डोंगर रांगांचे रक्षण करावे, अशी मागणी पर्यावरणप्रेमींनी पालकमंत्र्यांकडे केली आहे. अनंत घरत यांनी पत्र पाठवून पालकमंत्री अजित पवार यांना केली आहे. घरत यांनी महापालिका आयुक्त आणि तहसीलदार यांनाही पत्र पाठवले आहे.

पुण्यातील टेकड्यांवर जैववैविध्य उद्यानाचे आरक्षण असतांना अनधिकृतपणे भूमीचे तुकडे करून भूमाफिया जनतेची आणि प्रशासनाची फसवणूक करत आहेत. हिंगणे खुर्द भागातील अथर्वनगर जवळील विकास आराखड्यातील ४० फुटी नैसर्गिक नाला भूमाफियांनी बुजवला, तर डोंगर फोडीतून गौणखनिज, मुरूम आदींचे उत्खनन करून मोठ्या प्रमाणात विक्री केली. प्रशासनाने दोषींवर कारवाई करावी, अशी तक्रार घरत यांनी केली आहे. टेकड्यांवर होणारे अनधिकृत बांधकाम आणि प्लॉटिंगची माहिती महापालिकेला देण्यासाठी बीट ऑफिसर नेमले आहेत; मात्र त्यांनी त्यांचे दायित्व पार पाडले नाही. तळजाई टेकडी लगतच्या भागात सपाटीकरण केल्यामुळे पावसात वनविभागाची भिंत कोसळून दुर्घटना होण्याची शक्यता आहे. प्रशासनाने याकडे लक्ष देऊन संबंधितांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी पर्यावरणप्रेमी अनंत घरत यांनी केली.


‘नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षे’चा दिनांक लवकरच घोषित !

पुणे – ‘आय.बी.पी.एस्.’ आणि ‘एम्.पी.एस्.सी.’ची राज्य सेवा संयुक्त पूर्व परीक्षा या दोन्ही एकाच दिवशी (२५ ऑगस्ट) ठेवण्यात आली होती. त्या विरोधात पुणे येथे परीक्षार्थी विद्यार्थ्यांनी आंदोलन केले होते. त्याची नोंद घेत महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची ‘नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षे’चा दिनांक लवकरच घोषित करण्यात येईल, असे आयोगाकडून सांगण्यात आले आहे. ‘महाराष्ट्र लोकसेवा आयोगा’ने तसे ट्वीट केले आहे. या दोन्ही परीक्षा एकाच दिवशी नको म्हणून पुणे येथे २० ऑगस्टपासून परीक्षार्थी विद्यार्थ्यांनी आंदोलनास प्रारंभ केला होता.

विविध राजकीय पक्षांनी या आंदोलनाला पाठिंबा दिला होता. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी आंदोलनस्थळी बसून विद्यार्थ्यांना पाठिंबा दिला होता, तसेच ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी ‘विद्यार्थ्यांच्या मागण्या मान्य झाल्या नाहीत, तर मी स्वत: आंदोलनस्थळी जाऊन आंदोलन करीन’, अशी चेतावणी राज्य सरकारला दिली होती. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विद्यार्थ्यांच्या आंदोलनाची नोंद घेतली. दोन्ही परीक्षा एकाच दिवशी आणि कृषि विभागाच्या २५८ जागांचा समावेश राज्य सेवा पूर्व परीक्षेत झालेला नाही. या कारणांमुळे विद्यार्थ्यांमध्ये नाराजी आहे. यासंबंधी सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी विनंती ‘महाराष्ट्र लोकसेवा आयोगा’च्या अध्यक्षांना केली होती.