Mumbai HC On Missing Women : महाराष्ट्रातून गायब झालेल्या लाखो महिलांविषयी न्यायालयाचा सरकारला प्रतिज्ञापत्र सादर करण्याचा आदेश !

मुंबई : राज्यातून गायब झालेल्या लाखो महिलांचा शोध घेण्यासाठी अथवा महिलांची तस्कारी रोखण्यासाठी कोणती उपाययोजना केली ? किंवा करणार आहात ? हे प्रकार रोखण्यासाठी सरकारकडे कोणती यंत्रणा आहे ? असे प्रश्‍न उपस्थित करत मुंबई उच्च न्यायालयाने महाराष्ट्रातून गायब झालेल्या लाखो महिलांविषयी प्रतिज्ञापत्र सादर करण्याचा आदेश राज्य सरकार, राज्य महिला आयोग आणि रेल्वे पोलीस यांना दिला आहे.

१. राज्यातून गायब झालेल्या एका युवतीविषयी न्यायालयात प्रविष्ट (दाखल) करण्यात आलेल्या एका याचिकेच्या सुनावणीच्या वेळी न्यायालयाने वरील आदेश दिला. या याचिकेत याचिकाकर्त्याने वर्ष २०१९ ते २०२१ या कालावधीत महाराष्ट्रातून १ लाखाहून अधिक महिला गायब झाल्याचे नमूद केले होते. यावरून न्यायालयाने राज्य सरकार आणि पोलीस यांना याविषयीची भूमिका स्पष्ट करण्याचे निर्देश दिले.

२. ‘एवढ्या मोठ्या संख्येने गायब झालेल्या मुली आणि महिला यांचा शोध घेणे हे राज्य सरकार आणि पोलीस यंत्रणा यांचे कर्तव्य आहे. त्यामुळे पोलीस प्रशासन, रेल्वे पोलीस, दक्षता पथक यांनी या समस्येकडे गांभीर्याने पहावे’, असे या वेळी न्यायालयाने म्हटले.

३. मुख्य न्यायमूर्ती देवेंद्रकुमार उपाध्याय आणि न्यायमूर्ती अमित बोरकर यांच्या खंडपिठापुढे ही सुनावणी झाली. या प्रकरणी न्यायालयाने राज्य महिला आयोगाला प्रतिवादी करून भूमिका स्पष्ट करण्याचे निर्देश दिले आहेत.

संपादकीय भूमिका

  • वास्तविक न्यायालयावर असा आदेश देण्याची वेळ येऊ नये. सरकारने स्वतःहून या प्रश्‍नाकडे गांभीर्याने लक्ष देणे आवश्यक !
  • महिलांसाठी विविध योजना आणणारे सरकार याकडे आतातरी गांभीर्याने पाहील, अशी अशा जनतेने करावी का ? कारण महिलाच गायब झाल्या, तर सरकार योजना तरी कुणासाठी राबवील ?