मॉस्को (रशिया) : युक्रेनच्या सैन्याने रशियामध्ये अनुमाने १० किमी घुसखोरी करून १ सहस्र किमीचा परिसर कह्यात घेतला आहे. दुसर्या महायुद्धानंतर पहिल्यांदाच रशियाचा भूभाग शत्रूच्या कह्यात गेला आहे. त्यामुळे रशियन सैन्यावर प्रचंड दबाव असून ते युक्रेनला प्रत्युत्तर देत आहे. या पार्श्वभूमीवर रशियाच्या पुतिन सरकारने ब्रिटनमधील लंडन आणि अमेरिकेतील न्यूयॉर्क या शहरांवर अणूबाँब टाकावा, अशी मागणी आता रशियात जोर धरत आहे. रशियन संरक्षण तज्ञ स्टॅनिस्लाव्ह क्रॅपिव्हनिक यांनी अलीकडेच म्हटले होते की, रशिया आधीच उत्तर अटलांटिक करार संघटना (नाटो) शी युद्ध करत आहे. आता लंडन आणि न्यूयॉर्क या शहरांवर अणूबाँब टाकून त्याला प्रत्युत्तर दिले पाहिजे. क्रॅपिव्हनिक म्हणाले, ‘अमेरिकी लोक हे मानव नसून प्राणी आहेत !’
१. फेब्रुवारी २०२२ मध्ये चालू झालेले रशिया-युक्रेन युद्ध आता धोकादायक वळणावर पोचले आहे. या युद्धामुळे युरोपमध्ये दुसर्या महायुद्धानंतरचे सर्वांत मोठे निर्वासितांचे संकट निर्माण झाले आहे.
२. रशियाशी सामना करण्यासाठी अमेरिका, ब्रिटन इत्यादी नाटो देशांनी युक्रेनला अनेक अब्ज डॉलर्सची शस्त्रे आणि राजनैतिक साहाय्य दिले आहे.
३. ६ ऑगस्ट या दिवशी युक्रेनच्या सैन्यदलाने रशियाच्या कुर्स्क भागात आक्रमण करून १ सहस्र किमीचा परिसर कह्यात घेतला होता.
४. रशियाचे अणूऊर्जा केंद्र कुर्स्क भागातच आहे. तेथून मोठ्या प्रमाणावर वीजनिर्मिती केली जाते. रशियाच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्या मारिया झाखारोवा यांनी आरोप केला आहे की, युक्रेनचे सैन्य या अणूऊर्जा केंद्राला लक्ष्य करणार आहे.
५. क्रॅपिव्हनिक यांनीही या धोक्याचा पुनरुच्चार करत म्हटले की, कीव शहराला पृथ्वीच्या नकाशावरून पुसून टाकण्याची आवश्यकता आहे. युक्रेनने सामरिक अणूबाँबची मर्यादा ओलांडली आहे. हे उघड युद्ध आहे आणि याला प्रत्युत्तर दिले पाहिजे.
६. रशियाकडे सर्वाधिक ५ सहस्र ५८० अणूबाँब आहेत, तर अमेरिकेकडे ५ सहस्र ४४ अणूबाँब आहेत.