मुंबई – महाविकास आघाडीमध्ये अडथळा आणणारे काही लोक आहेत. महाविकास आघाडीमध्ये मुख्यमंत्रीपदाचा चेहरा कोण ? उद्धव ठाकरे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा आहेत कि आणखी कोण आहेत ? शरद पवार आणि पृथ्वीराज चव्हाण हे येथे आहेत. मुख्यमंत्रीपदासाठी तुमच्यापैकी कुणाचाही चेहरा असेल, तर घोषित करा. मी पाठिंबा देतो, अशी घोषणा उद्धव ठाकरे यांनी केली. १६ ऑगस्ट या दिवशी षण्मुखानंद सभागृहात महाविकास आघाडीच्या मेळाव्यात ते बोलत होते. या वेळी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.
या वेळी उद्धव ठाकरे म्हणाले, ‘‘निवडणूक आयोगाने महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक घोषित करावी. आमची सिद्धता आहे. लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीने राजकीय शत्रूला पाणी पाजले आहे. लोकसभेची निवडणूक राज्यघटनेच्या संरक्षणाची लढाई होती. आता ही लढाई महाराष्ट्राचा स्वाभिमान जपण्याची लढाई आहे.’’