सोलापूर – मागील ४० वर्षे अविरतपणे प्रसिद्ध होणारे दैनिक ‘तरुण भारत’ हा एक ब्रँड आहे, तर आजपर्यंत तरुण भारत वृत्तपत्रासाठी काम केलेले कर्मचारी हे कर्मयोगी आहेत. या कर्मयोग्यांचे योगदानही अनमोल आहे, असे प्रतिपादन ‘तरुण भारत मिडिया लिमिटेड’चे अध्यक्ष आणि ज्येष्ठ निरुपणकार विवेक घळसासी यांनी केले. ८ ऑगस्ट या दिवशी तरुण भारतचा वर्धापनदिन मोठ्या उत्साहात पार पडला. त्या वेळी ते बोलत होते. याप्रसंगी कार्यकारी संचालक आणि मुख्य समूह संपादक श्री. दिलीप पेठे यांची प्रमुख उपस्थिती होती.
मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने कार्यक्रमाचा प्रारंभ करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक ज्ञानेश्वर म्याकल यांनी केले, तर सूत्रसंचालन समितीचे सदस्य दत्तात्रय आराध्ये यांनी केले. मार्गदर्शन करतांना श्री. घळसासी यांनी तरुण भारतच्या आजपर्यंतच्या संपादकांसह सर्व कर्मचार्यांचे (कर्मयोग्यांचे) योगदान कसे अनमोल आहे, हे सांगितले, तसेच तरुण भारतवर प्रेम करणार्या वाचकांमुळे आजही तरुण भारत सर्वत्र लोकप्रिय असल्याचे ते म्हणाले. याप्रसंगी तरुण भारतमध्ये सलग ३८ वर्षे निष्ठेने सेवा बजावून निवृत्त झालेले श्री. शरणप्पा शाबादे यांचा सेवानिवृत्ती आणि एकसष्ठीनिमित्त सहपरिवार सन्मान सोहळा मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडला.
दै. ‘तरुण भारत’च्या मुख्य संपादकपदी प्रशांत माने !
दैनिक तरुण भारतचे निवासी संपादक प्रशांत माने यांना मुख्य संपादकपदी पदोन्नत्ती देण्याची घोषणा श्री. विवेक घळसासी आणि श्री. दिलीप पेठे यांनी या वेळी केली.