संजय राऊत यांचा आरोप !
मुंबई – वक्फ बोर्डाच्या निमित्ताने ‘मातोश्री’च्या बाहेर आंदोलन करण्यासाठी आलेले १० ते १२ जण गुन्हेगार होते, ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी संबंधित आहेत, असा आरोप ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केला. काही छायाचित्रे दाखवत संजय राऊतांनी शिंदेंसह केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यावरही घणाघाती आरोप केले.
राऊत या वेळी म्हणाले की, ती माणसे एकतर ‘वर्षा’वर असतात किंवा ठाण्यातील शिंदेंच्या निवासस्थानी राहतात, किंवा मंत्रालयाच्या सहाव्या मजल्यावर असतात. हे सगळे ‘सुपारी गँग’चे सदस्य आहेत. त्यांचे सरदार दिल्लीत बसतात. अहमद शाह अब्दाली यांच्या पेरोलवर आहेत, अशी टीका संजय राऊत यांनी मुख्यमंत्री शिंदे यांना उद्देशून केली.
आम्हाला मराठी माणसात भांडणे लावायची नाहीत आणि कुणी लावत असेल, तर आम्हाला ते मान्य नाही, महाराष्ट्र एकसंघ राहिला पाहिजे, असेही ते या वेळी म्हणाले.