|
न्यूयॉर्क (अमेरिका) – गुंतवणुकीच्या संदर्भात संशोधन करणारे अमेरिकेतील आस्थापन ‘हिंडेनबर्ग रिसर्च कॉर्पोरेशन’ने गेल्या वर्षी भारतातील अदानी उद्योगसमुहावर अत्यंत गंभीर आरोप केले होते. हे आरोप तथ्यहीन असल्याचे सांगून सर्वोच्च न्यायालयाने जानेवारी २०२४ मध्ये ते फेटाळले होते. असे असले, तरी आता या आस्थापनाने थेट सरकारी संस्था सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया म्हणजेच ‘सेबी’च्या (SEBI) विद्यमान अध्यक्षा माधवी पुरी बुच आणि त्यांचे पती धवल बुच या दोघांचा अदानी घोटाळ्याशी संबंध असल्याचा आरोप केला आहे.
काय म्हटले ‘हिंडेनबर्ग रिसर्च’ने ?
‘हिंडेनबर्ग’ आस्थापनाचे म्हणणे आहे की, ‘सेबी’च्या अध्यक्षा माधवी बुच आणि त्यांचे पती यांची घोटाळ्यात वापरलेल्या बर्मुडा आणि मॉरिशस या देशांतील गुंतवणुकीत भागिदारी होती. त्याचाच उपयोग विनोद अदानी यांनी झाला. त्यामुळे सेबीने इतक्या मोठ्या घोटाळा प्रकरणात कोणतीही कारवाई केली नाही. त्याने आश्चर्यकारकरित्या कारवाईविषयी निरुत्साह दाखवला. विशेष म्हणजे त्यांना या घोटाळ्याची इत्यंभूत माहिती होती; परंतु त्यांनी या प्रकरणी कोणतीच कारवाई न करता हिंडेनबर्गलाच नोटीस पाठवली.
हिंडेनबर्गने म्हटले आहे की, आम्ही अदानी समूहाच्या घोटाळ्यांवर १०६ पानांचा अहवाल सेबीला दिला होता. त्याने ‘पुरेसे पुरावे नाहीत’, असे म्हणून अदानी समूहावरील कारवाई टाळली.
आमचे सर्व आर्थिक व्यवहार हे खुल्या पुस्तकासारखे ! – ‘सेबी’च्या अध्यक्षा
सेबीच्या अध्यक्षा माधवी बुच आणि त्यांचे पती यांनी ‘हिंडेनबर्ग’च्या आरोपांवर एक संयुक्त निवेदन जारी करत म्हटले की, हे सर्व आरोप निराधार आहेत. तसेच आमचे सर्व आर्थिक व्यवहार हे खुल्या पुस्तकासारखे आहेत. संबंधित सर्व कागदपत्रे आम्ही सेबीकडे सादर केली आहेत. याखेरीज सेबीच्या अध्यक्षा होण्यापूर्वीची कागदपत्रेही जाहीर करण्यात आम्हाला कोणताही संकोच नाही. यापूर्वी सेबीने हिंडेनबर्ग रिसर्चवर कारवाई केली आहे. त्यामुळेच आमचे चारित्र्यहनन करण्याचा प्रयत्न हिंडेनबर्गकडून केला जात आहे, असा आरोपही त्यांनी केला.
सर्व आरोप दुर्भावनापूर्ण असून वस्तूस्थितीशी छेडछाड करणारे ! – अदानी उद्योगसमूह
दुसरीकडे अदानी उद्योगसमुहानेही यावर त्याची भूमिका जाहीर केली आहे. उद्योगसमुहाने म्हटले की, हिंडेनबर्ग रिसर्चने नव्या अहवालातून केलेले सर्व आरोप दुर्भावनापूर्ण असून वस्तूस्थितीशी छेडछाड करून मांडण्यात आले आहेत. आमच्यावर केलेले हे सर्व आरोप आम्ही पूर्णपणे नाकारतो. यापूर्वी केलेले सर्व आरोप पूर्णपणे निराधार असल्याचे सिद्ध झाले होते. आमची परदेशातील आर्थिक संरचना पूर्णपणे पारदर्शक आहे. सर्व तथ्ये आणि तपशील अनेक सार्वजनिक कागदपत्रांमध्ये नियमितपणे प्रदर्शित केले जातात. तसेच अपकीर्ती करण्याच्या या हेतूपुरस्सर प्रयत्नात नमूद केलेल्या व्यक्ती किंवा घटना यांच्याशी अदानी समूहाचा कोणताही व्यावसायिक संबंध नाही !
संपादकीय भूमिकाअदानी उद्योगसमुहाचा थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी संबंध असल्याचे सांगून विरोधी पक्ष पंतप्रधानांना कात्रीत पकडण्यात गुंतलेे आहेत. गेल्या वर्षी या ‘हिंडेनबर्ग रिसर्च’ या आस्थापनाकडून केलेले सर्व आरोप निराधार असल्याचे सिद्ध झाल्यानंतर आता नव्याने ते एका सरकारी संस्थेवरच आरोप करत आहेत. यातून हे राजकीय षड्यंत्र असल्याचे नाकारले जाऊ शकत नाही ! |