‘सेरोपेजिया शिवरायीयाना’, असे नामकरण !
पुणे – विशाळगड आणि सह्याद्री पर्वतांमध्ये आढळून येणारी अतिशय सुंदर अशा ‘कंदीलपुष्प’ या वनस्पतीच्या नव्या प्रजातीचा शोध लागला असून, त्याला छत्रपती शिवाजी महाराज यांचे नाव देण्यात आले आहे. या प्रजातीचे नामकरण ‘सेरोपेजिया शिवरायीयाना’ असे करण्यात आले आहे. ही वनस्पती वेलवर्गीय असून त्याचे ४ वेल संशोधकांना विशाळगडावर दिसून आले आहेत.
‘इंटरनॅशनल युनियन फॉर कॉन्झर्वेशन ऑफ नेचर’ने कंदीलपुष्पाच्या काही प्रजातींना ‘संकटग्रस्त’ म्हणून अतीधोकादायक सूचीमध्ये (रेड लिस्ट) समाविष्ट केले आहे. या वनस्पतीचा शोध वनस्पतीशास्त्रज्ञ अक्षय जंगम, डॉ. शरद कांबळे, डॉ. श्रीरंग यादव, रतन मोरे, डॉ. नीलेश पवार यांनी लावला आहे. याविषयीचे संशोधन ६ ऑगस्टला ‘फायटोटॅक्सा’ या आंतरराष्ट्रीय जर्नलमध्ये प्रकाशित झाले आहे. ‘सेरोपेजिया शिवरायीयाना’ ही वेलवर्गीय वनस्पती केवळ विशाळगडावरच दिसली आहे.
या नव्या प्रजातीला महाराजांचे नाव का दिले ?
छत्रपती शिवरायांनी स्वराज्याची मुहूर्तमेढ याच सह्याद्री पर्वतरांमध्ये रोवली. गडदुर्गांच्या माध्यमांतून शिवरायांनी या वनस्पतींना संरक्षणच दिले होते. ‘गडांची राखण करावी, निसर्ग जपावा’ अशीच भावना शिवरायांची होती. त्यामुळे त्यांची निसर्ग संवर्धनाची भावना लक्षात घेऊन या वनस्पतीला त्यांचे नाव देण्यात आले.