अनिष्ट शक्तींचा तीव्र त्रास असतांनाही सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या कृपेने ज्ञानप्राप्त करणारी ६५ टक्के आध्यात्मिक पातळीची सुश्री मधुरा भोसले !

‘सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या एका भावभेटीत प.पू. गुरुदेवांनी आम्हा उभयतांना (सुश्री मधुराच्या आई-बाबांना) विचारले की, ‘कु. मधुराला पूर्णवेळ साधना करण्यासाठी तुम्ही कशी काय अनुमती दिलीत ?’ त्यावर कु. मधुराने सांगितले की, आईने मुले होतांना देवाला प्रार्थना केली होती की, ‘मला राष्ट्र आणि धर्म यांसाठी काही कार्य करणारी मुले होऊ देत.’ त्यामुळे मला लहानपणापासूनच राष्ट्र आणि धर्म यांची आवड होती.’ मधुराने साधनेला आरंभ करून आश्रमात पूर्णवेळ साधना करण्यासाठी येईपर्यंत केलेल्या साधनेच्या प्रवासाविषयी सांगितलेली सूत्रे येथे लेखबद्ध केली आहेत.

सुश्री (कु.) मधुरा भोसले

१. कु. मधुराला पहिल्यापासून साधना आणि सेवा यांची तळमळ असणे

वर्ष १९९८ मध्ये आम्ही (मी आणि डॉ. भोसले) सनातन संस्थेच्या मार्गदर्शनाखाली साधना करू लागलो. तेव्हा आम्ही कराड, जिल्हा सातारा येथे होतो. घरी प्रसारातील साधक आणि संत साधकांना मार्गदर्शन करण्यासाठी येत होते. तेव्हा मधुरा शाळेचा अभ्यास सांभाळून त्यांचे मार्गदर्शन ऐकत होती, तसेच प्रासंगिक सेवाही करत असे. दिवाळीसाठी सनातन संस्थेचे आकाशकंदिल बनवण्याच्या सेवेत ती साधकांच्या लहान मुलांबरोबर सहभागी होत असे. कापडी फलक बनवण्याच्या सेवेमध्येही ती शनिवारी आणि रविवारी उत्साहाने सहभागी होत असे. मंदिरांमध्ये ग्रंथप्रदर्शन लावण्याची सेवा आणि साप्ताहिक ‘सनातन प्रभात’चे अंक वितरण करण्याची सेवाही ती करत असे. त्याचप्रमाणे स्वसंरक्षण प्रशिक्षण वर्गातही सहभागी होऊन स्वतः स्वसंरक्षण आणि बालसंस्कार वर्ग घेण्याची सेवाही करत असे. तिच्या पुढच्या शिक्षणासाठी आम्ही पुण्याला स्थलांतरित झालो. तेव्हा तेथेही सत्संगात स्वतःच्या अनुभूती सांगणे, आठवड्याला भावसत्संगाला जाणे, गुरुपौर्णिमेच्या सेवेत लहान लहान सेवा करणे, यांची तिला आवड होती. ‘तिच्यात पहिल्यापासून साधनेची तळमळ होती’, हे मला प्रकर्षाने जाणवले.

२. पूर्णवेळ साधना करण्यासाठी आश्रमात जाण्याची तीव्र तळमळ असणे

डॉ. भिकाजी भोसले

आम्ही वर्ष २००५ मध्ये पिंपरी, पुणे येथे रहात होतो. एका रविवारी सकाळी आम्हाला दूरभाष आला, ‘‘प.पू. डॉक्टर मुंबईहून मिरजला जाणार आहेत. पुणे राजमार्गावरून (हायवे ने) गाडी जाणार आहे. तुम्ही वाकड फाट्याच्या जवळ येऊ शकता का ? प.पू. गुरुदेवांना कु. मधुराला भेटायचे आहे ?’’ आम्ही दहा मिनिटांत आवरून चारचाकीने निघालो. तेथे वाकड फाट्याला जाऊन गाडी एका बाजूला थांबवून वाट पहात होतो. अक्षरशः पाच मिनिटांत प.पू. डॉक्टरांची पिवळ्या रंगाची चारचाकी, म्हणजे त्यांचा गरुड आमच्या गाडीजवळ येऊन उभा राहिला. प.पू. डॉक्टर गाडीबाहेर आले. त्यांनी आम्हाला प्रथम खाऊ दिला. कु. मधुराची चौकशी केली; कारण तेव्हा तिला अनिष्ट शक्तींचा तीव्र त्रास होत होता. ‘ती आता काय शिकते ?’, हे प.पू. डॉक्टरांनी विचारले. मी म्हटले, ‘‘ती बी.कॉम.च्या शेवटच्या वर्षाला आहे. त्यासह ती चार्टड अकांऊटंटचे (सी.ए.चे) दुसर्‍या वर्षाचेही शिक्षण घेत आहे.’’ त्यावर प.पू. डॉक्टर म्हणाले, ‘‘मार्च-एप्रिलमध्ये तिची बी.कॉमची परीक्षा आहे. ती परीक्षा झाल्यावर तिला गोव्याला आश्रमात पाठवा.’’ त्यावर आम्ही दोघांनी होकार दिला. त्यापूर्वी ती दिवाळीच्या सुटीत आणि मे मासाच्या सुटीत मिरज येथील सनातनच्या आश्रमात रहात होती. त्यामुळे तिला आश्रमात जाण्याची सवय झाली होती. तिची परीक्षा संपल्यावर कु. मधुरा एकही दिवस घरी थांबायला सिद्ध नव्हती. त्यामुळे आम्ही तिला घेऊन लगेच आश्रमात पोचलो.’

 

– डॉ. भिकाजी भोसले (सुश्री मधुरा यांचे बाबा)

३. कु. मधुराला लहानपणापासून राष्ट्र आणि धर्म यांची आवड होती.

४. कु. मधुरामध्ये बालपणापासून सूक्ष्मातील कळण्याची दैवी क्षमता असणे

डॉ. (सौ.) कस्तुरी भोसले

कु. मधुराला बालपणापासूनच सूक्ष्मातील दिसत होते. तसे ती सांगत असे. ती ३ मासांची असतांना वरचे दूध पाजतांना पुष्कळ रडायची. तिला मोठी झाल्यावर आम्ही विचारले, ‘‘तू लहानपणी दूध पितांना एवढी का रडत होतीस ?’’ तेव्हा तिने सांगितले, ‘‘आपले जयसिंगपूरचे घर कौलारू होते. दूध पाजण्यासाठी मला मांडीवर आडवे घेतले की, मला घराच्या वाशाला मोठे साप वेटोळे घातलेले दिसायचे. त्यामुळे मी रडत होते.’’ ३ मासांच्या बाळाला बोलता येत नसल्यामुळे त्या वेळी तिला आम्हाला काही सांगता येत नव्हते. दूध हा सात्त्विक पदार्थ असल्याने वाईट शक्ती तिला पिऊ देत नव्हती. नंतर बसायला लागल्यावर ती खायला शिकली. तेव्हा ती घराच्या छताकडे पहात नसे. त्यामुळे तिला जेवता येऊ लागले.’

– डॉ. (सौ.) कस्तुरी भोसले (सुश्री मधुरा यांची आई) (२५.१.२०२४)

  • सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे  ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केेलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.
  • सूक्ष्मातील दिसणे, ऐकू येणे इत्यादी (पंच सूक्ष्मज्ञानेंद्रियांनी ज्ञानप्राप्ती होणे) : काही साधकांची अंतर्दृष्टी जागृत होते, म्हणजे त्यांना डोळ्यांना न दिसणारे दिसते, तर काही जणांना सूक्ष्मातील नाद किंवा शब्द ऐकू येतात.
  • वाईट शक्ती : वातावरणात चांगल्या आणि वाईट शक्ती कार्यरत असतात. चांगल्या शक्ती चांगल्या कार्यासाठी मानवाला साहाय्य करतात, तर वाईट शक्ती त्याला त्रास देतात. पूर्वीच्या काळी ऋषिमुनींच्या यज्ञांत राक्षसांनी विघ्ने आणल्याच्या अनेक कथा वेद-पुराणांत आहेत. ‘अथर्ववेदात अनेक ठिकाणी वाईट शक्ती, उदा. असुर, राक्षस, पिशाच तसेच करणी, भानामती यांचा प्रतिबंध करण्यासाठी मंत्र दिले आहेत. वाईट शक्तींच्या त्रासांच्या निवारणार्थ विविध आध्यात्मिक उपाय वेदादी धर्मग्रंथांत सांगितले आहेत.
  • आध्यात्मिक त्रास : याचा अर्थ व्यक्तीमध्ये नकारात्मक स्पंदने असणे. व्यक्तीमध्ये नकारात्मक स्पंदने ५० टक्के किंवा त्यांहून अधिक प्रमाणात असणे, म्हणजे तीव्र त्रास, नकारात्मक स्पंदने ३० ते ४९ टक्के असणे, म्हणजे मध्यम त्रास, तर ३० टक्क्यांहून अल्प असणे, म्हणजे मंद आध्यात्मिक त्रास असणे होय. आध्यात्मिक त्रास हा प्रारब्ध, पूर्वजांचे त्रास आदी आध्यात्मिक स्तरावरील कारणांमुळे होतो. आध्यात्मिक त्रासाचे निदान संत किंवा सूक्ष्म स्पंदने जाणू शकणारे साधक करू शकतात.
  • येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक

या लेखाचा पुढील भाग वाचण्यासाठी येथे क्लिक करा – https://sanatanprabhat.org/marathi/824956.html