कित्येक वर्षे भारताच्या पूर्वेकडच्या किनार्यावरील डोंगराळ भागात असलेली आराकू व्हॅली (आंध्रप्रदेश) हा भाग
अत्यंत दरिद्रता आणि साम्यवाद्यांचे हिंसाचार असलेला भाग होता. या ठिकाणी रहाणार्यांना सरकारकडून ‘असुरक्षित आदिवासी गट’ या वर्गात घेण्यात आले होते. या भागातील लोक झाडे कापून ती जाळून नंतर शेती करण्यावर अवलंबून होते; परंतु आता त्या ठिकाणी स्थानिक लोक उच्च दर्जाच्या कॉफीचे उत्पादन करतात आणि ही कॉफी श्रीमंत युरोपियन लोकांना मोठ्या किंमतीमध्ये विकली जाते. ‘आराकू कॉफी’ हे आस्थापन कॉफीच्या बियांवर प्रक्रिया करून त्यांची विक्री करते, तसेच बेंगळुरू, मुंबई आणि पॅरिस (फ्रान्स) येथील उच्चभ्रू लोकांच्या वस्तीमध्ये कॅफे (उपाहारगृह) चालवते. या व्हॅलीमध्ये झालेला पालट हा शेतीविषयक यश दाखवणारा आहे. योग्य धोरण ठेवले, तर भारतातील इतर ग्रामीण भाग काय साध्य करू शकतील, याची ही झलक आहे.
– ब्रिगेडियर हेमंत महाजन (निवृत्त), पुणे.