आषाढ अमावास्या म्हणजेच दिव्यांची अमावास्या ! या दिवशी सुवासिनी स्त्रिया घरातील दिवे घासून-पुसून एकत्र मांडतात. त्यांच्याभोवती रांगोळ्या घालतात आणि ते दिवे प्रज्वलित करून त्यांची पूजा केली जाते. पूजेमध्ये पक्वान्नांचा महानैवेद्य दाखवला जातो. त्या वेळी पुढील मंत्राने दिव्याची प्रार्थना करतात. ती प्रार्थना अशी,
दीप सूर्याग्निरूपस्त्वं तेजसां तेज उत्तमम् ।
गृहाण मत्कृतां पूजां सर्वकामप्रदो भव ।।
अर्थ : हे दीपा, तू सूर्यरूप आणि अग्निरूप आहेस. तेजामध्ये तू उत्तम तेज आहेस. माझ्या पूजेचा तू स्वीकार कर आणि माझ्या सर्व इच्छा पूर्ण कर.
या दिवशीपासूनच पत्रीचे महत्त्व चालू होते. आघाडा, दुर्वा, पिवळी फुले यांनी दिव्यांची पूजा करावी. दुर्वा ही वंशवृद्धीचे प्रतीक आहे. त्यामुळे तीही अर्पण करून प्रार्थना करावी. वंशाचा दिवा म्हणून आपल्या घरातील छोटा मुलगा किंवा मुलगी यांचे औक्षण करावे.
– भारती चंद्रचूड
(साभार : ‘श्री गोंदवलेकर महाराज’ फेसबुक खाते)