अमेरिकेत स्‍थायिक झालेल्‍या भारतियांचा तेथील राजकारणात वाढत असलेला प्रभाव

अमेरिकेमध्‍ये स्‍थायिक झालेल्‍या भारतियांपैकी विशेषतः जे तंत्रज्ञान आणि वित्त क्षेत्रांमध्‍ये आहेत त्‍यांच्‍यासाठी राजकीयदृष्‍टीने आनंदाचे, म्‍हणजे मूळ भारतीय असलेल्‍या अन् डोनाल्‍ड ट्रंप यांचे समर्थक असलेले उपाध्‍यक्षपदाचे उमेदवार जे.डी. वान्‍स यांच्‍या पत्नी उषा चेलिकुरी भारतीय वंशाच्‍या आहेत. यामुळे विदेशातील भारतीय नागरिकांना बळ मिळाले आहे. जे.डी. वान्‍स यांना अमेरिकेचे उपाध्‍यक्ष होण्‍याची संधी आहे. यामुळे विदेशातील भारतीय नागरिकांचा नोव्‍हेंबरमध्‍ये असलेल्‍या निवडणुकीत केवळ मतदार म्‍हणून सहभाग न रहाता त्‍यांचे समर्थक आणि कार्यकर्ते म्‍हणून त्‍यांच्‍या प्रचार मोहिमेत ते सहभागी होत आहेत. गेल्‍या दोन दशकांमध्‍ये अमेरिकेतील भारतीय वांशिकता जलदगतीने वाढत आहे, यादृष्‍टीने हे महत्त्वाचे आहे.

१. अमेरिकेतील तांत्रिक क्षेत्रामध्‍ये भारतियांच्‍या संख्‍येत वाढ

अमेरिकेत स्‍थायिक झालेल्‍या भारतियांची संख्‍या ‘वाय टू के’ काळात (वर्ष २००० च्‍या काळात) तांत्रिक क्षेत्रामुळे जलदगतीने वाढली आहे. अमेरिकेत भारतीय भाषा बोलणार्‍यांचे प्रमाण वर्ष २०१६ मध्‍ये ३ लाख २० सहस्र होते, ते प्रमाण आता वर्ष २०२४ मध्‍ये १२.३ लाख एवढे झाले आहे. अमेरिकेतील भारतियांची संख्‍या ४.९ लाख एवढी आहे. ही संख्‍या भक्‍कम असून ती वाढत आहे. अमेरिकेतील भारतियांमध्‍ये हिंदी आणि गुजराती या भाषांनंतर आता तेलुगु ही अधिक प्रमाणात बोलली जाणारी भाषा झाली आहे. तंत्रज्ञानाविषयी कौशल्‍य असणारे अन् भारतीय भाषा बोलणारे बहुतांश भारतीय कॅलिफोर्निया, टेक्‍सास आणि न्‍यू जर्सी भागात रहात आहेत. वर्ष २०१७ पर्यंत कॅलिफोर्नियामधील भारतियांची संख्‍या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. तिथे आता कर्नाटक संगीत आणि कुचिपुडी नृत्‍य यांविषयी अभ्‍यासक्रम असलेली ‘युनिव्‍हर्सिटी ऑफ सिलिकॉन आंध्रा’ हिची स्‍थापना करण्‍यात आली आहे.

(निवृत्त) ब्रिगेडिअर हेमंत महाजन

२. अमेरिकेत स्‍थायिक भारतियांची वाढती समृद्धी

वर्ष २०२४ मधील ‘इंडियन मोबिलीटी’च्‍या अहवालानुसार अमेरिकेतील भारतीय विद्यार्थ्‍यांपैकी आंध्रप्रदेश आणि तेलंगाणा या राज्‍यांतील विद्यार्थ्‍यांचे प्रमाण एकूण विद्यार्थ्‍यांच्‍या संख्‍येत १२.५ टक्‍के असून त्‍यातील बहुतांश विद्यार्थी विज्ञान, तंत्रज्ञान, अभियांत्रिकी आणि गणित या क्षेत्रांतील आहेत. कित्‍येक काळापासून अमेरिकेतील भारतियांना ‘आदर्श अल्‍पसंख्‍यांक’ म्‍हणून पाहिले जात होते; परंतु अलीकडच्‍या काळात त्‍यांना समाजातील प्रतिक्रियांना सामोरे जावे लागत आहे. यामुळे ‘स्‍वतःच्‍या संपत्तीचे प्रदर्शन करू नये आणि स्‍थानिक राजकारणामध्‍ये सहभागी होऊ नये’, असा सल्ला तेथील भारतीय संस्‍थांकडून त्‍यांच्‍या सदस्‍यांना दिला जात आहे. तिथे रहाणारे भारतीय अमेरिकन नागरिकांचे प्रत्‍येक घरटी वार्षिक सरासरी उत्‍पन्‍न १ लाख डॉलर्स (८३ लाख ७४ सहस्र ८०५ रुपये) असून तो अमेरिकेतील मोठ्या प्रमाणात उत्‍पन्‍न असलेला समूह आहे. यांपैकी ७० टक्‍के लोकांकडे महाविद्यालयाची पदवी आहे. त्‍यांनी संपत्ती आणि शिक्षण या क्षेत्रांमध्‍ये अमेरिकन नागरिकांना मागे टाकले आहे.

३. अमेरिकेतील भारतियांचा राजकारणातील सहभाग

निवडणुकीत मतदान करणार्‍यांमध्‍ये भारतीय अमेरिकन नागरिकांचे प्रमाण ‘एशियन अमेरिकन गटां’च्‍या तुलनेत अधिक असून त्‍यांचा डेमॉक्रेट पक्षाला मत देण्‍याकडे कल आहे. उषा चिलीकुरी यांच्‍या संबंधामुळे काही मतदार दुसरीकडे वळू शकतील; परंतु अमेरिकेच्‍या एकूण लोकसंख्‍येमध्‍ये भारतीय अमेरिकन नागरिकांचे प्रमाण केवळ १.३ टक्‍के असून ते वेगवेगळ्‍या राज्‍यांत पसरले आहेत. त्‍यामुळे त्‍यांच्‍या मतांच्‍या परिणामाला मर्यादा आहे. तरीही भारतीय वंशाच्‍या राजकारण्‍यांचा प्रभाव लक्षणीयरित्‍या अधिक आहे. वर्ष २०२४ च्‍या अध्‍यक्षपदाच्‍या निवडणूक प्रचारामध्‍ये कमला हॅरिस, रामास्‍वामी आणि हॅले या भारतीय वंशाच्‍या राजकारण्‍यांचा प्रभाव दिसून येत आहे. निवडणुकीच्‍याही पलीकडे जाऊन या समृद्ध आणि सुशिक्षित भारतीय राजकारण्‍यांचा प्रभाव दिसून येत आहे.

– ब्रिगेडियर हेमंत महाजन (निवृत्त), पुणे