दिवसभरातील घडामोडींवर एक दृष्टीक्षेप : गणेशोत्सवासाठी अतिरिक्त रेल्वेगाड्या सोडणार !; चारचाकीच्या धडकेत शिक्षिकेचा मृत्यू !…

गणेशोत्सवासाठी अतिरिक्त रेल्वेगाड्या सोडणार !

प्रतिकात्मक चित्र

मुंबई – गणेशोत्सवाच्या काळातील रेल्वेगाड्यांचे आरक्षण पूर्ण झाले आहे. त्यामुळे या काळात कोकणात जाणार्‍या भाविकांसाठी रेल्वे प्रशासनाने २० अतिरिक्त रेल्वेगाड्यांच्या फेर्‍या सोडण्याची घोषणा केली आहे. मध्य आणि कोकण रेल्वेकडून २०२, तर पश्चिम आणि कोकण रेल्वेकडून ५६ फेर्‍यांची घोषणा करण्यात आली होती. आणखी २० फेर्‍यांमुळे उत्सवकाळात २७८ पर्यंत फेर्‍या होतील.


चारचाकीच्या धडकेत शिक्षिकेचा मृत्यू !

प्रतिकात्मक छायाचित्र

बदलापूर – बदलापूर-मुरबाड रस्त्यावर बारवी धरणाच्या पुलावर ‘हिट अँड रन’चा प्रकार घडला. सहलीला गेलेल्या शिक्षिका सुनीता पिंटूकर यांना चारचाकीने धडक दिल्याने त्यांचा मृत्यू झाला. अपघातानंतर चालक सिद्धेश माळवे फरार झाला होता. पोलिसांनी त्याला अटक केली आहे.


कळंबोली येथे लोखंड आणि पोलाद बाजारात छताचा भाग कोसळला !

प्रतिकात्मक चित्र

कळंबोली – येथील मुंबई महानगर प्रदेश लोखंड आणि पोलाद बाजार समितीच्या कार्यालयामध्ये छताचा भाग कोसळला. या वेळी कार्यालय बंद असल्याने जीवितहानी झाली नाही. ही इमारत जीर्ण झाली आहे. आशिया खंडातील लोखंड आणि पोलाद यांची सर्वांत मोठी बाजारपेठ कळंबोली येथे आहे. याच इमारतीमध्ये पनवेल प्रादेशिक परिवहन विभागाचे कार्यालय आहे. सध्या त्या कार्यालयालाही लोखंडी टेकू लावण्यात आले आहेत.


राजकीय आणि सामाजिक आंदोलनातील गुन्हे मागे घेण्याची मुदत सरकारने वाढवली !

(प्रतिकात्मक चित्र)

मुंबई, ३१ जुलै (वार्ता.) – सार्वजनिक समस्यांसाठी आंदोलने, निदर्शने करतांना  राजकीय पक्ष आणि सामाजिक संघटना यांच्या कार्यकर्त्यांवर नोंदवण्यात आलेले गुन्हे मागे घेण्यासाठीची मुदत राज्य सरकारने ३१ ऑगस्टपर्यंत वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. यापूर्वी ही मुदत ३१ जानेवारी २०२४ पर्यंत होती; मात्र अद्यापही काही कार्यकर्त्यांविषयीचे दोषारोप नोंदवण्यात न आल्यामुळे सरकारने हा कालावधी वाढवण्याचा निर्णय घेतला आहे.


ईश्वरपूर (सांगली) येथे एकतर्फी प्रेमातून तरुणीची हत्या !

ईश्वरपूर, ३१ जुलै (वार्ता.) – चाकण येथील औद्योगिक वसाहतीमधील आंबेठाण (तालुका खेड) येथे कु. प्राची माने (वय २१ वर्षे) हिच्यावर एकतर्फी प्रेमातून चाकूने वार करून तिची हत्या केली आहे. ती एका खासगी आस्थापनात काम करत होती. ती तिच्या मैत्रिणीसह आंबेठाण येथे रहात होती. या प्रकरणी संशयित आरोपी अविराज खरात (वय २२ वर्षे, रा. बहे, तालुका वाळवा) याला १२ घंट्यांतच पोलिसांनी अटक केली. आरोपी अविराज हा कु. प्राची हिच्यावर एकतर्फी प्रेम करत होता. तिने विवाहास नकार दिल्यामुळे त्याने तिची हत्या केला. (धर्माचरणाच्या अभावी संयम आणि नीतीमत्ता संपलेली तरुण पिढी ! – संपादक)