१. साक्षात् गुरुस्पर्शाने पावन झालेल्या श्री पादुकांनी सदैव हरिस्मरणाची आठवण करून देणे
‘परात्पर गुरु डॉक्टर, मी आज सेवाकेंद्रात आलो आणि तुमच्या पादुकांचे दर्शन मला लाभले. तुमच्या या पादुकांकडे पहाता मला तुमचीच आठवण येते आणि पुष्कळ कृतज्ञता वाटत आहे.
तुमच्या वामन अवतारात याच पादुकांनी बळी राजाला परब्रह्म सत्याची जाणीव करून दिली. बळी राजाच्या मस्तकी हे कोमल चरण ठेवून तुम्हीच जनकल्याण केले ना ? त्या लहान आणि कोमल चरणांना आसरा देणार्या याच पादुकांना धारण केले होते ना ? भरताला राज्यकारभार चालवण्यासाठी तुमचे चैतन्य सदैव प्रदान करणार्या अनमोल श्री पादुकांना मी शरण आलो आहे. या चरणपादुका माझ्यासाठी गुरुभक्ती, हरिभक्ती जागृत करणार्या आहेत. त्यांच्यामुळे मला सदैव हरिस्मरण होण्यास साहाय्य होत आहे. ‘अंधःकाराने भरलेल्या या हृदयात दीपासमान प्रवेश करणार्या या गुरुपादुका माझ्या अंतरी गुरूंचे तेज प्रकाशित करो’, ही प्रार्थना ! ज्या पादुका धारण करून भगवान विष्णु आपले कार्य व्यापक करतो आणि ज्या कोमल निळ्या चरणांचा स्पर्श या पादुकांना सदैव होतो, त्यांचे दर्शन मला आज लाभत आहे. कित्येक जन्मी तपःश्चर्या करून जेव्हा ऋषिमुनींना देवदर्शन होते, तसे माझे चित्त या पादुकांच्या दर्शनाने कृतज्ञतेचे नामस्मरण करत आहे.
२. गुरुपादुका भवसागर पार करण्याकरता नौका बनून आल्याचे जाणवणे
या पादुकांमध्ये किती चैतन्य आणि शक्ती आहे, हे मला ठाऊक नाही. मी अज्ञानी आहे. मला केवळ इतके ठाऊक आहे की, या पादुका माझ्यासारख्या अनेक जिवांच्या उद्धारक आहेत. या केवळ आणि केवळ भक्तांसाठी आहेत. या अलौकिक पादुका साक्षात् महाविष्णूने (सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी) धारण केल्या आहेत. या श्री चरणपादुकांना श्रीहरिच्या गगनसदृश (निळ्या) रंगाचा स्पर्श झाला आहे. श्री पादुका सदैव गुरूंच्या स्मरणाची आठवण करून देतात आणि ज्या साक्षात् गुरुस्पर्शाने पावन झाल्या आहेत, अशा गुरुपादुका माझ्यासाठी भवसागर पार करण्याकरता नौका बनून आल्या आहेत. मी या दिव्य पादुकांचे वर्णन करण्यासाठी असमर्थ आहे भगवंता !
देह तुझे काम, मन तुझे नाम ।
बुद्धी तुझे स्मरण, होऊ दे हरिनामाचा गजर ।।
या गुरुपादुकांच्या सहवासात तुम्ही मला आणले. परात्पर गुरु डॉक्टर, मी कृतज्ञतेविना काय बोलू शकतो ? या दिव्य कार्यात मला केवळ तुमचेच स्मरण रहावे आणि तुमच्यासाठीच हा जीव जन्मभर पदोपदी झिजावा. पापांचे डोंगर नष्ट करणार्या या पादुका माझ्यासाठी, माझ्या साधनेसाठीच आल्या आहेत. आता केवळ शरणागती आणि चिकाटीने प्रयत्न करण्यात मी कधीही मागे रहाणार नाही. हे ध्येय परात्पर गुरु डॉक्टर, मी तुमच्या प्राप्तीसाठी घेतो.’
– शरणागत,
श्री. देवेन पाटील (लिखाणाच्या वेळचे वय १८ वर्षे (वर्ष २०२४ मधील वय २३ वर्षे)), देहली
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |